वाशीम जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षाच

वाशीम जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षाच
वाशीम जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षाच

अकोला ः पावसाळ्याचे जवळपास अडीच महिने पूर्ण होत आहेत. या काळात असमतोल स्वरूपाचा पाऊस पडल्याने लगतच्याच दोन तालुक्यात, जिल्ह्यात भागात भिन्न परिस्थिती तयार झाली आहे. अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत १२ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला. मात्र, लगतच्याच वाशीम जिल्ह्यात अवघा ५६.७८ टक्के पाऊस पडल्याने तेथील पिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढण्याच्या दृष्टीने पाऊस आवश्यक असून वाशीम जिल्ह्यात प्रकल्पांची स्थिती अत्यंत जेमतेम आहे. अकोला जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६९७ च्या तुलनेत ४९० मिलिमीटर म्हणजेच ७० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अकोला, मूर्तिजापूर या तालुक्यांची सरासरी ६० टक्क्यांच्या आत आहे. तर  बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर या तालुक्यांची सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.  बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक ६६७ मिलिमीटरच्या ४६७ मिलिमीटर पाऊस झाला. या जिल्ह्यात आत्तापर्यंत संग्रामपूर आणि बुलडाणा तालुक्यांनी पावसात आघाडी घेतली आहे. या दोन्ही तालुक्यांत पावसाने आत्तापर्यंत दमदार हजेरी लावली आहे. या जिल्ह्यातील मराठवाड्याला लागून असलेल्या देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार या तालुक्यांना पावसाची गरज आहे. देऊळगावराजा तालुक्यात सरासरीच्या केवळ ३९.९२ टक्के इतका कमी पाऊस पडला. अशीच गत सिंदखेडराजाची आहे. या तालुक्यात  सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला. तरी हा पाऊस असमतोल असल्याने पीकपरिस्थिती अडचणीत आहे. लोणारमध्ये सरासरीच्या ४८ टक्के तर मेहकरमध्येही ५५.१२ टक्केच पाऊस पडला आहे. वाशीम जिल्ह्यात वाशीम, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड या सर्वच तालुक्यांचा विचार केला तर आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ ५६ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच प्रकल्प जेमतेम पातळीवर आहेत.  वऱ्हाडात आजवरच्या पावसाने प्रामुख्याने अकोला व बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पांना फायदा झालेला आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान येथील वान प्रकल्पात ७५ टक्क्यांवर जलसाठा झाल्याने गेल्या आठवडाभरापासून प्रकल्पाच्या सहा गेटमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या  प्रकल्पात सातपुडा पर्वत रांगांमधील विविध नदीनाले येऊन मिसळतात. सध्या ही आवक सुरू असल्याने गेट ०.१० मीटरने उघडलेलेच आहेत. परिणामी वान नदी दुथडी भरून वाहत आहे.  

जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी (१३ ऑगस्ट अखेरीस ) 

जिल्हा सरासरी पडलेला पाऊस टक्केवारी
अकोला ६९७ ४९० ७०.२९
बुलडाणा ६६७ ४६७ ७०.०२
वाशीम ७९८ ४५३ ५६.७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com