सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंना सर्वाधिक मताधिक्‍य

खासदार उदयनराजे भोसले
खासदार उदयनराजे भोसले

सातारा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालात शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये बॅकलॉग भरून काढत सातारा विधानसभा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्‍य देणारा मतदारसंघ ठरला आहे. पाटण मतदारसंघाने नरेंद्र पाटील यांना सर्वाधिक मताधिक्‍य दिले. 

विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवत सातारा लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची केली होती. युती झाल्यामुळे मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यानंतरही भाजपने आपल्या पक्षातील नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळवून दिली. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे निवडणुकीला सामोरे जात संपूर्ण मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण केले होते. लोकांमध्ये चर्चा घडवून आणण्याचे कसबही भाजपने पुरेपूर वापरले. त्यामुळे कधी नव्हे ते निवडणुकीचा अंदाज बांधताना पोलिसही बुचकळ्यात पडले होते. उदयनराजे यांचे मताधिक्‍य अत्यंत कमी होईल, असा अंदाज होता. मताधिक्‍य घटले. परंतु, तरीही सव्वा लाखावर मताधिक्‍य मिळविण्यात ते यशस्वी झाले. या मताधिक्‍यामध्ये सर्वाधिक वाटा सातारा विधानसभा मतदारसंघाने उचलला आहे. 

मतमोजणीला सुरवात झाल्यावर सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना पहिल्याच फेरीत फटका बसला होता. तब्बल सात फेऱ्यांपर्यंत नरेंद्र पाटील यांनाच मताधिक्‍य होते. त्यानंतर या मतदारसंघात उदयनराजे यांना मताधिक्‍य मिळण्यास सुरवात झाली. रात्री विसाव्या फेरीअखेर हे मताधिक्‍य ३४ हजारांपर्यंत गेले होते. तरीही अन्य मतदारसंघांच्या तुलनेत सातारा पिछाडीवर होता. स्वत:च्या हक्काच्या मतदारसंघातच हा फटका बसला होता. मात्र, शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये साताऱ्याने उदयनराजे यांना भरभरून साथ दिली. या तीन फेऱ्यांमध्येच सुमारे ११ हजारांचे मताधिक्‍य त्यांना मिळाले. त्यामुळे मतमोजणीच्या शेवटी उदयनराजे यांचे मताधिक्‍य ४४ हजार ९५७ वर गेले. त्यामुळे सातारा हा उदयनराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्‍य देणार मतदारसंघ ठरला. 

कऱ्हाड उत्तर मतदारसंघाने उदयनराजे भोसले यांना पहिल्यापासून साथ दिली. प्रत्येक फेरीमध्ये त्यांचे मताधिक्‍य वाढत होते. अंतिमत: या मतदारसंघातून उदयनराजे यांना ३८ हजार ९६३ असे मताधिक्‍य राहिले. त्याच्या खालोखाल कोरेगाव मतदारसंघाने ३३ हजार ४२७ तर, वाई मतदारसंघाने ३२ हजार ३१२ मतांचे मताधिक्‍य उदयनराजे यांना दिले. या तीनही मतदारसंघांतून उदयनराजे भोसले यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत मताधिक्‍य राहिले. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना केवळ दोन मतदारसंघांमध्ये मताधिक्‍य मिळाले. त्यातही त्यांच्या स्वत:च्या पाटण मतदारसंघामध्ये त्यांना सर्वाधिक १८ हजार ३१४ मतांचे मताधिक्‍य मिळाले. कऱ्हाड दक्षिणमध्ये त्यांना अपेक्षप्रमाणे मताधिक्‍य मिळाले नाही. दक्षिणमध्ये त्यांना केवळ चार हजार ८२८ मताधिक्‍यावर समाधान मानावे लागले. नरेंद्र पाटील यांना ४०, तर उदयनराजे भोसले यांना ५१ टक्के मते मिळाली.     

उदयनराजे भोसले यांना मिळालेली मतदारसंघनिहाय मते 
विधानसभा मतदारसंघ २०१४  २०१९
वाई  ९०,०३३ १,०६,७५४ 
कोरेगाव ९३,०५० १,००,५१६
कऱ्हाड उत्तर ९३,६२० १,०४,४३७
कऱ्हाड दक्षिण ६१,६४८ ८१,८२९
पाटण  ७१,८३२ ६७,८३८
सातारा १,११,९७०  १,१४,७०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com