गंजेवाडी (जि.
अॅग्रो विशेष
शेतकरी पुत्राने बनवले वाहन ऊस भरणी यंत्र
रामकृष्णनगर (ता. सातारा) येथील अभियंता सनी दिलिप काळभोर या शेतकरी पुत्राने ऊस भरणीसाठी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे दिवसभरात ७० ते ७५ टन ऊस भरला जात आहे.
सातारा : सध्या ऊस हंगामातील सर्वात मोठी समस्या उसतोड मजूर ठरत आहे. कोरोनामुळे अनेक साखर कारखान्याचे मजूरांनी दांडी मारल्याने उस तोडणी यंत्रणा विस्कळीत झाल्याने ऊसतोडणीस विलंब होत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उस उत्पन्नावर होत आहे. या समस्या मात करण्यासाठी रामकृष्णनगर (ता. सातारा) येथील अभियंता सनी दिलिप काळभोर या शेतकरी पुत्राने ऊस भरणीसाठी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे दिवसभरात ७० ते ७५ टन ऊस भरला जात आहे.
सातारा जिल्ह्यात १६ साखर कारखाने आहेत. सध्या ऊस हंगाम सुरू दोन महिने उलटले असले तरी ऊस तोडणी मजूरांची टंचाई भासत आहे. म्हणून अनेक कारखान्यांना अपेक्षित गाळप करण्यात अडचणी येत आहेत. अशा वेळी कमीत कमी मजूरांसह काम करण्यासाठी रामकृष्णनगर (ता. सातारा) येथील सनी काळभोर यांने प्रयत्न सुरू केले. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.
उस वाहतूक यंत्राची निर्मिती
सनी याने ट्रेलरमध्ये ऊस भरण्याच्या उद्देशाने यंत्र तयार करण्याचे नियोजन केले. मे २०२० पासून त्यावर प्रत्यक्ष काम सुरू केले. यंत्र तयार करतेवेळी यंत्र किमान जागेत बसणारे, सहज वाहतूक करण्यायोग्य असले पाहिजे, याकडे प्राधान्याने लक्ष ठेवले. या यंत्राचे आरेखन व निर्मिती यासाठी सुमारे चार महिने लागले. स्थानिक पातळीवर उपलब्ध लोखंड, नटबोल्ट, चेन, टायर, बेअरिंग, दातेरी चक्र व इंजिन यांचा वापर केला आहे. या यंत्राच्या निर्मितीसाठी सनीला दोन लाखांचा खर्च आला. हे यंत्र काम करत असताना अजिंक्यतारा, सह्याद्री साखर कारखान्यांचे संचालक, अधिकारी व परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांनी पाहणी केली.
यंत्राची वैशिष्टये
- या यंत्रामुळे ट्रेलरमध्ये उस भरण्यासाठी बैलगाडी, फळ्या लागत नाहीत.
- पाच मजुरांद्वारे अवघ्या ४५ मिनिटांत एक ट्रेलर भरला जातो. त्यांची उपलब्धता आणि मजुरी या दोन्ही समस्येवर या यंत्राने मात करता येते. या यंत्राद्वारे एक दिवसात आठ ट्रेलर भरता येतात.
- शेताच्या लांबीनुसार या यंत्राची लांबी कमी जास्त करता येते.
- ट्रॅक्टरद्वारे या यंत्राची वाहतूक शक्य होते.
- ५० टन ऊस भरण्यासाठी एक लिटर डिझेल लागते.
- या यंत्रामुळे उसतोडणीवरील मजूरांचा खर्च निम्यावर येतो.
- ऊस ट्रेलर रस्त्यावर ठेऊनच भरता येतो. परिणामी शेतातील तुडवणी कमी होते. पलटी होण्याचा धोका कमी होतो.
पेटंटसाठी केला अर्ज
एकूण ७५ फूट लांबीचे हे यंत्र असून, फोल्डिंग केल्यानंतर त्याची लांबी २५ फुटांची होते. हे यंत्र ट्रॅक्टर ट्रेलरला जोडले जाते. पट्ट्यावर उसाच्या मोळ्या टाकल्या जातात. इंजिनाद्वारे पट्टे फिरत असल्यामुळे उसाच्या मोळ्या थेट ट्रेलरमध्ये पडतात. या यंत्राच्या आरेखनाच्या पेटंटसाठी सनीने अर्ज केला आहे.
- सनी काळभोर ८३९०७८१०१३