रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस बाजारा सुधारला: विजय जावंधिया

विजय जावंधिया
विजय जावंधिया

पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५०० रुपययांपर्यंत गेले आहेत. मात्र ही वाढ केंद्र सरकारने हमीभावात वाढ केल्याने झाली नाही, तर रुपयाचे सतत झालेले अवमूल्यन आणि सरकीच्या दरात तेजीमुळे कापसाचे दर वाढले आहेत, असे विश्‍लेषण शेतीप्रश्‍नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी मांडले आहे.  मोदी सरकारने २०१८-१९ च्या हंगामासाठी कापसाच्या हमीभावात १०९० रुपयांची वाढ करून ५४५० रुपये प्रतिक्वंटल देण्याची घोषणा केली. ही वाढ २४ टक्केच आहे. डॉ. मनमोहनसिंग सरकारने २०१८-०९ च्या हंगामात हमीभावात २०२० रुपयांवरून ३००० रुपये केला होता. ही वाढ ५० टक्के होती. तेव्हा हा दर जागतिक आणि देशातील बाजारातही मिळत नव्हता. सर्व कापूस सीसीआय आणि नाफेडने विकत घेतला होता.  आज मोदी सरकारला ५४५० रुपये दराने कापूस खरेदी करावी लागत नाही. कारण बाजारात कापसाचे दर ६५०० रुपये आहेत. कापूस हंगाम सुरू झाला, तेव्हा बाजारात कापसाचे दर ५५०० ते ५८०० रुपये दरम्यान होते. मध्यंतरी दर ५२०० रुपये ते ५४०० रुपये झाले होते. आता दर परत वाढले आहेत. दरात सुधारणा झाली त्याचे मुख्य कारण रुपयाचे अवमूल्यन व सरकीच्या दरातील तेजी आहे. मध्यंतरी अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध वाढेल आणि भारतातून निर्यात वाढून दर वाढतील अशी चर्चा होती. परंतु यंदा कापसाची निर्यात वाढली नसून कमी झाली आहे. तर आयात वाढली आहे. मागील वर्षी २० लाख गाठींची आयात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन २७ लाख गाठींची आयात होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात रुईच्या दरात तेजी नाही. मागच्या हंगामात रुईचे दर ८० ते ९० सेंट प्रति पाउंड होते व सध्या ८७ सेंटवर आहेत. सध्या ७० रुपये प्रतिडॉलर विनिमय दर आहे तर मागील वर्षी ६२ रुपये होता.  एक क्विटंल कापसामधून ३४ किलो रुई व ६४ किलो सरकी मिळते. ७० रुपयांच्या विनिमय दरामुळे १३३.९७ प्रतिकोलो प्रमाणे ३४ किलो रुईचे ४५५५ रुपये होतात. सरकीचा दर २७०० रुपये प्रतिक्विंटल होता. सरकीचे एका किलोचा दर २७ रुपये प्रमाणे ६४ किलोचे १७२८ रुपये होतात. याचाच अर्थ एक क्विंटल कापसाचे ४५५५+ १७२८- ६२८३ रुपये होतात. हाच हिशेब ६२ रुपये विनिमय दरावर सरकीचे भाव २००० रुपये या प्रमाणे केला तर, ३४ किलो रुईचे ४०२६ रुपये होतात व ६४ किलो सरकीचे २० रुपये दराने १२८० रुपये होतात. एकूण ४०२६+१२८०-५३०६ रुपये होतात. याचाच अर्थ असा की विनिमय दर ६२ रुपये आणि सरकी २००० रुपये क्विंटल असती तर आज बाजारात ५००० ते ५३०० रुपये दर मिळाला असता.  अमेरिकेतील मका पीक किडीने फस्त केल्याने यंदा सरकीच्या दरात तेजी आली आहे. भारतातही मक्याचे दर १४०० रुपयांवरून २००० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले आहेत. म्हणून सरकीच्या ढेपेच्या दरात तेजी आली आहे. सध्या २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल सरकीच्या ढेपेचे दर आहेत.  अमेरिकेच्या कापूस बाजारात १९९४ मध्ये १ पाउंड रुईचा भाव १ डॉलर १० सेंट होता. तो आज २०१९ मध्ये ८० ते ९० सेंट आहे. १९९४ मध्ये भारतात २५०० रुपये प्रतिक्विंटल कापसाचे दर होते. त्या वेळी विनिमय दर २५ रुपये होता. त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन आणि सरकीच्या दरातील तेजी झाली नसती तर कापूस उत्पादकांचे काय झाले असते? अमेरिकेचा कापूस शेतकरी कमी दरात कापूस विकतो तरी आत्महत्या करत नाही, कारण त्यांना ४.६ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com