शेतकरी, बेरोजगारांच्या मनात सरकारबद्दल आक्रोश : विखे-मुंडे

शेतकरी, बेरोजगारांच्या मनात सरकारबद्दल आक्रोश
शेतकरी, बेरोजगारांच्या मनात सरकारबद्दल आक्रोश

मुंबई : फसव्या घोषणा करणाऱ्या सरकारने खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी, बेरोजगारांच्या मनात सरकारबद्दल आक्रोश आहे. आता राज्यातील या सर्वसामान्य नागरिकांनीच सरकारची ही मस्ती उतरवण्याचे ठरवले असून खोटारड्या, फसव्या, लबाड सरकारचा काउंटडाउन सुरू झाला आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि धनंजय मुंडे यांनी रविवारी (ता. २५) संयुक्त पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर डागले. आज (ता. २६) पासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी रणनीती ठरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विखे यांच्या शासकीय बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीला विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, आमदार जयंत पाटील, कम्युनिष्ठ पक्षाचे जिवा पांडू गावित, सपाचे अबू आझमी आदी उपस्थित होते. या बैठकीत राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय झाल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले. दरम्यान पत्रकार परिषदेत शेतकरी धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या ही सरकार आणि दलालांनी केलेली हत्या असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला. शेतकऱ्यांप्रती इतके कोडगे सरकार यापूर्वी कधीही पाहिले नाही, असे ते म्हणाले. कर्जमाफी जाचक नियम आणि अटी आणि ऑनलाइन, ऑफलाइन गोंधळात अडकली. कर्जमाफीनंतरही राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने कर्जमाफीत छत्तीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा केली. आतापर्यंत त्यापैकी एकोणीस लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचे सरकार सांगत आहे. १३ फेब्रुवारीअखेर १२ हजार ३६८ कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे. सरकार फक्त जाहिरातबाजीत पुढे आहे. कृती आणि आकडेवारीत मोठी तफावत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नुकतीच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकारने दोनशे कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याचे सांगितले आहे. गारपिटीमुळे ७ लाख ८३ हजार एकर क्षेत्राचे नुकसान झाले. दोनशे कोटीतून एकरी दोन हजार रुपयांपर्यंतची मदत मिळेल. शेतकऱ्यांना मदत देता की, भीक देता असा संतापजनक सवाल विखे-पाटील यांनी यावेळी केला. कापसावरील बोंडअळी, धानावरील तुडतुडा आणि २०१६ मधील सोयाबीनची मदत शेतकऱ्यांना कधी देणार आहात? गेल्या तीन वर्षात हमीभावाची बोंब आहे. उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा ही फक्त धूळफेक आहे. विदर्भात कीटकनाशकांमुळे ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीत दोषी कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. हे कंपन्यांची दलाली करणार सरकार आहे, असा उद्विग्न सवालही विखे-पाटील यांनी केला.

मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्रमधून राज्यात किती गुंतवणूक झाली याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी त्यांनी केली. कमला मिल दुर्घटना, भीमा कोरेगावची सरकार पुरस्कृत दंगल यावरूही त्यांनी भाजप-शिवसेनेला लक्ष्य केले. मंत्रिमंडळातील हिऱ्यांचा उजेड कधी पडणार? पीएनबी घोटाळ्यातील मेहूल चोक्सी याने गीतांजली शोरुममध्ये दोन हजारांचे हिरे ब्रँडिंग करून पन्नास लाख रुपयांना विकले. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळातही नुसतेच ब्रँडिंग केलेले हिरे आहेत, त्यांचा उजेड काहीच पडत नाही, अशी टीकाही विखे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सरकारला सत्तेची मस्ती आली : मुंडे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, खोटारड्या, फसव्या, लबाड सरकारचा काउंटडाउन सुरू झाला आहे. आता शेतीमालाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या सरकारवर गेल्या चार वर्षात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता काय असा प्रश्न आहे. मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर महिना उलटला तरी त्यांचे वारसदार अजूनही मोबदल्यासाठी चकरा मारत आहेत. सरकारने त्यांना ५६ लाख रुपये मोबदला देऊ, अशी घोषणा केली. मात्र, गेल्या महिनाभरात त्यांच्या जमिनीच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली नाही. फसव्या घोषणा करणाऱ्या सरकारने खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. निवडणुकीत शिवाजी महाराजांचा जयजयकार करणाऱ्या सरकारला शिवजयंतीचा मात्र सोईस्कर विसर पडला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरकार जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करीत आहे. नगरमध्ये भाजपच्या उपमहापौराने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून त्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. या सरकारला सत्तेची मस्ती आली आहे, आता सर्वसामान्य नागरिकांनीच सरकारची ही मस्ती उतरवण्याचे ठरवले आहे, असा इशाराही मुंडे यांनी दिला. राज्यातील शेतकरी, बेरोजगारांच्या मनात आक्रोश आहे. राज्य दिवाळखोरीत गेल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, गेल्या तीन वर्षात १ लाख ७० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करून सरकारने देशात विक्रम केला आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणावरही सरकार स्पष्ट बोलत नाही. मंत्र्यांचा भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावळ स्वतःच्या खात्याचा उपयोग स्वतःसाठीच करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. या सर्व मुद्यांवर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नवाब मलिक, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शरद रणपिसे, संजय दत्त आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com