चाऱ्याचे मोजमाप करणार पशुवैद्यकीय अधिकारी

चाऱ्याचे मोजमाप करणार पशुवैद्यकीय अधिकारी
चाऱ्याचे मोजमाप करणार पशुवैद्यकीय अधिकारी

सातारा : निम्मे राज्य दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पाण्यासह चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासणार असून, त्या दृष्टीने काटेकोर नियोजन होणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत चारा उत्पादन, उत्पन्नाची जबाबदारी शासनाने कृषी विभाग सोडून पशुसंवर्धन विभागाकडे दिली आहे. यामुळे जनावरांच्या आरोग्याची तपासणी करणारे पशुवैद्यकीय अधिकारी चारा उत्पादनाचे मोजमाप करताना दिसणार आहेत.

राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. शासनाने राज्यातील १५१ तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर केला आहे. पाणीटंचाई तीव्र होत असल्याने टॅंकरला मागणी वाढत आहेत. जनावरांसाठीही पाणीटंचाई भासत आहे. त्यात आता चाराटंचाईची देखील भर पडणार आहे. भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलाशयाखाली, तलावाखालील जमिनीचा विनियोग केवळ चारा उत्पादनासाठी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी गाळपेराचे नियोजनही केले जात आहे. मात्र, कित्येक वर्षे दुष्काळाची उपाययोजना करणाऱ्या सरकारने या वर्षी मात्र आश्‍चर्य वाटावे, असाच एक निर्णय घेतला आहे.

दुष्काळी परिस्थितीत चारानिर्मितीचे काम कृषी विभागाकडे असते, यंदा मात्र ते चक्‍क पशुसंवर्धन विभागाकडे दिले आहे. यामुळे जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी की चारा पिकवावा, हेच पशुसंवर्धन विभागाला उमजेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना बियाणे पुरविणे आणि जनावरांची संख्या, त्यांना आवश्‍यक चारा याची माहिती देण्यापर्यंतचे काम पशुसंवर्धन विभाग सांभाळत होता. आता मात्र चाऱ्याचे उत्पादन किती होईल? त्यासाठी खते किती, कोणती द्यावी लागतील? जागा किती लागेल? उत्पादन किती मिळेल याचीही माहिती पशुसंवर्धन विभागाला द्यावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर शेतात जाऊन प्रत्यक्ष चारापिकाची उंची मोजणे, संबंधित शेतकऱ्याचे चारा पिकासह छायाचित्र काढून ते अपलोड करणे यासारखी सर्व कामे करावी लागणार आहेत. यामुळे जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यायची सोडून चारा उत्पादनावर लक्ष द्यावे लागणार आहे.

मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पदे रिक्‍त पशुसंवर्धन विभागाला रिक्‍तपदाचे ग्रहण लागले आहे. सातारा जिल्ह्यात उपआयुक्‍तांसह, १५ पशुधन विकास अधिकारी, चार विस्तार अधिकारी, २६ पशुधन पर्यवेक्षक आदी १९० पैकी सुमारे ४६ पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे तीव्र दुष्काळी असलेल्या आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या माण तालुक्‍यात पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी ही पदे रिक्त आहेत. उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांना चाऱ्याबाबतची छायाचित्रे अपलोड करण्याच्या कामात व्यस्त राहावे लागले, तर जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणार कोण असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com