Warning of disciplinary action against agricultural assistants
Warning of disciplinary action against agricultural assistants

कृषी सहायकांविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा इशारा

अकोला ः राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाच्या कामकाजावर १२ डिसेंबर पासून बहिष्कार टाकलेल्या कृषी सहायकांविरुद्ध प्रशासनाने शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांनी विभागातील पाचही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबाबत तातडीचे पत्र पाठवित कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने कृषी सहायकांमध्ये खळबळ उडाली आहे.

विविध मागण्या महिनोमहिने मान्य केल्या जात नसल्याने पोकरा प्रकल्प राबविल्या जात असलेल्या १५ जिल्ह्यांतील कृषी सहायकांनी योजना अंमलबजावणीच्या कामावर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन कायम असल्याने योजनांची अंमलबजावणी थांबली आहे. कृषी सहायकांनी या आंदोलन काळात मोका तपासणी न केल्याने योजनेच्या निधीचे वितरण रखडले आहे.  

अमरावती विभागात अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा पोकरात समावेश आहे. प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना विविध घटकातंर्गत प्रथम प्राधान्याने लाभ दिला जात असून अनुदान वितरित केले जाते. या योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त गावे समाविष्ट आहेत. 

या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी विविध घटकाअंतर्गत अर्ज दिले आहेत. या अर्ज प्रक्रियेत मोका तपासणी करण्याची जबाबदारी कृषी सहायकांकडे आहे. मात्र, आंदोलनामुळे कुठेही हे काम झालेले नाही. यामुळे अनुदान वितरण प्रक्रिया ठप्प पडलेली आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अवहेलना यातून होत आहे. ज्यांनी मोका तपासणी केली नाही, अशा कृषी सहायकांची यादी पोकराच्या मुंबई कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. कृषी सहायकांनी खुलासे दिल्यानंतर ते मान्य, अमान्य करीत आपल्यास्तरावरून शिस्तभंगविषयक कारवाई तत्काळ करावी. यानंतरही सुधारणा होत नसल्यास नियुक्ती प्राधिकरण स्तरावरून शिस्तभंगविषयक कारवाईसाठी विभागीय चौकशी प्रस्तावित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता मागण्यांसाठी बहिष्कार आंदोलन छेडलेल्या कृषी सहायकांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईबाबत विभागीय कृषी सहसंचालकांनी दिलेल्या आदेशामुळे पाचही जिल्ह्यांत पोकराचे काम सांभाळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, अशी कारवाई झाल्यास हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com