छावण्यांतील जनावरांवर करडी नजर

सीसीटीव्ही कॅमेरा
सीसीटीव्ही कॅमेरा

नगर ः दुष्काळात जनावरे जगवण्यासाठी प्रशासनाने छावण्या सुरू केल्या आहेत. मात्र मागील दुष्काळातील अनुभव पाहता जनावरांच्या छावण्यांत गैरव्यवहार होऊ नये, यासाठी यंदा प्रशासनाने छावण्यातील जनावरांवर करडी नजर ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनावरांच्या छावण्यांत ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्याचे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत. शिवाय प्रत्येक मोठ्या जनावराला पिवळ्या रंगाचा तर लाल जनावराला लाल रंगाचा बिल्ला लावण्यात येत आहे. रोजचा अहवाल तलाठ्यामार्फत तहसील कार्यालयाकडे जमा करावा लागत आहे.  नगरसह राज्यातील अनेक भागात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि रोजगार या महत्त्वाच्या बाबी त्या अनुषंगाने निर्माण होत आहेत. जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई असून शेतकऱ्यांची जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १२३ छावण्या सुरू झालेल्या आहेत. मात्र या अाधीच्या दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या छावण्यात बोगस जनावरे दाखवून गैरव्यवहार झालेला होता. नगरमध्ये याआधी छावण्या सुरू करून त्यात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ४२६ चारा छावण्या सुरू केलेल्या संस्थावर गुन्हे दाखल झाले होते. या संस्था जिल्हा उपनिबंधकांनी काळ्या यादीत टाकलेल्या आहेत. यंदा त्यामुळे त्या वेळी गैरव्यवहारात अडकलेल्या संस्थाना चारा छावण्या सुरू करण्याला परवानगी दिलेली नाही.  मागील काळासारखी परिस्थिती यंदा उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने चारा छावण्यातील जनावरांवर करडी नजर ठेवली आहे. विशेष करून यंदा छावण्यातील जनावरांचे चित्रीकरण करण्यासाठी ‘सीसीटीव्ही़’ कॅमेरे बसवण्याचे आदेश दिलेले असून, त्याचा अहवाल छावणी चालकाने प्रशासनाला सादर केला आहे. छावण्यातील गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि बोगस जनावरे दाखवली जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाची ही सुमारे ४१ अटी आहेत.   

जिल्हाधिकऱ्यांच्या अचानक तपासणीची धास्ती  जनावरांच्या छावण्यातून याअाधीच्या दुष्काळात चालकांनी पैसा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे दिसत होते. त्यातूनच गैरव्यहार झाल्याचे दिसून आले. यंदा मात्र जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यात जिल्हाधिकारी द्विवेदी अचानक जाऊन छावण्याची तपासणी करत आहेत. नियमानुसार सुविधा मिळत नसल्यास कारवाईची तंबी देत आहेत. त्यामुळे द्विवेदी यांच्या अचानक तापसणीमुळे छावणी चालक धस्तावले आहेत. 

या आहेत प्रमुख बाबी

  • दाखल जनावरांना बिल्ले लावणे बंधनकारक
  • छावणीत चारा आल्यानंतर शेतकऱ्यांसमक्ष पंचनामा 
  • खुराक व चारा वाटपानंतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या सह्या घ्याव्यात 
  • पशुविभागाचे अधिकारी जनावरांचे वर्गीकरण करून तहसीलदारांना अहवाल देतील. त्यांच्या मान्यतेनंतरच मिळणार अनुदान
  • छावणीचालकाने रोजचा अहवाल प्रशासनाला सादर करणे 
  • प्रत्येक छावणीत सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक 
  • शेतकामाला जनावरे न्यायची असल्यास सकाळी आठच्या अगोदरच न्यावीत. तसा अहवाल प्रशासनाला द्यायचा आहे. 
  • पंधरा दिवसांतून एकदा पशुखाद्य व चाऱ्याची पुण्याच्या खाद्य विश्लेषण प्रयोगशाळेत तपासणी आवश्यक. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com