पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईचा भाजीपाला पिकांना फटका  

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्याचा फटका रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांनाही बसू लागला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३७,५१८ हेक्टरवर भाजीपाला लागवड झाली होती. त्या तुलनेत यंदा भाजीपाला लागवड क्षेत्रात जवळपास १३ हजार २१ हेक्टरने म्हणजेच सरासरी १७ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा २४,४९७ हेक्टरवर भाजीपाला लागवड झाली आहे. येत्या एक ते दीड महिन्यात भाजीपाल्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

दरवर्षी रब्बी हंगामात सरासरी ३० हजार हेक्टरवर शेतकरी भाजीपाला पिकांची लागवड करतात. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, खेड, बारामती, दौंड, भोर, मावळ, हवेली या तालुक्यांत कोथिंबीर, शेपू, मेथी, भेंडी, गवार, टोमॅटो या भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्या तुलनेत पुरंदर, इंदापूर, शिरूर वेल्हा, मुळशी या तालुक्यात भाजीपाल्याची कमी लागवड शेतकरी करतात. यंदा पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व व उत्तरेकडील तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड झाली होती. त्यामुळे उत्पादनात चांगलीच वाढ झाली होती. 

पुणे जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून पाणीटंचाई वाढू लागल्याने टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील २६ गावे, ३१७ वाड्यांवर ४६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये बारामती, दौड, पुरंदर, शिरूर, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर या सात तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, विहिरीतील पाणीपातळीतही चांगलीच घटली आहे. काही गावात विहिरी कोरड्या पडू लागल्या असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होऊ लागला आहे. त्याचबरोबर शेतीलाही पाणीटंचाईचा चांगलाच फटका बसू लागला आहे. अनेक शेतकरी कांदा, चारा पिकांकडे वळू लागला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात घट होऊ लागली आहे.  

तालुकानिहाय भाजीपाला पिकांचे क्षेत्र (हेक्टर) ः हवेली ३६२५, मुळशी १७२, भोर ५४५, मावळ २८३, वेल्हे १२४, जुन्नर ४०६०, खेड ३९७७, आंबेगाव ४६३८, शिरूर ३०६९, बारामती १०८०, इंदापूर १८५६, दौंड १०६८. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com