पालखी मुक्कामी कायमस्वरूपी शौचालये उभारणार

पालखी मुक्कामी कायमस्वरूपी शौचालये उभारणार
पालखी मुक्कामी कायमस्वरूपी शौचालये उभारणार

पुणे : स्वच्छ भारत मिशनतंर्गत पुणे ते पंढरपूर आषाढीवारीसाठी जिल्ह्यातील पालखी मार्गावरील आठ मुक्कामांच्या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालय उभारणी करण्यात येणार आहे.

सुलभ इंटरनॅशनलतर्फे ज्या गावांमध्ये शौचालय व्यवस्थापन होणार आहे. ही शौचालये उभारण्यासाठी २४ कोटी ७३ लाख ६४ हजार रुपये निधी उपलब्ध करावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली. 

पंढरपूर आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ होतो. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात वारकरी त्यांच्या दिंड्यांसह सहभागी होत असतात. २०१६ पासून देहू, आळंदी (जि. पुणे) ते वाखरी (जि. सोलापूर) दरम्यान पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील ग्रामपंचायती व नगरपालिकांमध्ये पालखी मुक्कामी भाडेतत्त्वावर तात्पुरते शौचालय उपलब्ध करून दिली जातात. 

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर (ता. हवेली), यवत, वरवंड (ता. दौंड), उंडवडी सुपे (ता. बारामती) सणसर, निमगाव केतकी, सराटी (ता. इंदापूर) आणि वाल्हा (ता. पुरंदर) या आठ मुक्कामांच्या ठिकाणी प्रत्येकी ५०० तात्पुरती शौचालये उभारणे व देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी साधारणतः: अडीच ते तीन कोटी रुपये खर्च होतात. ही रक्कम वाढतच जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात पक्की शौचालये उभारल्यास भविष्यात हा खर्च कमी होऊ शकणार आहे.  

पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये कायमस्वरूपी शौचालये उभारण्याच्या दृष्टीने त्यासाठी लागणारी जागा व इतर आवश्यक बाबीसाठी सुलभ इंटरनॅशनल व जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे पाहणी केली. ज्या गावांमध्ये जागेची उपलब्धता आहे, अशा सात गावांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. 

खर्चाचे अंदाजपत्रक तयार

७ गावांतील १६ ठिकाणी ८०० कायमस्वरूपी शौचालयांचे युनिट उभारण्यासाठी २४ कोटी ७३ लाख ६४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.  त्याठिकाणी २० शीटच्या युनिटसाठी प्रतियुनिट ७२ लाख ८३ हजार रुपये, तर ६० शीटच्या युनिटसाठी  १ कोटी ८१ लाख ८६ हजार रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकाप्रमाणे २४ कोटी ७३ लाख ६४ हजार रुपये निधी उपलब्ध करावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com