‘व्हीएसआय’चा विस्तार जगभर व्हावा ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठवाड्यात ‘व्हीएसआय’चं संशोधन केंद्र होण्यासाठी जागा हवी होती. ती दिल्याचं समाधान आणि अभिमानदेखील मला आहे.
vsi
vsi

पुणे ः मराठवाड्यात ‘व्हीएसआय’चं संशोधन केंद्र होण्यासाठी जागा हवी होती. ती दिल्याचं समाधान आणि अभिमानदेखील मला आहे. आता राज्याच्या इतर भागांतही या संस्थेची केंद्रे व्हावीत. पण त्यावरही न थांबता देशात आणि पुढे जगात देखील ‘व्हीएसआय’ची विस्तार केंद्रे स्थापन करायला हवीत, असे आग्रही प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मांजरी येथे ‘व्हीएसआय’ मुख्यालयात शनिवारी (ता. ९) झाली. या सभेला ऑनलाइन हजेरी लावताना मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील व हर्षवर्धन पाटील व इतर मान्यवर सभेला उपस्थित होते. 

यशस्वी शेतीचा मार्ग दाखवला  ‘‘राष्ट्रीय पातळीवर ‘व्हीएसआय’चे स्थान बळकट होण्याकरिता देशात केंद्रे निर्माण करावी लागतील. त्यासाठी जागा मिळवण्यासाठी आपल्या सर्वांना पुढाकार घ्यावा लागेल. त्यानंतरही न थांबता जगात देखील या संस्थेची केंद्रे उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत. एक दिवसभर जाऊन ही संस्था पाहण्याची माझी इच्छा आहे. तेथील संशोधनाबाबत मला कुतूहल आहे. मराठवाड्यात या संस्थेला जागा हवी होती. ती दिल्याचे समाधान मला आहे. कारण शेती करणे अवघड झालेले असताना प्रयोग करीत या संस्थेने यशस्वी शेतीचा मार्ग दाखविला आहे,’’ असे गौरवोद्‌गार श्री. ठाकरे यांनी काढले. 

माझ्याकडे माहिती; तुमच्याकडे ज्ञान  ‘व्हीएसआय’ तसेच सहकारातील श्री. पवार यांच्या कार्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, की साखर उद्योगाविषयी माझ्याकडे फक्त माहिती आहे; तर तुमच्याकडे मात्र ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय माहितीचा उपयोग करता येत नाही. साखर क्षेत्र किंवा इतर सहकारी संस्थांतील संघटितपणाचा वापर करण्यासाठी तुम्ही चांगला पुढाकार घेत आहात. सरकार म्हणून तुमच्या कामाला हवे ते सर्व सहकार्य आम्ही देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या वेळी त्यांनी ‘व्हीएसआय’चे अहवाल व दिनदर्शिकेचे प्रकाशनही केले. 

नवे केंद्र राष्ट्रीय दर्जाचे काम करेल ः पवार  ‘‘मराठवाड्यात ‘व्हीएसआय’ला संशोधन केंद्रासाठी जागा मिळण्याची विनंती आम्ही राज्य सरकारला केला होती. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं आणि आवश्यक पूर्तता करून आता जागा ताब्यात मिळत आहे. या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे काम होईल. तेथील संशोधनातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उत्तम वाण दिले जाईल. या कामाला तुम्ही सक्रिय पाठिंबा देत असल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो,’’ अशा शब्दांत ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 

‘‘आमचे काही प्रश्‍न आहेत. इथे उपमुख्यमंत्री तसेच राज्य सरकारमधील मंत्री देखील आहेत. साखर संचालक तसेच आमच्या पातळीवर जे प्रश्‍न सोडवता येतील त्याचा निर्णय आम्ही घेऊ. काही बाबी राज्य सरकारकडे मांडू,’’ असे श्री. पवार यांनी नमूद केले. 

दरम्यान, ‘व्हीएसआय’च्या सभेत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार यंदा स्वतंत्रपणे नंतरच्या टप्प्यात दिले जातील, अशी माहिती या वेळी देण्यात आली.  कायदे असे करतात; की पाणी फिरले जाते  गोसीखुर्द धरण प्रकल्पाचा उल्लेख करीत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी धोरणाचे वाभाडे काढले. ‘‘गोसीखुर्दला मी गेलो होतो. हा प्रकल्प लवकर पूर्ण करा. त्यामुळे आमचा भाग पंजाब होईल,’’ असे साकडे मला शेतकरी घालत होते. या शेतकऱ्यांचा किंवा पूर्व विदर्भाचा आशावाद तेथे पंजाब निर्माण होण्याचा आहे. तो आशावाद सत्य देखील आहे. पण आज मूळ पंजाबातील शेतकरीच रस्त्यावर आले आहेत. आपण कायदेच असे करतो, की सिंचन प्रकल्पांमुळे जमीन पाण्याखाली येण्याऐवजी या प्रकल्पांवरच पाणी फिरले जाते आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीका केली.  ..तर तो आपलाच खुजेपणा ः ठाकरे  ‘‘वसंतदादा पाटील ही दूरदृष्टी असलेली व्यक्ती होती. त्यांचा भर कृषी, उद्योग, शिक्षणावर होता. अशी माणसं विरळ असतात. जसे आपल्याला आता शरद पवार साहेब लाभलेले आहेत. ते बुजूर्ग असून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्याची जबाबदारी समाजाची आहे. आपण त्यांचा उपयोग करून घेणार नसाल, तर तो दोष या बुजुर्गांचा नाही. तो दोष आपल्या खुजेपणाचा राहील,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री. पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com