कृषी विभागातील पाच पुरस्कार्थींचे कौतुक 

राज्याच्या कृषी खात्यात उल्लेखनीय कामे केल्याबद्दल पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवारत्न पुरस्कार जाहीर झालेल्या पाचही पुरस्कार्थींचे कौतुक होत आहे.
Vikhe Patil Krishisevaratna award to five people
Vikhe Patil Krishisevaratna award to five people

पुणे : राज्याच्या कृषी खात्यात उल्लेखनीय कामे केल्याबद्दल पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवारत्न पुरस्कार जाहीर झालेल्या पाचही पुरस्कार्थींचे कौतुक होत आहे. 

कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक उदय देशमुख, रायगडच्या श्रीमती क्रांती चौधरी मोरे, हवेलीचे मंडळ कृषी अधिकारी सुनील लांडगे, कृषी पर्यवेक्षक दिलीप दळवी व पैठणचे कृषी सहायक वसंत कातबने पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी पुढील सेवाकालात आणखी चांगली सेवा देण्याचा निर्धार केला आहे. 

पुण्यातील मुख्य सांख्यिक देशमुख यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेची अंमलबजावणी शेतकरीभिमुख होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले. त्यांनी या योजनेच्या नियमावलीत वेळोवेळी सुधारणा केल्या. त्यामुळे केंद्र व राज्य शासनामधील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कामकाजाचे सतत कौतुक होत होते. पीकविमा, पीक कापणी प्रयोगाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा उल्लेखनीय ठरल्या. 

कोकणातील कृषी अधिकारी श्रीमती चौधरी यांनी लॉकडाउन कालावधीत राज्याच्या विविध भागांत शेतकरी ते ग्राहक हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. त्यांनी व्हॉट्‌सअॅपच्या माध्यमातून एक लाख शेतकऱ्यांना ग्राहक म्हणून शेकडो सोसायट्या जोडून दिल्या. कोकणातील चक्रीवादळानंतर शेतीमाल विक्रीचे त्यांचे उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरले. उत्पादकांसह, महिला बचत गट, होलसेलर्स, निर्यातदारांना या उपक्रमात आणून त्यांनी आतापर्यंत पाच कोटींची उलाढाल घडवून आणली आहे. 

पुणे जिल्ह्यातील मंडळ कृषी अधिकारी लांडगे हे अलीकडेच निवृत्त झाले आहेत. १९८३ पासून ते कृषी खात्यात विविध उपक्रम राबवत होते. चारसूत्री भातशेती, वनराई बंधारे उभारणी, फलोत्पादन, जलसंधारण, पश्‍चिम घाट विकास योजना, राष्ट्रीय पाणलोट विकास योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमात त्यांचा पुढाकार होता. लॉकडाउन काळात शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेत त्यांनी शेतकऱ्यांना आधार दिला होता. 

कोल्हापूरचे कृषी पर्यवेक्षक दळवी यांनी फळबाग लागवड व वनशेतीसाठी शेतकऱ्यांना मदत केली. पुष्पशेती, मसाला पिकांची लागवड, वैरण विकास, ऊस विकास, गांडूळ खत युनिट या योजनांच्या प्रसारात त्यांचा मोठा वाटा आहे. ३४ वर्षांच्या सेवेत त्यांनी हजारो शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळवून दिला. शेतकऱ्यांना सध्या देखील व्हॉट्‌सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे मार्गदर्शन मिळते आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी सहायक कातबने यांनी ३५ वर्षांच्या सेवेत २२ हजार विहिरींचे पुनर्भरण करण्यासाठी मार्गदर्शन केले. सुधारित पाभरींचा प्रचार, कडधान्य विकास, मृद्‌संधारण, फलोत्पादन यासाठी त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना मदत केली. त्यातून शेतकऱ्यांना समृद्ध होण्यासाठी मदत झाली.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com