थकीत वेतनासाठी ‘विठ्ठल’च्या कामगारांचे आंदोलन 

Vitthal workers' agitation for salaried wages
Vitthal workers' agitation for salaried wages

पंढरपूर, जि. सोलापूर : गेल्या ११ महिन्यांचा थकीत पगार आणि इतर देणी मिळावीत, या मागणीसाठी गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आक्रमक झालेल्या कामगारांनी कारखान्यातून बगॅस घेऊन जाणाऱ्या गाड्या आडवून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. 

कारखान्याची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे कारखाना बंद आहे. कारखाना बंद असल्याने त्याचे परिणाम तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कामगारांवर झाले आहेत. गेल्या ११ पेक्षा अधिक महिन्यांपासून कामगारांना पगार मिळाला नाही. थकीत वेतनामुळे ‘विठ्ठल’च्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या अनेक कामगार रोजंदारीने मजुरी करू लागले आहेत. अशा परिस्थितीत संचालक मंडळाने थकीत वेतन देण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु संचालक मंडळाने दिलेले आश्‍वासन पाळले नसल्यामुळे पुन्हा कामगार थकीत वेतनाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. 

वेतन नसल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कारखान्याच्या सर्व विभागांच्या कार्यालयांना टाळे ठोकून दिवसभर कामकाज बंद ठेवले होते. कामगारांनी पुकारलेल्या अचानक आंदोलनामुळे कारखान्याचे सर्वच कामकाज ठप्प झाले. कारखान्याने विक्री केलेल्या बगॅसचीदेखील कामगारांनी वाहतूक रोखली आहे. जवळपास १५ हून अधिक बगॅस भरलेल्या ट्रक प्रवेशद्वारावरच रोखून धरल्या आहेत. जोपर्यंत थकीत वेतन मिळणार नाही, तोपर्यंत कारखान्यातून बगॅस किंवा साखरेचे एक पोतेही बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. 

आंदोलनात रामभाऊ आंबुरे, पोपट शेळके, जोती कुंभार, दत्तात्रय निर्मळ, रामभाऊ चव्हाण आदींसह कामगार सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलनाला बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, माजी संचालक शेखर भोसले, काशिनाथ लवटे यांनी पाठिंबा देत कामगारांच्या कायम उभी असल्याचे सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com