परभणी जिल्ह्यात पावसाअभावी खरीप वाया जाण्याच्या उंबरठ्यावर

महिनाभर उशिरा पेरणी झाली. गेल्या २० -२२ दिवसांपासून पावसाचा खंड आहे. गतवर्षीसारखे यंदा सिंचनासाठी पाणी नाही. कोरडवाहू क्षेत्रातील सोयाबीनला शेंगा लागत आहेत. परंतु पाण्याअभावी त्या भरत नाहीत. उत्पादनात मोठी घट येणार आहे. - मधुकर थोरात, बोरी, ता. जिंतूर
परभणी जिल्ह्यात पावसाअभावी खरीप वाया जाण्याच्या उंबरठ्यावर
परभणी जिल्ह्यात पावसाअभावी खरीप वाया जाण्याच्या उंबरठ्यावर

परभणी : परभणी जिल्ह्यात पावसाचा खंड काळ वाढत चालल्याने खरीप हंगामातील पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदा सिंचन तसेच पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे दुष्काळाची दाहकता अधिक जाणवत आहे. पेरण्यांना उशीर झाला त्यात परिपक्वतेच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्याने मूग, उडदाचे पीक हाती लागले नाही. सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी आदी पिकांची परिस्थिती बिकट आहे.

तापमानात ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. वाळून गेलेली पिके मोडून टाकली जात आहेत. चारा उपलब्ध नसल्याने विकत घेऊन पशुधनाचा सांभाळ करावा लागत आहे. मुगाचे उत्पन्न न मिळाल्यामुळे पोळा सण साजरा करण्यासाठी उधार, उसनवारी करावी लागत आहे. दुष्काळाचे सावट गतवर्षीपेक्षाही गडद झाल्यामुळे पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

२३१ मिलिमीटर पावसाची तूट जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै, आॅगस्ट या तीन महिन्यांत ५२१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात २८८.१५ मिलिमीटर (५५.३ टक्के) पाऊस झाला. आजवर अपेक्षित पावसामध्ये २३२.८५ मिलिमीटरची (४४.७१ टक्के) तूट आली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४८६.३ मिलिमीटर पावसाची (६२.८ टक्के) तूट आली आहे. आजवर अपेक्षित पावसाची आकडेवारी विचारात घेतली असता परभणी तालुक्यात (४३.१ टक्के), जिंतूर तालुक्यात (४८.४ टक्के), सेलू तालुक्यात (४६.४ टक्के), मानवत तालुक्यात (६३.१ टक्के), पाथरी तालुक्यात (५०.३ टक्के), सोनपेठ तालुक्यात (५९.४ टक्के), गंगाखेड तालुक्यात (६१.२ टक्के), पालम तालुक्यात (६३.१ टक्के), पूर्णा तालुक्यात (७४.३ टक्के) पाऊस झाला आहे.

कमी कालावधीतील पिकांवर गडांतर जिल्ह्यात यंदा ५ लाख ३३ हजार ५३९ हेक्टरवर (१०२ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पालम आदी तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. सोयाबीनचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक २ लाख ४० हजार हेक्टर आहे. कपाशीची २ लाख २ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या २० ते २२ दिवसांपासून खंड पडल्याने पिके सुकू लागली आहेत. उशिरा पेरणी झालेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. हलक्या जमिनीवरील पिके वाळून गेली आहेत.

वाढ खुंटलेली पिके मोडून टाकली जात आहेत. मूग, उडीद या दोन ते सव्वादोन महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या तसेच सोयाबीन, ज्वारी या पिकांना पावसाच्या खंडाचा सर्वाधिक फटका बसला आहे. उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट येणार आहे.

पोळा सणाच्या आनंदावर विरजण...

वेळेवर पेरणी होऊन चांगला पाऊस झाल्यास मूगाचे उत्पादन मिळते. त्यामुळे पोळा सणासाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसे येतात. परंतु यंदा मुगाचे उत्पादन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पोळा सणासाठी उधार उसणवारी करावी लागत आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाचाही हंगाम वाया जाण्याची भीती असल्यामुळे पोळा सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

चारा, पाण्याची टंचाई

मोठा पाऊस न झाल्यामुळे ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाल्या नाहीत. २१ लघू तलाव कोरडे पडलेले आहेत. नुकतेच उगवू लागलेले गवत वाळून गेले आहे. त्यामुळे जनावराच्या चारा तसेच पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. ज्वारीच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा चार हजार रुपयांवर गेले आहेत. कधी नव्हे ते यंदा पोळा सण आला तरी चारा विकत घ्यावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com