जुनोनीत शेतीसाठी ‘वॉटर मीटर’द्वारे पाणीवाटप

‘वॉटरमीटर’मुळे आम्ही आमच्या गरजेनुसार पाणी वापरू शकतो, शेतकरी सामूहिकरीत्या एकत्रित आल्यामुळे कोणतीही अडचण येत नाही. पाणी, वेळ आणि पैशाची बचत झाली, भांडणतंटेही संपली. - सज्जन बापू व्हनमाने, अध्यक्ष, बिरुदेव पाणी वापर संस्था, जुनोनी
तलावावरील प्रत्येक पाइपलाइनला बसवलेले वॉटरमीटर
तलावावरील प्रत्येक पाइपलाइनला बसवलेले वॉटरमीटर

नववर्ष २०१८ विशेष.. .   ------------------------------------------------------ पाण्याचा भरमसाट उपसा होऊ नये, दीर्घकाळ वापर करता यावा, काटकसर व्हावी, यासाठी जुनोनी (ता. सांगोला) येथील शेतकऱ्यांनी गावाच्या तलावावर प्रत्येक शेतकऱ्याच्या पाइपलाइनला वॉटर मीटर बसवले आहेत. थेट पाणी उपशामुळे पूर्वी अवघ्या १४० एकर क्षेत्राला पाणी मिळत होते, पण वॉटर मीटर लावल्यामुळे सुमारे ५९२ एकर शेतीला फायदा झाला आहे.  सध्या या तलावावर १४८ पाइपलाइन आहेत आणि त्या प्रत्येक लाइनला ‘वॉटर मीटर’ आहे. साहजिकच गरजेएवढे पाणी आणि तेही अगदी मोजून, मापून घेतले जाते. या पद्धतीने पाण्याचा अपव्यय तर टळलाच, पण पाण्याची, पैशाची बचत झाली. शिवाय पाण्यावरुरून होणाऱ्या वादविवादालाही फाटा मिळाला. कायम दुष्काळी आणि पाण्यासाठी सतत वणवण सोसणाऱ्या सांगोल्यातील शेतकऱ्यांनी माळरान जमिनीवर डाळिंब पिकवून यापूर्वी आपल्यातील उर्मी दाखवून दिली आहे. त्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाण्याच्या वापराबाबत दिलेला हा धडाही इथल्या शेतकऱ्यांमधील सकारात्मक दृष्टी दाखवून देतो. सांगली जिल्ह्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी या तलावात सोडले जाते. २९.५० दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) एवढी या तलावाची साठवण क्षमता आहे. त्यापैकी २५.३२ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्तसाठा आहे. सध्या मात्र २०.८ दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) एवढा साठा शिल्लक आहे.  पूर्वी तलावातील पाण्याचा पाइपलाइनद्वारे थेट उपसा व्हायचा. त्यात पाइपलाइननुसार अंदाजे पाणी पट्टी वसूल केली जायची. त्यात एक एकरच्या शेतकऱ्याला जेवढे पैसे, तेवढेच दहा एकरवाल्या शेतकऱ्याच्याही वाट्याला येत, त्यात छोट्या शेतकऱ्यांना मोठा अर्थिक भुर्दंड बसायचा, तर सर्वाधिक शेती असणाऱ्या शेतकऱ्याचा मात्र लाभ व्हायचा. यावरून मग वादावादी, भांडणतंटे वाढू लागले. तेव्हा ‘वॉटर मीटर’ची संकल्पना पुढे आली. लघू पाटबंधारे विभागाचे बीटकारकून भारत व्हनमाने यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून बिरुदेव पाणी वापर संस्था आकाराला आली.  सज्जन व्हनमाने, प्रतापसिंह व्हनमाने, डॉ. विजयसिंह व्हनमाने, वसंत व्हनमाने, कलाबाई व्हनमाने, मनिषा पाटील, कलावती व्हनमाने, नामदेव बिचुकले शेतकऱ्यांनी त्यासाठी साथ दिली. २०१५ मध्ये दोन वर्षापूर्वीच सुरू झालेली ही योजना आता अगदी सुरळीत सुरू आहे.  डाळिंब शेती, ठिबकचा वापर सर्रास वॉटरमीटरद्वारे या पाण्यावर ५९२ एकर शेतीला पाणी पुरवले जाते. पण त्यात सर्वाधिक ४०९ एकर डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्या खालोखाल ज्वारी, मूग, कडवळ यासह द्राक्ष, चिक्कू आदी फळबागा लावलेल्या आहेत. या सर्व क्षेत्राला ठिबक संचाद्वारे पाणी पुरवले जाते. 

अशी आहे योजना बिरुदेव पाणी वापर सहकारी संस्थेकडे या सगळ्या व्यवस्थेचे नियंत्रण आहे. आठवड्यातून मंगळवार आणि शनिवार असे दोन दिवस तलावातील पाणी शेतकऱ्यांना दिले जाते. दिवसभरात आठ तास पाणी दिले जाते. त्यासाठी तलावावर १४८ वीजपंप आहेत. त्यातून २९६ शेतकऱ्यांच्या ५९२ एकर शेतीला पाणी पुरवले जाते. ३ ते ५ हॉर्सपॉवर क्षमतेचे इथले वीजपंप आहेत. प्रत्येक पंपाला वॉटरमीटर लावलेले आहे. प्रतितास ३० हजार लिटर इतके पाणी या पंपाद्वारे उपसा होतो. त्यानुसार आठ तासात किती युनिट पाणी उपसा झाला. त्याचा हिशेब ठेवला जातो, एक युनिट म्हणजे १० हजार लिटर पाणी होय, सर्वच पंप सुरू राहिले तर दिवसभरात किमान एक एमसीएफटीपर्यंत पाणी उपसले जाऊ शकते. पण सर्वच शेतकरी रोज सरसकट पाणी उपसा करत नाहीत. गरजेनुसारच त्याचा वापर होतो. दिवसभराच्या वापरानंतर सुरवातीचा साठा, शिल्लक साठा, पाण्याचा एकूण उपसा, शेतकऱ्यांनी वापरलेले पाणी आणि त्या त्या शेतकऱ्याच्या वॉटरमीटरच्या रीडिंगप्रमाणे पाणीपट्टीची आकारणी होते. साधारण एका युनिटला उन्हाळी हंगामात १२ रुपये, रब्बी हंगामात ९.६५ रुपये आणि खरिप हंगामात साडेसात रुपये इतका दर आकारला जातो.  पाणी उपशावर नियंत्रणामुळे शाश्‍वत पाणी  टेंभू उपसा सिंचन योजनेवरून वर्षातून दोनदा सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात या तलावात पाणी सोडले जाते. या तलावातून आठवड्यातून दोन वेळेस आणि ठराविक वेळेत शेतकऱ्यांना पाणी दिले जाते. शिवाय ‘वॉटरमीटर’चा वापर होत असल्याने पाण्याचा उपशावर नियंत्रण राहिले आहे. पाण्याचा गरजेपुरता आणि काटकसरीने होतो. एरव्ही दुष्काळामुळे सांगोला तालुक्‍यात पाण्याची वणवण सुरू असते, पण इथल्या शेतकऱ्यांच्या दूरदृष्टीने इथे मात्र रब्बीसह पुढे उन्हाळी हंगामातही तलावात पाणी टिकून असते. प्रतिक्रिया ‘वॉटरमीटर’ ही संकल्पना समन्यायी पाणी वाटपाला पूरक ठरणारी आहे. पण त्यात अधिकाधिक सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले.  - भारत व्हनमाने, बीट कारकून, लघू पाटबंधारे तलाव, जुनोनी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com