सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत

सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता. २१) विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पाणी फिरण्याची शक्‍यता होती. पण सकाळी नऊ वाजता पावसाने काहीशी उघडीप दिल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. शहरासह ग्रामीण भागात दिवसभर पावसाचे सावट राहिले. जिल्ह्यात सरासरी ६४.२६   टक्के इतके मतदान झाले. दरम्यान, करमाळ्यात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील आणि अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या समर्थकातील हाणामारी, कुठे शाब्दिक बाचाबाची तर कुठे यांत्रिक बिघाडामुळे ताटकळलेले मतदार आणि अधिकाऱ्यांशी वादावादी हे किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. 

जिल्ह्यात विधानसभेचे ११ मतदारसंघ आहेत. त्यापैकी ३ मतदारसंघ सोलापूर शहराशी निगडित आहेत. बाकी सर्व आठ मतदारसंघ ग्रामीण भागात आहेत. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून प्रमुख पक्षांमध्ये प्रचारात येथे चुरस राहिली. तशीच चुरस मतदानातही दिसून आली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडतो आहे. सोमवारी मध्यरात्रीही पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने मतदान कसे होणार? याबाबत प्रशासनाला चिंता होती. रात्री दोन वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी नऊ वाजेपर्यंत बरसतच होता. त्यामुळे अत्यंत तुरळक संख्येने लोक मतदानासाठी बाहेर पडत होते. 

सकाळी नऊ वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर केवळ २ टक्के मतदान झाले होते. नऊच्या नंतर पावसाने काहीशी उघडीप घेतली. तसा मतदानाचा टक्का वाढत गेला. दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास ३० टक्क्यांच्या घरात मतदान पोचले. दुपारी हाच आकडा ४३.५१ टक्क्यांवर गेला. या सगळ्यामध्ये प्रशासनासह नेतेमंडळींनाही असणारी चिंता काहीशी कमी झाली. पण पाऊस आणि अन्य कारणांमुळे दिवसभर जिल्ह्यात विविध घटना घडल्या. सोलापुरात जुना बोरामणी नाका येथील मातंग समाजात घरात पाणी शिरल्यामुळे येथील लोकांनी भर रस्त्यावर घाण पाण्यात चहा शिजवून आपला निषेध व्यक्त केला. तसेच मतदानावर बहिष्कार टाकला. 

माढ्यात बूथ क्रमांक ११ मधील मतदान यंत्र बंद पडल्याने अर्धा तास मतदान प्रक्रिया बंद पडली. प्रशासनाने तातडीने दुसरे मतदान यंत्र मागवून लगेच मतदान प्रक्रिया सुरू केली. पण तोपर्यंत मतदार ताटकळत बसले. कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथेही मशिनमधील बिघाडामुळे काही काळ मतदान थांबले. तर दुसरीकडे भोगावती नदीला पाणी आल्याने मोहोळ तालुक्‍यातील वाळुज येथे तसेच हरणा नदीला पूर आल्याने अक्कलकोट तालुक्‍यातील मुस्ती मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना वाहनांना आणण्याची सोय प्रशासनाला करावी लागली. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील बोरामणी, दर्गणहळ्ळी, धोत्री, कर्देहळ्ळी, शिरपणहळ्ळी,  वडगाव, लिंबिचिंचोळी, कुंभारी, उळे, कासेगाव, मुस्ती यासह २० गावांतील लोकांनी उजनी धरणाच्या पाण्यासाठी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. पण आश्‍वासनानंतर या ठिकाणी बहिष्कार मागे घेत मतदान झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास टाकला.

करमाळ्यात हाणामारी करमाळा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार, आमदार नारायण पाटील समर्थक आणि अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या समर्थकात मतदानाच्या चुरशीवरून दहिवली गावात जोरदार हाणामारी झाली. यात बाळू जगताप, बापूसाहेब जगताप, संतोष देवकर, पिंटू जगताप, औदुंबर खोचरे, गणेश जगताप, अनिल जगताप हे कार्यकर्ते जखमी झाले. यातील जखमीवर टेंभुर्णीत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने गंभीर प्रकार टळला.

मतदाराच्या परस्पर पोस्टल मतदानाचा प्रकार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील वेळापूर येथील बूथ क्र. ९९७ वरील १११५ क्रमांकाचे विनायक रामचंद्र माने हे शेतकरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले असता, तुमचे मतदान पोस्टल झाले आहे, असे सांगून त्यांना मतदान केंद्रातून बाहेर काढण्यात आले. याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख व मिसाळ यांनी त्यांचा आमच्याकडे अर्ज आहे असे सांगितले. तर शेतकरी विनायक माने म्हणाले, की मी असा कोणताही अर्ज दिलेला नाही. त्यामुळे या प्रकारामुळे काहीकाळ गोंधळ उडाला. पण माने यांना शेवटपर्यंत मतदान करता आले नाही. सोलापूर जिल्हा अंतिम टक्केवारी १) करमाळा (२४४) - ६८.०५ टक्के २) माढा (२४५) - ६९.०७ टक्के ३) बार्शी (२४६)- ७२.०० टक्के ४) मोहोळ (२४७)- ६५.०४  टक्के ५) शहर उत्तर (२४८)- ५२.३७ टक्के ६) शहर मध्य ( २४९)- ५४.८९ टक्के ७) अक्कलकोट-(२५०-६२.०० टक्के ८) सोलापूर दक्षिण (२५१)-५१.८६  टक्के ९) पंढरपूर (२५२)- ७३.६५ टक्के १०) सांगोला (२५३)- ७१.५२ टक्के ११) माळशिरस (२५४)- ६६ टक्के एकूण जिल्हा टक्केवारी - ६४.२६ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com