दुधापासून व्होडका होतेय अमेरिकेत लोकप्रिय

Vodka made from milk
Vodka made from milk

दूध हे तुलनेने फारच कमी काळासाठी टिकवून ठेवता येते. या तुलनेमध्ये त्यापासून तयार केलेली व्होडका दीर्घकाळ टिकविणे शक्य आहे. यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवे दालन उपलब्ध होणार आहे. अमेरिकेतील ओरेगॉन राज्यामधील एका शेतकऱ्याने काऊकोहोल हा व्होडकाचा एक ब्रॅंड तयार केला आहे. दुधाच्या प्रक्रियेमध्ये आंबवलेल्या पेयांना मोठा इतिहास आहे. अगदी १३ व्या शतकामध्ये चेंगीझखानाच्या लष्करामध्ये घोडीचे दूध आंबवून बनवलेले पेय पिले जाई. जॉर्जिया आणि रशिया या दरम्यानच्या कौकॅसस पर्वतीय प्रदेशातील भटके मेंढपाळ दूध धान्यांसोबत आंबवून त्यापासून केफीर नावाने पेय तयार करत. त्याचा वापर शेकडो वर्षापासून केला जातो.  

  • पारंपरिक व्होडका बटाटा किंवा मोहरीसारख्या धान्यापासून बनवली जाते. दुधाच्या निवळीपासून व्होडका तयार करण्याची प्रक्रिया ही एकापेक्षा अधिक पायऱ्यांची आहे. विशेषतः प्रत्येक पौंड चीज निर्मितीमागे सुमारे ९ पौंड निवळी तयार होते. ही वेगळी केलेली निवळी विशिष्ट अशा यिस्टच्या साह्याने आंबवली जाते. त्यानंतर त्याचे ऊर्ध्वपातन केले जाते. परिणामी तयार होणारे पेय पारंपरिक व्होडकापेक्षा अधिक मलईदार आणि गोड असते. दुधापासूनच्या व्होडकाची चव अत्यंत चांगली असून, त्यामुळे चीज उद्योगातून शिल्लक राहणाऱ्या व्हे किंवा निवळीची विल्हेवाट लावण्याच्या समस्येवर मात करता येऊ शकते. या कारणामुळेही ती अधिक पर्यावणपूरक ठरते.    
  • उत्तर अमेरिकेमध्ये दुधाच्या निवळी आंबवून त्याचे डिस्टिलेशन केल्यानंतर तयार केलेली व्होडका लोकप्रिय होत आहे. दुधापासून स्पिरीट तयार करण्यासाठी विविध दुग्ध उद्योगांनी परिसरातील आसवणी किंवा ऊर्ध्वपतन केंद्रासोबत (डिस्टिलरीज) करारही केले आहेत. ओरेगॉन राज्यातील टॉड कोच यांचे कुटुंब गेल्या वीस वर्षापासून २० गायींचे पालन करतात. या गायींपासून उपलब्ध होणाऱ्या दुधापासून विविध उत्पादन तयार करतात. त्याची डेअरी टीएमके क्रिमरी ही २०१७ पासून चीज उत्पादन करत आहे. यातून सध्या वाया जाणाऱ्या निवळीपासून व्होडका तयार केला आहे. या व्होडकाचा काऊकोहोल हा ब्रॅंड विकसित केला आहे.  
  • निवळीपासून व्होडका तयार करण्याबाबतचे ओरेगॉन राज्य विद्यापीठामध्ये झालेले संशोधन एकदा कोच यांच्या वाचनात आले. त्यांनी विद्यापीठातील सहायक प्रा. पॉल ह्युजेस यांच्याशी संपर्क साधला. एकूण माहिती घेत उत्पादनाला सुरुवात केली.
  • तज्ज्ञांचे मत...

  • पॉल ह्युजेस यांनी निवळीपासून व्होडका तयार करण्याबाबत परिसरातील १० दुग्ध प्रक्रिया केंद्रांशी याबाबत चर्चा केली असून, पुढील वर्षामध्ये त्यांची ही उत्पादने बाजारात येऊ शकतील. या प्रकल्पाचे व्यावसायिक फायदे सांगताना ह्युजेस म्हणाले की, जर एखाद्या दुग्ध प्रक्रिया उद्योगातून ४० डॉलर प्रति पौंड इतक्या किमतीने चीज विकले जाते, अशा केंद्रातून कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय व्होडका हे उत्पादन तयार करणे शक्य आहे. उलट अशा केंद्रातून शिल्लक राहणाऱ्या निवळीची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी जितका खर्च तो कमी करणे शक्य होते.
  • आम्ही त्याच दुधापासून आणखी एक उत्पादन बनवत आहोत. एखाद्या कच्च्या मालापासून शक्य तितके उपयुक्त भाग मिळवत असल्याने डेअरी अधिक फायदेशीर करणे शक्य होत आहे. - टॉड कोच, डेअरी व दुग्ध प्रक्रिया उद्योजक, ओरेगॉन.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com