नगर जिल्ह्यात एकशे चाळीस जलस्रोतांमधील पाणी पिण्यास अयोग्य

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पाणी नमुन्यांची तपासणी करण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभागाकडे आहे. या विभागाने जून महिन्यात तपासणी केलेल्या दोन हजार सहा पाणी नमुन्यांपैकी १४० नमुने दूषित आढळले. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर स्रोतांचे पाणी दूषित होण्याची टक्केवारी वाढली. शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असल्याने नागरिकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला जलस्रोतांची तपासणी होते. मात्र, प्रत्येक वेळी तपासणीत दूषित पाणी आढळते. संपूर्ण जिल्ह्याला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात अद्याप यश आलेले नाही. दर महिन्यात तपासणीत दूषित आढळणाऱ्या स्रोतांची माहिती संबंधित ग्रामपंचायतींना देऊन त्यांच्याकडून शुद्ध पाणीपुरवठ्याची हमी घेतली जाते. मात्र, या सगळ्या सोपस्कारात दर वेळी नवीन गावांत दूषित पाणी आढळते.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील २३३६ नमुन्यांपैकी १२४, मे महिन्यातील १६२१ नमुन्यांपैकी १२० पाणी नमुने दूषित आढळले होते. पावसाळ्यात हा आकडा वाढला. जून महिन्यात जिल्ह्यातील २००६ पाणी नमुन्यांची तपासणी भूजल विभागाने केली. त्यापैकी १४० नमुने दूषित आढळले. ही टक्केवारी पाचपर्यंत राहिली. पावसाळ्यापूर्वी तपासणीपैकी चार टक्के नमुने दूषित होते. पावसाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असल्याने दूषित पाण्याची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

श्रीगोंदे तालुका अव्वल  दूषित पाण्याच्या टक्केवारीत श्रीगोंदे तालुका अव्वल आहे. तेथे तपासलेल्या १७४ पैकी ३५ जलस्रोत दूषित आढळले. त्या खालोखाल राहुरी १६ टक्के (७१ पैकी ११), जामखेड १४ टक्के (९७ पैकी १३), संगमनेर १० टक्के (१६९ पैकी १७) नमुने दूषित आढळले. पाथर्डी (६.५४ टक्के), पारनेर (४.२७ टक्के), अकोले (४.४१ टक्के), नगर (३.३९ टक्के), शेवगाव (३.८३ टक्के), कोपरगाव (५.६५ टक्के), कर्जत (२.०३ टक्के), नेवासे (१.७२ टक्के), राहाता (३.५३ टक्के), श्रीरामपूर (४.९४ टक्के) येथेही दूषित पाणी आढळले. 

ब्लीचिंग पावडरचे नमुनेही निकृष्ट  जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लीचिंग पावडरची गुणवत्ताही तपासली जाते. जून महिन्यात जिल्ह्यातील ३८९ ठिकाणच्या पाण्यातील ब्लीचिंगची तपासणी केली. त्यांपैकी ३७ नमुन्यांत २० टक्‍क्‍यांपेक्षा कमी क्‍लोरिन आढळले. एक एप्रिलपासून जिल्ह्यातील ११८१ पाणी नमुन्यांतील ब्लीचिंग पावडरची तपासणी झाली. त्यात ८७ नमुन्यांतील क्‍लोरिन २० टक्‍क्‍यांपेक्षा कमी आढळले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com