वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेले ः डॉ. मायी

वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेले ः डॉ. मायी

पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील अन्नधान्याचे पारतंत्र्य दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेले आणि देशाला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णता मिळवून दिली. वसंतराव नाईक यांची दूरदृष्टी, इच्छाशक्ती व मेहनतीतून हरित क्रांतीची पहाट उगवली. वसंतराव नाईक हे केवळ महाराष्ट्राला, नव्हे तर देशाला मिळालेली देणगी होय, असे गौरवोदगार नवी दिल्ली येथील दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी यांनी व्यक्त केले.

पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी (ता. १८) वसंतराव नाईक यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. मायी अध्यक्षपदावरून बोलत होते. राज्यातील नऊ कर्तबगार, प्रगतिशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांचा शाल- श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व गौरवपत्र देऊन या वेळी गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक आमदार मनोहर नाईक, माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, आमदार नीलय नाईक, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष जय नाईक, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, के. डी. जाधव, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर, प्रा. गोविंद फुके, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष धनंजय सोनी, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, संचालक प्रा. अप्पाराव चिरडे, डॉ. अकील मेमन, निळकंठ पाटील, सिराज हिराणी, अनिरुद्ध पाटील, विजय जाधव, ययाती नाईक, जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. मायी म्हणाले, की वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना १९६७-६८ च्या काळात भीषण अन्नटंचाई असल्याने मिलो ज्वारी व लाल गहू यासाठी रेशन दुकानासमोर रांगा लावाव्या लागत असे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही परिस्थिती बदलण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा करून हायब्रीड ज्वारी वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचविले. अन्नधान्याची टंचाई संपुष्टात आली. हायब्रीडनंतर नवीन जैविक तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या बीटी कपाशीचे उत्पादन अनेक पटीने वाढले. तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना तारणारे आहे, यावर वसंतराव नाईक यांचा विश्वास होता. आजचे राजकारणी मात्र जैविक तंत्रज्ञानाला विरोध करतात, हा मोठा विरोधाभास आहे. येत्या २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नारे देण्यात येत आहे. केवळ घोषणा करून जमणार नाही तर कृतिशील विचारांची गरज आहे. शेतीमालाची केवळ एमएसपी वाढवून भागणार नाही तर शेतमाल खरेदीची आश्वासक व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. 

या वेळी कुलगुरू आशिष पातुरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. दिनकर गुल्हाने व प्राचार्य गणेश पाटील यांनी संपादित केलेल्या ‘किमयागार’ या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. मायी यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण, माधुरी आसेगावकर यांनी केले तर डॉ. उत्तम रुद्रवार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com