वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन 

माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (ता.२३) रात्री ११.४५ वाजता निधन झाले. नाशिक अमरधाम येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर शनिवार (ता.२४) अंत्यसंस्कार करण्यात आले.
vinayakdada patil
vinayakdada patil

नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात आपल्या खास शैलीने छाप पडणारे आणि कृषी, सहकार, वन संवर्धन, ग्रामविकास, साहित्य व सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविणारे माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (ता.२३) रात्री ११.४५ वाजता निधन झाले. नाशिक अमरधाम येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर शनिवार (ता.२४) अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शेतकरी कुटुंबातील विनायकदादा यांचा कुंदेवाडीचे (ता.निफाड) सरपंच ते मंत्री असा थक्क करणारा प्रवास आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटविला. निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, कुंदेवाडी विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे देण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

‘पुलोद’ मंत्रिमंडळात शरद पवार यांचे ते सहकारी होते. साहित्यक्षेत्रातही त्यांचा व्यासंग मोठा होता आणि त्यांनी लेखक म्हणूनही लौकिक संपादन केला. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक अशा त्यांच्या या प्रयोगाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. त्यासाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 'बायफ' संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करताना आदिवासी भागात आंबा, काजू, करवंद लागवड व विक्री यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. यासह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ११ विधवा महिलांना विशेष मदत करून नवजीवन प्रकल्प त्यांनी राबविला. 

अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, खासदार डॉ. भारती पवार, आमदार दिलीपराव बनकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे,'मविप्र' संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते.  प्रतिक्रिया कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे, राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व गमावले आहे.  - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

विनायकदादा पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, साहित्याची जाण असलेले व सामाजिक बांधिलकी जपणारे राजकीय व्यक्तिमत्त्व हरपले.  - खासदार शरद पवार   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com