वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरज

Wakurde scheme requires 700 crores
Wakurde scheme requires 700 crores

सांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना आता ८०० कोटींवर पोचली आहे. ही  योजना पूर्ण करण्यासाठी ७०० कोटींची गरज आहे.

तत्कालीन युती सरकारच्या काळात १९९६ मध्ये ही योजना सुरू झाली. १९९७/९८ मध्ये वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली. त्या वेळी ११० कोटी रुपयांचा योजनेचा खर्च होता. खिरवडे पंपहाउस, हातेगाव पंपहाउस, हातेगाव ते वाकुर्डे, करमजाई धरणापर्यंतचा बोगदा होऊन करमजाई धरणात आणि तेथून पलीकडे येणपे बोगद्यातून कराड तालुक्यात ‘चांदोली’ चे पाणी आले. त्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागला.

प्रारंभी ११० कोटीची असणारी योजना आता ८०० कोटींच्या घरात गेली आहे. १९९९ पासून योजना निधीअभावी रखडत गेली. पहिल्या टप्प्यात पाणी करमजाई धरणात आले. त्याचा फायदा मोरणा धरण, नदीकाठच्या लोकांना होतो आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी योजनेचे दोन भाग करण्यात आले आहेत. 

बंद पाइपलाइनमधून वाकुर्डेचे पाणी नेण्यासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर केला. ही कामे सुरू आहेत. वाळवा तालुक्यात रेठरे धरण येथेही बंद पाइपलाइनची कामे सुरू झाली आहेत. या योजनेचे कालवे रद्द करून बंद पाइपलाइनमधून पाणी जाणार असल्यामुळे गळती होणार नाही. पाण्याच्या चोरीवरही आळा बसणार आहे.

या योजनेसाठी शेतकऱ्यांना वीजबिलाची रक्कम हेक्टरवर आकारण्यात येत आहे. थकबाकीचे प्रमाण कमी आहे. या योजनेतून वाकुर्डे, करमजाई धरण, मानकरवाडी तलाव भरले आहेत. यातून १० गावांतील शेतीला पाणी मिळत आहे. मोरणा नदीत पाण्याचा विसर्ग नियमित सुरू आहे. याचबरोबर कराड तालुक्यातील १४ गावांना या योजनेतून पाणी देण्यात येत आहे. घोगाव, उंडाळे येथील तलावात या योजनेचे पाणी सोडले जात आहे.

करमजाईत वाकुर्डेचे पाणी

उन्हाळ्यात करमजाई धरणात वाकुर्डे योजनेचे पाणी येते. त्यामुळे मोरणा धरण व मोरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. मोरणा धरण व नदीच्या पाण्यावर ४९५ हेक्टर ऊस व ४३८ हेक्टर रब्बी हंगामातील पिकांना पाणीपुरवठा होत आहे. शिराळा शहरासाठी पिण्याच्या पाण्याची सोय होते. शिराळा एमआयडीसीला पाणीपुरवठा मोरणा धरणातून होतो. शिराळा, पाडळी, तडवळे, बिऊर, उपवळे, मांगले, पवारवाडी, जांभळेवाडी, भाटशिरगाव या गावांतील शेतीला या योजनेच्या पाण्याचा लाभ होतो.

महिन्यापासून चांदोलीतून पाणी

शिराळा तालुक्यात पश्चिम भागाच्या तुलनेत उत्तर भागातील शेतीला पाण्याची टंचाई भासते. या वर्षी उत्तर भागासह कराड तालुक्यातील ३८०२ हेक्टर शेतीच्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. याचे कारण गेल्या एक महिन्यापासून चांदोली सिंचन योजनेतून धरणातून वाकुर्डे योजनेसाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामधून कराड तालुक्यातील २ हजार ७७२ हेक्टर, शिराळा तालुक्यातील १ हजार ३० पीक क्षेत्राला पाणी मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com