नगर जिल्ह्यात टॅंकरने मोडला वीस वर्षांचा उच्चांक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : राज्यात सर्वप्रथम सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि कायम पाणीदार अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे आतापर्यंतच्या टॅंकरने पाणीपुरवठ्याचा उच्चांक मोडला आहे. गेल्या वीस वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच १३ तालुक्यांत ८२८ टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. याआधी २०१६ मध्ये ८२६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. 

गेल्या वर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरीप आणि रब्बीत शेतपिकांचे नुकसान झालेच, पण पाणीसाठवण झाले नसल्याने अगदी पावसाळ्यापासूनच काही गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. आता मात्र मे, जून महिन्यांतील वाढत्या तापमानाने जिल्ह्यात तहानलेल्या गावांची संख्या वाढली आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या आकड्याने आतापर्यंतच्या दुष्काळातील रेकॉर्ड मोडले आहे. २०१६ मध्ये सर्वाधिक ८२६ टॅंकर सुरू होते. यंदाच्या तीव्र दुष्काळाने टॅंकरच्या आकड्याने उच्चांक मोडला आहे. सध्या जिल्ह्यातील ५७२ गावे व तीन हजार २०० वाड्या-वस्त्यांवरील १३ लाख ४९ हजार २४४ नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ८२८ टॅंकर रोज धावत आहेत. म्हणजे सध्याच्या विचार करता साठ टक्के लोकांना टॅंकरवर तहान भागवावी लागत आहे.

सध्या फक्त श्रीरामपूर तालुक्यात एकही टॅंकर सुरू नसला तरी मुळा, निळवंडे, भंडारदरा व अन्य प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांत टॅंकरने पाणी दिले जात आहे. सध्या श्रीरामपूर वगळता अकोले, राहाता, नेवासे, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या तेरा तालुक्‍यांतील गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वांत जास्त १५३ टॅंकर पाथर्डी तालुक्‍यात सुरू आहेत. २००३ पासून पडलेल्या दुष्काळाचा विचार करता गतवर्षी जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी पाऊस झाला. भूजलस्तर कमालीचा घटल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची वेळ आली. गेल्या वीस वर्षांचा विचार करता दरवर्षीच टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. मात्र आतापर्यंत २००४, २०१३, २०१४, २०१५, २०१६ मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या मोठी होती.    तालुकानिहाय टॅंकर ः पाथर्डी १५३, पारनेर १३१, जामखेड ९६, कर्जत ८६, श्रीगोंदे ७३, नगर ७०, शेवगाव ७०, संगमनेर ६९, नेवासे ४६, अकोले १२, कोपरगाव ११, राहाता ८, राहुरी ३. 

वर्षनिहाय टॅंकरसंख्या
वर्ष टॅंकरची संख्या
२००२  १३१
२००३ ३७७
२००४ ६१९
२००५    १९२
२००६ २२३
२००७ ४८
२००८  १२९
२००९  ८८
२०१० ५२
२०११  २२
२०१२  २८९
२०१३ ७०७
२०१४ ३६९
२०१५  ५२१
२०१६  ८२६
२०१७  ११४
२०१८ ३३३
२०१९  ८२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com