भीमा नदीवर वडापूर बॅरेजला मंजुरी

भीमा नदीवर वडापूर बॅरेजला मंजुरी
भीमा नदीवर वडापूर बॅरेजला मंजुरी

सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदार संघात भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेजला मंजुरी मिळाली आहे. या बॅरेजेसमुळे या परिसरातील एक हजार ९८९ हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सुमोर २२ कोटी रुपयांचा निधी त्यासाठी अपेक्षित आहे. या बॅरेजसच्या प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव लवकरच सादर होणार आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात हा बॅरेज उभारला जाणार आहे. देशमुख यांनी गेल्या काही वर्षांपासून त्यासाठी पाठपुरावा केला. सध्या तेच सत्तेत असल्याने या कामाचा मार्ग मोकळा झाला. धरण होण्यासाठी अनेक अडचणी असतानासुद्धा २००३ पासून वडापूर धरणाच्या मुद्द्यावर राजकारणाची प्रथा पडली होती. संपूर्ण गावचे विस्थापन, धरणाचा खर्च अशा अनेक समस्या समोर होत्या. पण शेवटी धरणाऐवजी बॅरेज बांधल्यास गावच्या जमिनी शाबूत राहतील, गावच्या विस्थापनाचा प्रश्‍न उद्‌भवणार नसल्याचा मतप्रवाह तयार झाला. कर्नाटक-महाराष्ट्र लवादाचे उल्लंघनदेखील होणार नाही, असा निर्णय झाला.

जलसंपदा विभागाकडे वारंवार झालेल्या बैठका व पाठपुराव्यातून सध्या ४.६७२ द. ल. घ. मी.च्या पाणी साठवण क्षमतेच्या वडापूर बॅरेजेसला मंजुरी मिळाली. जिल्ह्यातील उजनी धरणाच्या खालील बाजूस कर्नाटक राज्यातील सीमेपर्यंत भीमा नदीची लांबी २६० किलोमीटर आहे. सीना नदीची भीमा-सीना जोड कालव्यापासून खालील भागात भीमा नदीच्या संगमापर्यंतची लांबी १३५ किलोमीटर आहे. नीरा नदी ते भीमा नदी संगमापर्यंतची नीरा नदीची लांबी २५ किलोमीटर आहे. जिल्ह्यातील भीमा नदीवर २४, सीनावर २२ व नीरा नदीवर पाच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या ठिकाणी बॅरेजेस बांधण्याबाबतची मागणी केली आहे. या नद्यांवर अस्तित्वातील एकूण ५१ बंधारे आहेत. तेथे बॅरेजेस व्हावेत, अशी मागणी देशमुख यांनी केली.

प्रायोगिक तत्त्वावर वडापूर बॅरेज

प्रायोगिक तत्त्वावर वडापूर बॅरेजला मंजुरी देऊन सदरील ठिकाणी पहिले बॅरेज बांधण्यात येणार आहे. हीच संकल्पना जिल्ह्याला लागू होणार असल्याचेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com