भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्त

सगळेच वाहून गेल्याने उत्पादक कंगाल झाला आहे. भाजीपाल्याचे उत्पादन घेवू पर्यंत लाखो रुपयांचा खर्च येतो. त्याचे तर पूर्णपणे नुकसान झाले आहे. सरकारला भरीव मदत करावीच लागेल. अन्यथा या भागातील भाजीपालाच संपूण जाईल अशी भिती आहे. - सागर संभूशेटे, भाजीपाला उत्पादक, नांदणी जि.कोल्हापूर
पीक नुकसान
पीक नुकसान

कोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण राज्याला भाजीपाला पुरविला, आज तेच जिल्हे भाजीपाल्याला महाग झाले आहेत. महापुराच्या तडाख्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतून मुंबई, पुण्याबरोबर इतर राज्यांत होणारी शेकडो ट्रक भाजीपाल्याची वाहतूक ठप्प झाली. पुराच्या पाण्याने दोन्ही जिल्ह्यांचे मिळून अंदाजे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. भाजीपालाच बुडून गेल्याने भाजीपाला उत्पादक संघात भयानक शांतता, खचलेले भाजीपाला उत्पादक असे विदारक चित्र अनुभवयास येते. दोन्ही जिल्ह्यांत सध्यस्थितीला सहाशे हेक्‍टरहून अधिक नुकसान झाले आहे.  भाजीपाला पट्टा म्हणून मिरविणाऱ्या गावांचे शिवार आज दयनीय अवस्थेत दिसते. ज्या तारकाठ्यावर टोमॅटो, दोडकेसह फळभाज्या, भाजीपाला डोलायची त्याच तारकाट्या आज भग्नावस्थेत उभ्या आहेत. सखल जमिनीतील पिके पुराने गेली, तर माळरानावरील पिके अति पाण्याने माळ पाझरून गेली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ; तर सांगली जिल्ह्यातील मिरज, शिराळा, वाळवा, पलूस आदी तालुके भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. फ्लॉवर, कोबी, टोमॅटो आदीसहित बहुतांशी भाजीपाल्यांचे हे आगार आहे. उसानंतर या पाणीदार तालुक्‍यांमध्ये भाजीपाला हे हमखास उत्पन्नाचे साधन आहे. मुंबई, पुण्याच्या बाजारपेठांबरोबर स्थानिक बाजारपेठेमध्येही अगदी काही एकर क्षेत्रापासून ते काही गुंठयापर्यंतचे शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.  जसा पावसाचा जोर राहिला, तसे भाजीपाला प्लॉटमध्ये पाणी साचून राहिले. तोडणी बंद पडली. अनेकांच्या भाजीपाला प्लॉटवर पाच ते दहा फुट पाणी होते. पाणी ओसरल्यानंतर इथे गाळाने भरलेल्या, खरवडून गेलेल्या जमिनीची पहाणे उत्पादकांच्या नशिबी आले. रोपांच्या आधारासाठी उभारलेल्या तारा, काठ्याच या क्षेत्रात भाजीपाला होता याचा पुरावा म्हणून राहिल्या. आता पिके लवकर येण्याची शक्‍यता नाही. लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्याच्या हातात आता काही हजार रुपयेही नाहीत अशी परिस्थिती आहे. अल्पभूधारक हलाखीत बहुतांश अल्पभूधारक शेतकरी भाजीपाला विक्रीतून आपला प्रपंच, मुलांचे शिक्षणाचा खर्च करतात. परंतु गेल्या पंधरा दिवसापूर्वी कृष्णा आणि वारणा नदीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण शेती पाण्याखाली घेतली. त्यामुळे भाजीपाल्याने मोठे नुकसान झाले. आता प्रपंचाला आर्थिक हातभार मिळावा यासाठी पै-पाहुणे, मित्रांची मदत घेतली गेली आहे. मात्र, जोपर्यंत शेतात काहीच पिकत नाही. तोपर्यंत हे पैसे परत करता येणार नाही. प्रतिक्रिया जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दहा गाड्यापर्यंत विविध प्रकारचा भाजीपाला बाहेरील बाजापेठेत आमच्या संघामार्फत जात होता. पाऊस सुरू झाला तशी घट झाली. आता पुरानंतर एक गाडीही भाजीपाला बाजारपेठेत गेला नाही. एखादा अपवाद वगळता शंभर टक्के भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. शासनाने भाजीपाला उत्पादकांसाठी विशेष मदत केल्याशिवाय उत्पादक सावरु शकणार नाही. - चवगोंडा पाटील, सचिव, नांदणी भाजीपाला व फळफळावळ उत्पादक सहकारी संघ, नांदणी, जि.कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात साडेआठ हजार हेक्‍टर क्षेत्रावर भाजीपाला आहे. यांपैकी आतापर्यत साडेपाचशे हेक्‍टर क्षेत्रावरील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. यात अजूनही वाढ होवू शकते. पंचनाम्यानंतर नक्की नुकसान समजू शकेल. - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

सांगली जिल्ह्यात ४८२४ हेक्‍टर क्षेत्रावर भाजीपाला असून आतापर्यंत १०० हेक्‍टरवर नुकसान झाल्याची माहिती आहे. पाणी ओसरेल तशी नुकसानीची तीव्रता स्पष्ट होत आहे. - सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक, सांगली

आमच्या संस्थेमार्फत पुणे, मुंबई, बेळगाव आणि हैद्राबाद येथे भाजीपाला पाठवला जायचा. परंतु महापुरामुळे संपूर्ण भाजीपाला शेती उध्वस्त झाली आहे. त्यामुळे सध्या पूर पट्ट्यातील कोणत्याही भागातून भाजीपाला बाहेरच्या मार्केटमध्ये जात नाही. शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी खते, बियाणे मोफत द्यावे. - गजानन मोहिते, सचिव, उत्कर्ष भाजीपाला सहाकारी संस्था, तुंग, ता. मिरज, जि.सांगली

दरवर्षी सिमला मिरची आणि कारले पिक घेतोय. यंदा सिमला मिरची लावली होती. पाच ते सहा टनाची विक्री केली. परंतु पावसामुळे माल काढता आला नाही. डोळ्यासमोर सिमला मिरचीचे नुकसान झाले. पैसे येत नसल्याने घरच थांबले. त्यामुळे मित्राकडून ५० हजार रुपये उसणे घेतले. कसंबसं घर सुरू आहे. परंतु आता लढायचं असं ठरवलं असून झेंडूची लागवड केली आहे. - विजय जाधव, शेतकरी, दुधोंडी, ता. पलूस. जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com