पूरग्रस्तांच्या मदतीतून घडले एकतेचे दर्शन ः खोत

पूरग्रस्तांच्या मदतीतून घडले एकतेचे दर्शन ः खोत
पूरग्रस्तांच्या मदतीतून घडले एकतेचे दर्शन ः खोत

वर्धा ः पश्चि‍म महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांत आलेल्या महापुरात लोक संकटात सापडली. या वेळी महाराष्ट्रातील जनता जाती, धर्मभेद विसरून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली. संकटाच्या काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले. असाच एकसंघपणा राज्याच्या विकासासाठी दाखवावा, असे आवाहन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.  भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलिस अधीक्षक बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर या वेळी उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आलेल्या वर्धेतील गणेश वाजपेयी यांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच वर्धेतून सुरू झालेल्या शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी यांच्या योगदानाबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.  या वेळी सदाभाऊ खोत म्हणाले, विदर्भातील सिंचन, रस्ते आणि कृषिपंपाचा अनुशेष दूर करण्यासाठी या सरकारने भरीव काम केले आहे. ३० वर्षांपासून रखडलेल्या निम्न वर्धा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. प्रधानमंत्री कृषी सिचंन योजनेत या प्रकल्पाचा सामवेश करण्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या वार रुममध्ये याबाबत वेळावेळी आढावा घेण्यात आला. त्यामुळे पुनर्वसन आणि कालव्यांची १०० टक्‍के कामे करण्यात आली. उर्वरित कामे २०२० पर्यंत पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने या प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.  विदर्भातील अनेक महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये वर्धेतून जाणारा बुटीबोरी-तुळजापूर, वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी, आर्वी-आष्टी आणि नागपूर-मुंबई या महामार्गांचे काम वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यातील ९० हजार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे.  प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. त्यातील पहिला हप्ता थेट खात्यात जमा करण्यात आला आहे. मागील चार वर्षांत ६७९ गावांमध्ये जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत विविध विभागांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com