संपत पाटील, अजिंक्य ठाकूर, जगन्नाथ भगत यंदाचे 'ऊसभूषण'चे मानकरी

संपत पाटील, अजिंक्य ठाकूर, जगन्नाथ भगत यंदाचे 'ऊसभूषण'चे मानकरी
संपत पाटील, अजिंक्य ठाकूर, जगन्नाथ भगत यंदाचे 'ऊसभूषण'चे मानकरी

पुणे: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उत्सुकता लागून असलेले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) ‘ऊसभूषण पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. २०१८-१९ हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील संपत श्‍यामराव पाटील यांना पूर्वहंगामी गटात, पुणे जिल्ह्यातील अजिंक्य बाबाजी ठाकूर यांना सुरू गटामध्ये, तर सांगलीचे जगन्नाथ रामू भगत यांनी खोडवा गटात पहिला क्रमांक पटकावीत ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार यंदा पुण्याच्या दौंड शुगरने पटकावला. व्हीएसआयचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २५ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता मांजरी येथे व्हीएसआयच्या मुख्यालयात पुरस्कार वितरण होणार आहे. व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, तसेच संचालक विकास देशमुख (कृषिशास्त्र व तंत्रज्ञान) यांनी बुधवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. या वेळी व्हीएसआयचे तांत्रिक सल्लागार आर. व्ही. दाणी (साखर तंत्र), एस. व्ही. पाटील (मद्यार्क व जैवइंधन), राजेंद्र चांदगुडे (साखर अभियांत्रिकी), जे. एन. मोहंती (आर्थिक) उपस्थित होते.  पूर्वहंगामी गटात को ८६०३२ वाणाचे हेक्टरी ३५३ टन उत्पादन घेणारे संपत श्‍यामराव पाटील हे हातकणंगले भागातील वाठारचे शेतकरी आहेत. शरद सहकारी साखर कारखान्याचे ते सभासद आहेत. श्री. पाटील यांना दहा हजारांचा कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. पुण्याच्या खेड भागातील पिंपरी बुद्रुकचे शेतकरी अजिंक्य बाबाजी ठाकूर यांनी को ०२६५ वाणाचे सुरू हंगामात हेक्टरी २६५.६८ टन उत्पादन घेतले आहे. त्यांना दहा हजारांचा कै. वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला असून, ते मुळशीच्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत.  सांगलीच्या कडेगाव भागातील येडेगावात को ८६०३२ वाणाचे खोडव्यात हेक्टरी २७५.०२ टन उत्पादन घेणारे शेतकरी जगन्नाथ रामू भगत हे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचे सभासद आहेत. त्यांना दहा हजारांचा कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार मिळाला आहे.  व्हीएसआयच्या ‘विभागीय ऊसभूषण पुरस्कारा’चीदेखील घोषणा या वेळी करण्यात आली. स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दक्षिण विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतकऱ्यांची नावे अशी ः पूर्व हंगामासाठी प्रथम क्रमांक- अशोक शिवराम चौगुले, मु. पो. उमळवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर (उत्पादन- हेक्टरी २५५.७७, वाण- व्हीएसआय ०८००५, कारखाना- दत्त शेतकरी), सुरू हंगामासाठी प्रथम क्रमांक- नारायण दत्तात्रेय वरुटे, मु.पो. प्रयाग चिखली, ता. करवीर, जि. कोल्हापूर, (उत्पादन- हेक्टरी २२८.७८, वाण- एमएस १०००१, कारखाना- छत्रपती राजाराम), खोडवा गटात प्रथम क्रमांक- जवाहर देवीदास पोतदार मु. पो. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (उत्पादन- हेक्टरी २४२, वाण- कोएम ०२६५, कारखाना-दत्त शेतकी). मध्य विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतकऱ्यांची नावे अशी ः पूर्व हंगामासाठी प्रथम क्रमांक- हणमंत विठ्ठल बागल, मु. पो. गादेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, (उत्पादन- हेक्टरी ३१५.०७, वाण- कोएम ०२६५, कारखाना-सहकार शिरोमणी वसंतराव काळे), सुरू हंगामासाठी प्रथम क्रमांक- यंदा एकही शेतकरी पात्र ठरला नाही. मात्र, खोडवा गटात प्रथम क्रमांक भाईदास आनंद खैरनार, मु. पो. सायणे, ता. साक्री, जि. धुळे (उत्पादन- हेक्टरी २०७.५१, वाण- कोएम ०२६५, कारखाना- द्वारकाधीश).  उत्तर-पूर्व विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतकऱ्यांची नावे अशी ः पूर्व व सुरू हंगामासाठी प्रथम क्रमांक- कोणालाही मिळालेला नाही. मात्र, खोडवा गटात प्रथम क्रमांक निळकंठ प्रभू बिरादर, मु. पो. तोंडार, ता. उदगीर, जि. लातूर (उत्पादन- हेक्टरी २६०.४७, वाण- को ८६०३२, कारखाना-विलास सहकारी कारखाना).  दौंड शुगर ठरला सर्वोत्कृष्ट राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कारखान्याचा कै. वसंतदादा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पुण्याच्या दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने मिळावला आहे. अडीच लाख रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एक लाख रुपये व मानचिन्ह असलेला कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार पलूस (जि. सांगली) येथील क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. कै. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या नावाने एक लाख रुपये व मानचिन्ह असलेला ऊस विकास व संवर्धनासाठीचा पुरस्कार आंबेगाव (जि. पुणे) येथील भीमाशंकर साखर कारखान्याला जाहीर करण्यात आला. 

कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार अंबड (जि. जालना) येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. कै. अबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरणसंवर्धन पुरस्कार हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याने प्राप्त केला. कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवानी पुरस्कार यंदा बारामतीच्या (जि. पुणे) सोमेश्वर कारखान्याने मिळवला आहे.  ‘शरद’, ‘अंबालिका’, ‘मांजरा’चे आर्थिक व्यवस्थापन उत्कृष्ट  साखर कारखानदारीमध्ये उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. दक्षिण विभागात हातकणंगलेच्या शरद सहकारी साखर कारखान्याने, तर मध्य विभागामध्ये कर्जतच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने पुरस्कार मिळवला आहे. उत्तर-पूर्व विभागात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार पटकाविला. मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

ऊससंर्वधनात ‘दत्त शेतकरी’, ‘पांडुरंग’, ‘समर्थ’ आघाडीवर ऊस विकास व संवर्धनात दक्षिण विभागात शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळावला. मध्य विभागात माळशिरसचा पांडुरंग सहकारी कारखाना सरस ठरला. उत्तर पूर्व विभागात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळवला. पाटील ठरले उत्कृष्ट ऊस विकास अधिकारी राज्याच्या साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचाही व्हीएसआयकडून विविध पुरस्कारांनी गौरव केला जातो. दहा हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सांगली जिल्ह्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे सुभाष पाटील यांना यंदाचा उत्कृष्ट ऊस विकास अधिकारी अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.  विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार तांत्रिकदृष्ट्या उत्तम कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना व्हीएसआयकडून कार्यक्षमता पुरस्कार दिला जातो. यंदा उत्तरपूर्व विभागातून रेणापूर (जि. लातूर) येथील रेणा सहकारी कारखान्याला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. द्वितीय पुरस्कार वसमत (जि. हिंगोली) पूर्णा सहकारी साखर कारखान्याने, तर तृतीय पुरस्कार घनसांगवी (जालना) येथील समर्थ सहकारी कारखान्याने मिळवला. 

मध्य विभागात तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिला पुरस्कार संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याला, द्वितीय पुरस्कार पुण्यातील दौंड शुगर कारखान्याला आणि तृतीय पुरस्कार राहाता (जि. नगर) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याला मिळाला आहे. दक्षिण विभागात पहिल्या क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार शिराळा (जि. सांगली) येथील विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याला, द्वितीय पुरस्कार कागल (कोल्हापूर) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी कारखान्याला मिळाला आहे. तृतीय पुरस्कारासाठी कडेगाव (जि. सांगली) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना पात्र ठरला आहे.

इतर पुरस्कारांची नावे अशी उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी ः नंदकुमार सूर्यवंशी (सोनहिरा कारखाना, सांगली) उत्कृष्ट चीफ इंजिनिअर ः आशिष चव्हाण (जी. डी. बापू लाड कारखाना, सांगली), उत्कृष्ट चीफ केमिस्ट ः शिवशंकर भोसले (सोमेश्वर कारखाना, पुणे), उत्कृष्ट मुख्य लेखापाल ः भानुदास पाटील (विश्‍वासराव नाईक कारखाना, सांगली), उत्कृष्ट आसवानी व्यवस्थापक ः बळवंत पाटील (अंबालिका शुगर, नगर), उत्कृष्ट कार्यकारी संचालक ः विजय वाबळे (माळेगाव कारखाना, पुणे). व्हीएसआयमधील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून शास्त्रज्ञ डॉ. एस. जी. दळवी, हरी झेंडे, बी. एन. घुले, राहू अरगडे, कैलास चोरमले, दिलीप घाडगे यांना पुरस्कार मिळाला आहे. दहा हजार रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com