‘उजनी’तून भीमेत पुन्हा विसर्ग

‘उजनी’तून भीमेत पुन्हा विसर्ग
‘उजनी’तून भीमेत पुन्हा विसर्ग

सोलापूर : पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा सुरवात केल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने गुरुवारी (ता. २६) उजनीतून पुढे भीमा नदीत सुमारे ५१ हजार ६०० क्‍युसेक इतका विसर्ग सोडला जात आहे. तर दुसरीकडे वीरमधून नीरेतही ३२ हजार ६६९ क्‍युसेक इतका विसर्ग सोडला जात आहे. त्यामुळे भीमेत जवळपास ८४ हजार २६९ एवढा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात तिसऱ्यावेळेस अशी परिस्थिती उद्‌भवली आहे.

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी, वरील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने दौंडकडून सुमारे ४० हजार ५१० कुयसेक इतके पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. बुधवारपासूनच हे पाणी सोडण्यात येत आहे.

गुरुवारी पहाटे जवळपास १ लाख क्‍युसेक इतके पाणी भीमेत सोडण्यात येत होते. पण, दुपारी दोनच्या सुमारास हा विसर्ग ५१ हजार ६०० क्‍युसेकवर म्हणजे निम्मा करण्यात आला. त्यामुळे धोका काहीसा कमी झाला. पण विसर्ग कायम आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, वीर धरणातूनही नीरेमध्ये ३२ हजार ६६९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी पुढे भीमेत मिसळत आहे. त्यामुळे दोन्हीकडील प्रवाहाचा विचार करता भीममध्ये ८४ हजार २६९ क्युसेक इतके पाणी वाहत आहे. या पार्श्‍वभूमीवर भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, उजनी धरणातील पाण्याची पातळी ११०.३६ टक्‍क्‍यांवर आहे. धरणातील एकूण पाणी पातळी ४९७.२९० मीटर आहे. तर एकूण पाणीसाठा ३४७७.२५ दशलक्षघनमीटर आहे. त्यापैकी उपयुक्त साठा १६७४.४४ दशलक्षघनमीटर एवढा आहे. पुणे जिल्ह्यातील पावसावरच धरणातील पाण्याची स्थिती राहणार आहे. पण, सध्या पाण्याची साठवण क्षमता पाहून पुढे नदीत पाणी सोडले जात असल्याने पाणी पातळी स्थिर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com