गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६० टक्के नुकसान

राज्यात ठिकठिकाणी गावबंदीमुळे शेतमालाची पुरवठासाखळी विस्कळीत झाल्याने फळ व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले. ‘सकाळ माध्यम समूहा’ने राज्यातील२४ जिल्ह्यांतील ४५ गावांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र पुढे आले आहे.
गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६० टक्के नुकसान
गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६० टक्के नुकसान

कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे राज्यात लावलेली टाळेबंदी आणि काही गावांनी स्वतःहून केलेली सीमाबंदी यांमुळे ग्रामीण अर्थकारणाचे कंबरडे मोडले आहे. शेतमालाची पुरवठासाखळी विस्कळीत झाल्यामुळे फळ व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतात सडत असलेला शेतमाल आणि दुसरीकडे शहरांमध्ये शेतमालाचा तुटवडा व चढ्या भावाने विक्री, असे विसंगत चित्र दिसून आले. शिल्लक राहणारे दूध आणि कोसळलेले दर यांमुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला. अनेक ठिकाणी मजूर मिळत नसल्याने रब्बी पिकांची काढणी खोळंबली. शेतीकामांना टाळेबंदीतून वगळले असले, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या पातळीवर समन्वयाचा अभाव असल्यामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला. ‘सकाळ माध्यम समूहा’ने राज्यातील २४ जिल्ह्यांतील ४५ गावांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र पुढे आले आहे. गावबंदी, टाळेबंदीचे परिणाम

  •  बागायती शेतीमालाचे प्रचंड नुकसान
  •  काही शेतीमालाची विक्री, मात्र शेतकऱ्याला रास्त भाव नाही
  •  शहरात व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची कोंडी करून चढ्या भावात विक्री
  •  खेड्यांतील रोजगाराची साधने संपुष्टात, चलनपुरवठा ठप्प
  •  रब्बी काढणी, खरीप मशागत आदी शेतीकामांमध्ये मोठे अडथळे
  • महत्त्वाची निरिक्षणे... महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे व्यवहार पूर्णपणे विस्कळित झालेल्या ४५ गावांतील सरपंच, शेतकरी, तलाठी, कृषी सहायक, गावकामगार पाटील, खासगी व सहकारी दूध संस्थांचे चालक आदींशी चर्चा करून हे सर्वेक्षण करण्यात आले. येत्या काही दिवसांत शेती क्षेत्राला सावरण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, तर आगामी खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आ हे. तसेच, ग्रामीण अर्थकारण मंदीच्या वावटळीत सापडले असून त्यामुळे आर्थिक, सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, असे चित्र या सर्वेक्षणातून समोर आले. जिल्ह्यांच्या सीमा बंद असणे आणि मालवाहतुकीतील अडथळे यामुळे शेतमाल शहरांत पाठवणे अवघड झाले. त्यामुळे फळे व भाजीपाला पिकांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे. द्राक्ष, आंबा, कलिंगड, संत्री, मोसंबी या प्रमुख पिकांना सर्वाधिक फटका बसला, तर कांदा व इतर हंगामी भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. एरवी ७० ते ९० रूपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या द्राक्षाचे दर २० ते ३० रूपयांवर उतरले आहेत. रब्बी पिकांच्या काढणीत अडथळे आल्यामुळे गहू, हरभरा, कांदा, बटाटा तसेच द्राक्षालाही मोठा फटका बसला. मजूर, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रासायनिक किडनाशके, खते मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. ट्रॅक्टर व इतर शेती यंत्रांसाठी डिझेल सहजासहजी मिळत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. पतपुरवठ्याबरोबरच बियाणे, खते व इतर निविष्ठांचा पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नसल्यामुळे आगामी खरीप हंगामाची तयारी कशी करायची, या विवंचनेत शेतकरी आहेत. सकनेवाडीवर बेरोजगारीचे संकट सकनेवाडी (ता. जि. उस्मानाबाद) येथे सध्या पाईपलाईन, विद्युतपंप मिळत नाही. हे गाव उस्मानाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे बॅंकेत येऊन पैसे काढणे, जीवनावश्यवक वस्तूंची खरेदी यामध्ये अडथळे येत आहेत. गावातील १५० ते १७५ लोक बांधकाम क्षेत्रात सेंट्रींग कामगार आहेत. मात्र शहरातील बांधकामे बंद असल्याने ते बेरोजगार झाले आहेत. नारायणगावचे मोठे नुकसान  पुणे जिल्ह्यातील नारायणगाव फळे व भाजीपाला शेतीत देशातील अग्रगण्य गाव आहे. नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीत द्राक्ष, सीताफळ, डाळिंब या फळपिकांखाली दोनशे एकर क्षेत्र आहे. द्राक्षाची निर्यात युरोप, दुबई, चीन, मलेशिया, सिंगापूर, कुवेत आदी देशांत केली जाते. सीताफळ व डाळिंबाची विक्री मुंबई, पुणे व नाशिक येथील बाजारपेठेत होते. टाळेबंदीमुळे प्रामुख्याने द्राक्ष उत्पादकांना जबर फटका बसला.  नारायणगाव परिसरात उन्हाळी हंगामात टोमॅटो, कलिंगड, मिरची, कोबी, वालवड, फ्लॉवर, तोंडली, गवार, वांगी, काकडी, कांदा, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकाखाली सुमारे ७५० एकर क्षेत्र आहे. टाळेबंदीमुळे व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदी थांबवली.  स्थानिक शेतमजूर कामावर येणे बंद झाले. परप्रांतीय व लगतच्या जिल्ह्यातील शेतमजूर गावी निघून गेले.  पेट्रोल, डिझेलअभावी ट्रॅक्‍टरद्वारे फवारणीच्या व शेती मशागतीच्या कामास विलंब झाला. याचा परिणाम म्हणजे मागील एक महिन्यात काढणीस आलेला भाजीपाला व फुले शेतातच खराब झाले. त्यामुळे सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. यंदा पाणी उपलब्ध असूनही उन्हाळी हंगाम वाया गेला. रेशीम कोषांचे एक कोटीचे नुकसान देवठाणा (ता. पूर्णा, जि. परभणी) येथे ४२ एकर क्षेत्रावर रेशीम कोषाचे उत्पादन होते. एक शेतकरी एका महिन्यात दोन क्विंटल रेशीम कोषाचे उत्पादन काढतो. देनगन (तेलगंणा), हैदराबाद, रामनगर (कर्नाटक), जालना, बारामती व पूर्णा (महाराष्ट्र) येथे रेशीमकोष पाठवले जातात. टाळेबंदीमुळे एकट्या देवठाणा गावाचे एक कोटी चार लाख रूपयांचे नुकसान झाले. खरीप मशागतीवर परिणाम

  •  बियाणे, खते, औजारे व इतर निविष्ठांचा पुरवठा अद्याप सुरळीत नाही.
  •  शेतीकामांसाठी मजूर मिळत नाहीत.
  •  निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.
  •  ट्रॅक्टरसह इतर शेती यंत्रांना डिझेल मिळत नाही.
  •  अनेक गावांत खरीप हंगाम वाया जाण्याची भीती.
  • पाणीपुरवठ्यातील अडथळे

  •  विजेच्या अडचणीमुळे अनेक गावांत पाणी पुरवठ्यावर परिणाम. 
  • कृषी पंप व इतर औजारांच्या दुरूस्तीची दुकाने बंद असल्याने पाणी देण्यात अडचणी.
  • प्रादेशिक परिणाम

  •  पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका.
  •  पश्‍चिम महाराष्ट्रात पाण्याच्या उपलब्धतेमुळे बागायती पिकांचे प्रमाण अधिक. शेतमाल पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
  •  विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात दुग्ध व्यवसायाचे प्रमाण तुलनेने तोकडे.
  •  शिल्लक दूध आणि दरातील घसरण यांमुळे नुकसान झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाणही पश्‍चिम महाराष्ट्रातच सर्वाधिक.
  •  विदर्भात संत्री, मोसंबी उत्पादक पट्टा वगळता इतरत्र फळे व भाजीपाल्यांचे मोठे नुकसान नाही.
  •  विदर्भातील बहुतांश गावे कोरडवाहू असल्याने रबी हंगामाचे फारसे क्षेत्र नाही. त्यामुळे रब्बी पिकाच्या काढणीत अडथळे, खते, कीडनाशकांचा तुटवडा, रब्बी पिकांचे नुकसान आदी समस्या येथे जाणवल्या नाहीत.
  •  कोकणातील गावांत रब्बी पिकांची काढणी, खरीपाची तयारी यावर परिणाम नाही.
  • दूध धंद्यावर संक्रांत

  • दूध संकलनावर परिणाम.
  • दुधाच्या दरांत पाच ते वीस रुपयांची घट.
  • काही ठिकाणी मात्र खासगी दूध संकलन बंद झाल्याने सहकारी संघांचे दूध संकलन वाढले. उदा. दहिसर तर्फे मनोर ( ता. जि. पालघर). नरसिंगपूर ( ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा)
  • खरीप मशागतीवर परिणाम

  •  बियाणे, खते, औजारे व इतर निविष्ठांचा पुरवठा 
  • अद्याप सुरळीत नाही.
  • रब्बी पीक काढणीत अडथळे

  •  अनेक गावांत मजूर मिळत नसल्याने काढणीला आलेली पिके अद्याप शेतातच.
  •  पीक काढणीसाठी मजूर, ट्रॅक्टर, हार्वेस्टर मिळण्यात अडचणी.
  •  गहू, हरभरा, कांदा, बटाटा या पिकांना सर्वाधिक फटका.
  •  अनेक गावांत द्राक्ष बागांना अवकाळी पाऊस, गारपीटीचा सामना करावा लागला. परंतु कीडनाशके न मिळाल्यामुळे मोठे नुकसान.
  •  अनेक गावांत कामे लांबणीवर पडली, हंगाम पुढे गेला.
  •  ट्रॅक्टर दुरूस्ती व साहित्याची दुकाने बंद असल्याने अनेक कामांचा खोळंबा.
  •  परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील डिघोळ (ई) या गावात मात्र मुंबई, पुण्याहून मोठ्या संख्येने लोक परत आल्याने लवकर व स्वस्तात मजूर उपलब्ध झाले. रबी पिकांच्या काढणीसाठी त्याचा फायदा झाला.
  • सर्वेक्षणातील प्रमुख मुद्दे 

  • फळे, भाजीपाल्याचे नुकसान : माल-वाहतुकीतील अडथळ्यांचा सर्वाधिक फटका फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला.
  • काजूचे दर प्रति किलो १२५ रूपयांवरून ८० रुपयांवर उतरले.
  • कोकणात हापूस आंब्याचे मोठे नुकसान.
  • नाशिक जिल्ह्यात कवडीमोल भावाने द्राक्ष विकावे लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
  • मणेराजूरी (ता. तासगाव, जि. सांगली) या गावाचे द्राक्ष पिकात सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान.
  • कडवंची (जि. जालना) गावाची द्राक्ष निर्यात ७२ कोटी रुपयांवरून थेट २० कोटींवर.
  • कलिंगडाचे दर निम्म्यावर.
  • कांद्याचे दर प्रति क्विंटल दोन ते अडीच हजार रूपयांवरून थेट ६०० ते ९०० रूपयांवर उतरले.
  • देऊर (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावामध्ये सुमारे ४०० एकर क्षेत्रावरील काढणी केलेला २५ ते ३० टन कांदा पडून.
  • भाजीपाला विक्री ठप्प झाल्याने तुंग (ता. मिरज, जि. सांगली) गावाचे सुमारे १० कोटी रूपयांचे नुकसान.
  • असे झाले सर्वेक्षण

  • जिल्हे - २४
  • गावे - ४५
  • सरपंच, शेतकरी, तलाठी, कृषी सहायक, गावकामगार पाटील, खासगी व सहकारी दूध संस्थांचे चालक आदींशी चर्चा करून ‘सकाळ’च्या बातमीदारांमार्फत माहिती संकलन
  • हिवरे बाजार दरवर्षी लॉकडाउन करणार कोरोनाच्या संकटाला घाबरून न जाता त्यातून मार्ग काढण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यासाठी गेल्या ३० वर्षांतील शिस्त कामी आली. पोलिस, महसूल यंत्रणेला गावात हस्तक्षेप करण्याची गरजही भासली नाही. सगळ्यात पहिल्यांदा फिजिकल डिस्टन्सिंग बाळगून रेशनगिंचे नियोजन केले. हात स्वच्छ धुण्याची सवय गावकऱ्यांना होतीच. त्यामुळे सॅनिटायजरचे वाटप आणि वापर सुरळीत झाला. हिवरेबाजार तसेच शेजारील गावांतील शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था लावून दिली. मुंबई-पुण्याला असणाऱ्या गावातील ७८ लोकांशी संपर्क साधला. त्यांना गावात सुखरूपपणे आणून क्वारन्टाईन करण्यात आले. आरोग्यपथक त्यांच्या घरी जाऊन दोन वेळा तपासणी करते. लॉकडाऊनच्या काळात गावातली शेतीची सगळी कामे सुरळीत चालू राहिली. तसेच पड जमीन लागवडीखाली आणण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना कुटुंबासाठी अधिक वेळ देता येत आहे, गावातील छोट्या-मोठ्या कुरबुरी जवळपास संपल्या आहेत, संवाद वाढला आहे, सौहार्दाचे वातावरण अधिक बळकट झाले आहे. लोकांचे आरोग्य सुधारले आहे. हे फायदे लक्षात घेता पुढील वर्षापासून किमान पाच दिवस गाव स्वतःहून लॉकडाऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. - पोपटराव पवार,  आदर्श सरपंच, हिवरेबाजार व कार्याध्यक्ष, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com