पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी ग्रामस्थांचे धरणे

Villagers strike at Rena Project site against release water
Villagers strike at Rena Project site against release water

रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर) येथील रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी प्रकल्पस्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना हात हलवत परत जावे लागले. पाणी सोडण्याच्या विरोधात रेणापूरसह परिसरातील गावच्या नागरिकांनी प्रकल्पाच्या दरवाजासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. दिवस-रात्र हे आंदोलन सुरू आहे. पाणी न सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे.

रेणा प्रकल्पात सध्या जेमतेम पाणीसाठा आहे. अधिकाऱ्यांनी उपलब्ध २८ टक्के पाण्यापैकी रेणापूरसाठी आरक्षित असणारे पाणी वगळून इतर पाणी नदीपात्रात सोडण्याची तयारी केली होती. तीन दिवसांपूर्वी हे पाणी सोडण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अधिकाऱ्यांना पाणी सोडता आले नाही. त्यानंतर गुरुवारी (ता. २७) पहाटे अंधारात पाणी सोडले जाणार असल्याचे ग्रामस्थांना समजले. त्यामुळे बुधवारी (ता. २६) दुपारपासूनच ग्रामस्थ तंबू ठोकून धरणाच्या दरवाजासमोर ठिय्या आंदोलनासाठी बसले. 

दरम्यान, गुरुवारी सकाळी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एस.एन.हिबारे, शाखा अधिकारी पी.एन. गुंडरे पोलीस निरीक्षक गोरख दिवे पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले. पाणी सोडण्यासाठी आवश्यक तयारी झाली होती. प्रकल्पस्थळी काही काळ तणावही निर्माण झाला. कालवा समितीच्या सूचनेवरून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वास्तवित ६ डिसेंबर रोजी ती बैठक झाली असून त्याला बराच कालावधी उलटून गेला आहे. नंतरच्या काळात प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे. शिवाय कालव्यातून पाणी सोडण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडणे नियमबाह्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. 

रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, पानगावचे सरपंच सुकेश भंडारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक दहिफळे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गणेश वांगे उपस्थित होते. पडणारा पाऊस आणि उपलब्ध पाणी पाहता पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करावे. पाणी सोडणार नसल्याचे लेखी पत्र द्यावे, अशा मागण्या त्यांनी केल्या. कामखेडा सरपंच स्मिता गुडे, नगरपंचायतचे बांधकाम सभापती दत्ता सरवदे, पाणीपुरवठा सभापती उज्वल कांबळे, नगरसेवक एकनाथ आकनगिरे, अंतराम चव्हाण, प्रदीप राठोड, धनंजय म्हेत्रे, अच्युत कातळे, गोविंद राजे, दिलीप अकनगिरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 पाठिंब्यासाठी रेणापूर बंद

आंदोलनकर्त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या असून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन तहसीलदार राहुल पाटील यांनी दिले. तरीही ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन अजूनही सुरूच आहे. येथेच मुक्काम करणार असल्याचे आकनगिरे यांनी सांगितले. या ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रेणापूरकरांनी गुरुवारी शहर बंद उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com