प्रतीक्षा तुरीच्या चुकाऱ्याची; खरेदीतील अडचणी कायम

पाच क्विंटल तुरीची हमीभावाने विक्री केली आहे. महिना झाला तरी तूर विक्रीचे पैसे मिळालेले नाहीत. सोसायटीचे काढलेले कर्ज कसे भरायचे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. - बसप्पा पट्टणशेट्टी, उटगी, ता. जत, जि. सांगली.
तूर खरेदी
तूर खरेदी

सांगलीत शेतकऱ्यांचे चार कोटी ८९ लाख थकले सांगली ः जिल्ह्यातील ८०० हून अधिक शेतकऱ्यांची सुमारे ९ हजार क्विंटल तुरीची हमीभावाने खरेदी करण्यात अाली आहे. तूर खरेदीची रक्कम दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र विक्री केलेल्या तुरीचे सुमारे ४ कोटी ८९ लाख ६० हजार रक्कम थकली आहे. अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरण्यास अडथळे निर्माण झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.  शासनाने हमीभावात तूर खरेदी सुरू करून पुढील आठवड्यात दोन महिने होतील. तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रुपये असा हमीभाव दिला आहे. जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर सुमारे ९ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. अजून सुमारे ५ हजार क्विंटल तूर खरेदी होण्याची शक्‍यता आहे. ९ हजार क्विंटलचे ४ कोटी ८९ लाख ६० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. मात्र, एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर तूर खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या तुरीचे पैसे जमा झाले नाहीत. तूर विक्री केलेले पैसे कधी आमच्या खात्यावर जमा होईल, अशी शेतकरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी सांगलीला यावे लागते आहे. त्यात संबंधित विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत आहेत. 

वर्ध्यात १९ कोटी थकीत  वर्धा ः नाफेडकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३ हजार ७५ शेतकऱ्यांचे १९ कोटी ८२ लाख १८ हजार ९५२.५० रुपये इतकी मोठी रक्‍कम थकीत असून, ती केव्हा मिळणार याबाबतही अनिश्‍चितता आहे. जिल्ह्यात सात खरेदी केंद्रांवरून तुरीची खरेदी केली जात आहे. अनागोंदी टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे तूर विक्रीसाठी आणण्याचे कळविण्याची पद्धती अंगीकारण्यात आली. शेतकऱ्यांकडूनदेखील अशा प्रकारच्या नियोजनाला प्रतिसाद मिळाला. आजवर जिल्ह्यात सुमारे पाच हजार ७५० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. यापैकी ३ हजार ७५ शेतकऱ्यांकडून ३६ हजार ३७० क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तुरीची खरेदी झाल्यनंतर किमान आठ दिवसांत चुकारे मिळणे अपेक्षित आहे. परंतु नाफेडने शेतकऱ्यांची थट्टा करीत खरेदीनंतर दीड महिना झाल्यावरही चुकारे देण्यास असमर्थता दर्शविली आहे. नाफेडला आजवर तूर दिलेल्या तीन हजारांवर शेतकऱ्यांपैकी एकालाही चुकारा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडूनदेखील या विषयावर शेतकऱ्यांची बोळवण केली जात असल्याची बाब समोर आली आहे. शेतकऱ्यांकडून मार्केटिंग अधिकाऱ्यांना विचारणा झाल्यास त्यांच्याद्वारे गेल्या दीड महिन्यापासून येत्या आठ ते दहा दिवसांत शासनाकडून निधी मिळेल, त्यानंतर तत्काळ चुकारे होतील, हे एकच उत्तर दिले जात आहे. सरकारने या गंभीर प्रकाराची दखल घेत चुकारे करीत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. मराठवाड्यात तुरीसाठी जागेचा वांधा औरंगाबाद : मराठवाड्यात सुरू असलेल्या हमीदराच्या तुरीला साठवणुकीसाठी जागेचा वांधा कायम आहे. एकीककडे खरेदी केलेल्या तुरीसाठी गोदाम मिळत नसताना, हमीदराने आपली तूर घालणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदलाही मिळण्यात प्रचंड दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे.  मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात यंदा आजवर सर्वाधिक १ लाख ४ हजार ८०८ क्‍विंटल तुरीची हमी दराने खरेदी केली गेली. दहा खरेदी केंद्रावरून ९९७० शेतकऱ्यांची ही तूर आहे. खरेदी केलेल्या तुरीपैकी ५४ हजार ७५५ क्‍विंटल तूर गोदामांमध्ये साठविण्यात आली. तर ५० हजार ५२ क्‍विंटल तुरीला साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नसल्याने ती खरेदी केंद्रावरच पडून आहे. खरेदी केलेल्या या तुरीचे चुकारे मिळणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  बीड जिल्ह्यातील १५ खरेदी केंद्रावरून १० हजार १९५ शेतकऱ्यांची ९६ हजार ६६९ क्‍विंटल तूर खरेदी केली गेली. खरेदी केलेल्या या तुरीपैकी केवळ ३० हजार ८२४ क्‍विंटल गोदामात आहे. उर्वरित ६५ हजार ८४४ क्‍विंटल खरेदी केंद्रावरच पडून आहे. बीड जिल्ह्यातील दोन खरेदी केंद्रावरून २४२ शेतकऱ्यांचा ३ हजार २६४ क्‍विंटल हरभरा हमीदराने खरेदी करण्यात आला आहे. या हरभऱ्यालाही साठवणुकीसाठी गोदामात जागाच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. ४ हजार ९९ शेतकऱ्यांनी हरभऱ्याची हमी दराने खरेदी व्हावी म्हणून बीड जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी केली आहे. दुसरीकडे तुरीचेही २४ हजार १६६ शेतकरी ऑनलाइन नोंदणी करून बसले आहेत. जालना जिल्ह्यात १८४६ शेतकऱ्यांची १६ हजार २४० क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. हरभऱ्याच्या खरेदीला अजून जिल्ह्यात मुहूर्त मिळाल नसून केवळ ऑनलाइन नोंदणीच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातही हरभरा खरेदीला अजून मुहूर्त नाही.  प्रतिक्रिया दहा मार्चला हमीदराने खरेदी केंद्रावर १६ क्‍विंटल तूर घातली. सतरा दिवस लोटूनही अजून खात्यावर पैसे मिळाले नाही. पैशाची गरज होती म्हणूनच माल विकला ना, इतका विलंब होत असलं तर भागवायचं कसं.  - सदाशिव बढे, शेतकरी, केकतजळगाव, जि. औरंगाबाद.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com