पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात जोरदार पावसाची प्रतीक्षा

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात जोरदार पावसाची प्रतीक्षा
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात जोरदार पावसाची प्रतीक्षा

पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात धरणांचा पाणीसाठा चिंताजनक स्थितीत पोचला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये सोमवारपर्यंत (ता. १७) ९.२१ टीएमसी म्हणजे अवघा ४ टक्के चल पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांच्या पाणलोटात पूर्वमोसमीच्या सरी बरसल्या असल्या, तरी पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

उजनीसह पुणे जिल्ह्यातील सर्व २५ धरणांंची चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. गतवर्षी शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलेली ओढ, यंदाच्या उन्हाळ्यात वाढलेल्या झळा यामुळे धरणांतील पाणीसाठा खूपच खालावला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये सोमवारपर्यंत (ता. १७) ९.२१ टीएमसी म्हणजे ४ टक्के चल पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी १८ जून रोजी धरणांमध्ये यंदापेक्षा जवळपास दुप्पट म्हणजेच १७ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा उजनी धरणाचा पाणीसाठा उणे ५७ टक्क्यांवर पोचला असून, धरणाच्या अचल पातळीतील पाणसाठा ३०.४६ टीएमसीने कमी झाला आहे. धरणाच्या अचल पातळीत ३३.१९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. 

जिल्ह्यातील आंद्रा, पवना, पानशेत, आणि भाटघर या धरणांमध्ये १ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. तर उर्वरीत सर्वच धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी खोऱ्यातील सर्वच धरणे तळाशी गेली आहेत, यात पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड धरणांमध्ये पाणीसाठा अचल पातळीत आहे. मुठेच्या खोऱ्यातील टेमघर धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर भीमानदी, नीरा नदीच्या खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठाही तळाशी गेला आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. 

सोमवारी (ता. १७) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात १ जूनपासून पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : वरसगाव ०.७८ (१०२), पानशेत १.५३ (१०६), खडकवासला ०.४७ (५४), टेमघर ० (१५३), पवना १.३५ (९०), कासारसाई ०.०५ (३१), मुळशी ०.५४ (६६), कलमोडी ०.२५ (२२), चासकमान ०.२२ (२५), भामा आसखेड ०.६५ (८६), आंद्रा १.०६ (५६), वडीवळे ०.३६ (२५), गुंजवणी ०.२४ (९७), भाटघर १.०३ (१६), नीरा देवघर ०.१६ (४४), वीर ०.४० (११), माणिकडोह ०.०६ (६), येडगाव ०.०३ (२१). पिंपळगाव जोगा ० (१९), वडज ० (८), डिंभे ० (९), विसापूर ०.०२ (२०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com