अडत्यांच्या आयकर आणि हिशेबपट्ट्यांची पडताळणी करणार

अडत्यांच्या आयकर आणि हिशेबपट्ट्यांची पडताळणी करणार
अडत्यांच्या आयकर आणि हिशेबपट्ट्यांची पडताळणी करणार

पुणे ः दफ्तर तपासणीमध्ये अनियमितता आढळलेल्या अडत्यांवरील कारवाईची दिशा स्पष्ट करण्यासाठी सनदी लेखापालांद्वारे (सीए) अडत्यांनी भरलेला आयकर आणि हिशेबपट्ट्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीमधील तफावतीनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती पुणे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी गुरुवारी (ता. २८) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

डाळिंब यार्डासह भाजीपाला विभागातील सुमारे २०० अडत्यांची दफ्तरे प्रशासनाच्या वतीने ताब्यात घेतली आहेत. या दफ्तरांची तपासणी सुरू असून, हिशेबपट्ट्या आणि अडत्यांनी भरलेला आयकर याची पडताळणी करण्यात येत आहे. यासाठी अडत्यांना आयकर विवरण सादर करण्याचे पत्र दिले असून, त्यांनी तातडीने माहिती सादर करावी. सनदी लेखापाल हिशेबपट्ट्या आणि आयकर विवरण याची पडताळणी करणार आहेत. या पडताळणीमध्ये वास्तव समोर येणार असून, त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, अडत्यांच्या गाळ्यावरील चवली दलालांवरील कारवाईबाबत देशमुख म्हणाले, ‘‘गेल्या १५ दिवसांत अडत्यांच्या गाळ्‍यावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या २३० अडत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ५० हजार रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे. गाळ्यावरील बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांना भविष्यात कशाप्रकारे नियमित करता येईल याबाबत बाजार समिती चाचपणी करत आहे. एका महिन्यात याबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत गाळ्यावर २००७ च्या नियमानुसार एक अडतदार आणि दोन सहायक अशीच रचना राहील.’’ 

‘‘कारवाईनंतर बाजार समितीमधील सुमारे ४०० अडत्यांनी बाजाराची गरज आणि बदलत्या व्यवसायाचे स्वरूप याची वस्तुस्थिती पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांच्यासमोर मांडली. याबाबत पणन संचालकांनीही सध्याची बाजाराची गरज, करावे लागणारे बदल याचा अभ्यास आणि प्रत्यक्ष निरीक्षण करून निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. त्यानुसार पुढील महिन्याभरात महिनाभर प्रत्येक बाजार घटकाचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर सर्वांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येईल,’’ असेही देशमुख यांनी सांगितले.

बाजार समितीमधील व्यवहाराचे स्वरूप कालागणिक बदलत असून, घाऊक खरेदी कमी होऊन, किरकोळ विक्री वाढत आहे. वाहतूक खर्च वाढत असल्याने शेतकरी स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य देत आहेत. बाजार समितीमध्ये सध्या परराज्यातून व्यापारी शेतीमालाची मोठी आवक होत आहे. हा शेतीमाल लवकरात लवकर विक्री व्हावा यासाठी मदतनिसांची गरज वाढली आहे. याचा बाजार समितीने विचार करावा, अशी आमची मागणी आहे. - विलास भुजबळ, अध्यक्ष, अडते असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com