चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे यंदाचे ऊसभूषण

चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे यंदाचे ऊसभूषण
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे यंदाचे ऊसभूषण

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उत्सुकता लागून असलेले वसंतदादा  शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) ''ऊसभूषण पुरस्कार'' जाहीर झाले आहेत. २०१७-१८ हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी चवगोंडा पाटील यांना पूर्वहंगामी गटात, साताऱ्याचे सौरभ कोकीळ यांना सुरू गटामध्ये, तर कोल्हापूरच्या मारुती शिंदे यांनी खोडवा गटात पहिला क्रमांक पटकावल्यामुळे ते ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट कारखाना श्रेणीत वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारसाठी रेणा साखर कारखान्याची (दिलीपनगर, निवाडा, ता. रेणापूर, जि. लातूर) निवड करण्यात आली.  मांजरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्हीएसआयचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्या (ता.१५) डिसेंबरला दुपारी १ वाजता व्हीएसआयच्या मुख्यालयात पुरस्कार वितरण होणार आहे. व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, तसेच संचालक (कृषी) विकास देशमुख यांनी गुरुवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. या वेळी साखर अभियंता के. आर. पाटील व राजेंद्र चांदगुडे, साखर तंत्रज्ञ आर. व्ही. दाणी, शास्त्रज्ञ डॉ. दीपाली निंबाळकर व डॉ. अशोक निकम उपस्थित होते.  पूर्वहंगामी गटात को- ८६०३२ वाणाचे हेक्टरी ३२८.४३ टन उत्पादन घेणारे चवगोंडा अण्णा पाटील हे शिरोळ भागातील दानोळीचे शेतकरी आहेत. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ते सभासद आहेत. श्री. पाटील यांना दहा हजारांचा कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. साता-याच्या कोरेगाव भागातील धामणेरचे शेतकरी श्री. सौरभ विनयकुमार कोकीळ यांनी को-८६०३२ वाणाचे सुरू हंगामात हेक्टरी ३०६.६१ टन उत्पादन घेतले आहे. त्यांना दहा हजारांचा कै. वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला असून, ते कराडच्या जयवंत शुगर साखर कारखान्याचे सभासद आहेत.  हातकणंगले भागातील वाठारमध्ये को-८६०३२ वाणाचे खोडव्यात हेक्टरी २८६.६६ टन उत्पादन घेणारे शेतकरी मारुती ज्ञानू शिंदे हे तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे सभासद आहेत. त्यांना दहा हजारांचा कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार मिळाला आहे. 

विभागनिहाय ऊसभूषण पुरस्काराचीदेखील घोषणा या वेळी करण्यात आली. स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दक्षिण विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतक-यांची नावे अशी ः पूर्व हंगामासाठी प्रथम क्रमांक सौ. शोभा धनाजी चव्हाण, घोंगाव, ता. पलूस, जि. सांगली (उत्पादन- हेक्टरी ३२८.४१, वाण- कोएम ०२६५, कारखाना-राजारामबापू पाटील कारखाना), सुरू हंगामासाठी प्रथम क्रमांक मोहन भरमा चकोते, मु. पो. नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, (उत्पादन- हेक्टरी २२४.९८, वाण- को ८६०३२, कारखाना-दत्त शेतकरी), खोडवा गटात प्रथम क्रमांक दत्तात्रय श्रीपती चव्हाण, मु. पो. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली (उत्पादन- हेक्टरी २६३.३८, वाण- को ८६०३२, कारखाना-डॉ. पतंगराव कदम सोनहिरा).

मध्य विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतक-यांची नावे अशीः पूर्व हंगामासाठी प्रथम क्रमांक शिवाजी गजेंद्र पाटील, मु. पो. नेवरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर, (उत्पादन- हेक्टरी २६१.०६, वाण- कोएम ०२६५, कारखाना-शंकरराव मोहिते पाटील), सुरू हंगामासाठी प्रथम क्रमांक प्रकाश बाळासाहेब ढोरे, मु. पो. वडगाव, ता. मावळ, जि. पुणे, (उत्पादन- हेक्टरी २२५.८३, वाण- को, कारखाना- संत तुकाराम), खोडवा गटात प्रथम क्रमांक तानाजी बळी पवार, मु. पो. लवंक, ता. माळशिरस, जि. सोलापूर (उत्पादन- हेक्टरी २४३.२४, वाण- को ८६०३२, कारखाना-शंकरराव मोहिते पाटील). 

उत्तरपूर्व विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतक-यांची नावे अशीः पूर्व हंगामासाठी प्रथम क्रमांक श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, मु. पो. बाभळगाव, ता. जि. लातूर, (उत्पादन- हेक्टरी ३२१.२१, वाण-व्हीएसआय ०८००५, कारखाना-विलास सहकारी कारखाना), सुरू हंगामासाठी प्रथम क्रमांक कोणालाही मिळालेला नाही, खोडवा गटात प्रथम क्रमांक रविकिरण मोहन भोसले, मु. पो. खामसवाडी, ता. खामसवाडी, ता. जि. उस्मानाबाद (उत्पादन- हेक्टरी १८१.४२, वाण- कोसी ६७१, कारखाना-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी कारखाना). 

-रेणा सहकारी साखर कारखाना ठरला सर्वोत्कृष्ट-  राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कारखान्याचा कै. वसंतदादा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार रेणापूर (जि. लातूर) येथील रेणा सहकारी साखर कारखान्याने मिळावला आहे. अडीच लाख रुपये, मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एक लाख रुपये व मानचिन्ह असलेला कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार कागल(जि. कोल्हापूर) येथील छत्रपती शाहू कारखान्याला मिळाला आहे.  कै. डॉ. अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या नावाने एक लाख रुपये व मानचिन्ह असलेला ऊस विकास व संवर्धनासाठीचा पुरस्कार जुन्नर (जि. पुणे) येथील विघ्नहर साखर कारखान्याला जाहीर करण्यात आला. 

कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनालाचा पुरस्कार पलूस (जि. सांगली) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. कै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार कडेगाव (जि. सांगली) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने प्राप्त केला. कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवानी पुरस्कार यंदा दौंड (जि. पुणे) येथील दौंड शुगर कारखान्याने मिळवला आहे. 

छत्रपती, नीरा, रेणाचे आर्थिक व्यवस्थापन उत्कृष्ट साखर कारखानदारीमध्ये उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. दक्षिण विभागात कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने, तर मध्य विभागामध्ये इंदापूरच्या नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळवला आहे. उत्तर-पूर्व विभागात रेणा सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार पटकावला. मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

ऊस संर्वधनात क्रांतिअग्रणी, विठ्ठलराव आघाडीवर ऊस विकास व संवर्धनात दक्षिण विभागात पलूसच्या क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळावला. मध्य विभागात माढा येथील विठठ्लराव शिंदे कारखाना सरस ठरला. मात्र, उत्तर पूर्व विभागात कोणत्याही कारखान्याला हा पुरस्कार मिळाला नाही.   विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार  तांत्रिकदृष्ट्या उत्तम कामगिरी करणा-या कारखान्यांना व्हीएसआयकडून कार्यक्षमता पुरस्कार दिला जातो. यंदा दक्षिण विभागातून खानापूर (जि. सांगली) येथील उदयगिरी शुगर कारखान्याला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. द्वितीय पुरस्कार करवीरच्या कुंभी कासारी कारखान्याने, तर तृतीय पुरस्कार पलूसच्या क्रांतिअग्रणी लाड कारखान्याने मिळवला. 

मध्य विभागात तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिला पुरस्कार कर्जतच्या अंबालिका कारखान्याला, द्वितीय पुरस्कार अकोल्याच्या अगस्ती कारखान्याला आणि तृत्तीय पुरस्कार इंदापूरच्या मोहिते पाटील कारखान्याला मिळाला आहे. उत्तर पूर्वमध्ये पहिल्या क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार लातूरच्या मांजरा कारखान्याला, द्वितीय पुरस्कार लातूरच्या विलास कारखान्याला मिळाला आहे. तृतीय पुरस्कारासाठी कन्नडचा बारामती अॅग्रो कारखाना पात्र ठरला आहे.

थिटे ठरले उत्कृष्ट मुख्य शेती अधिकारी राज्याच्या साखर कारखान्यांमधील कर्मचा-यांचाही व्हीएसआयकडून विविध पुरस्कारांनी गौरव केला जातो. दहा हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोलापूर जिल्ह्यातील विठठ्लराव शिंदे साखर कारखान्याचे संभाजी पांडुरंग थिटे यांना यंदाचा उत्कृष्ट मुख्य शेती अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. 

इतर पुरस्काराची नावे अशीः उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी आर. के. गोफणे (दौंड शुगर, दौंड, जि. पुणे), उत्कृष्ट चीफ इंजिनियअर गजेंद्र गिरमे (नीरा भीमा साखर कारखाना, जि. पुणे), उत्कृष्ट चीफ केमिस्ट संजय साळवे (जवाहर शेतकरी कारखाना,कोल्हापूर), उत्कृष्ट मुख्य लेखापाल अमोल पाटील (राजारामबापू पाटील कारखाना, जि. सांगली), उत्कृष्ट आसवानी व्यवस्थापक धैर्यशील रणवरे (मोहिते पाटील कारखाना, पुणे), उत्कृष्ट कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार रणवरे (विठ्ठलराव शिंदे कारखाना, सोलापूर). व्हीएसआयमधील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून तंत्रज्ञ राजेंद्र चांदगुडे, कृषी सहायक संतोष वाघमारे, चालक सिकंदर शेख यांना पुरस्कार मिळाला आहे. दहा हजार रुपये व मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com