जायकवाडीतील पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

जायकवाडीतील पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा
जायकवाडीतील पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा

परभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पामध्ये पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक ९७ हजार ४०० हेक्टर सिंचन क्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. येथील शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामाध्ये पाणी आवर्तने मिळण्याची खात्री झाली आहे. जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे विहिरी, कूपनलिका, अन्य सिंचन प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध नाही. या परिस्थितीत जायकवाडीमधील पाणीसाठ्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जायकवाडी प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र १ लाख ८३ हजार ३३२ हेक्टर आहे. डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात औरंगाबाद, जालना, परभणी या तीन जिल्ह्यांतील एकूण १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर सिंचन क्षेत्राचा समावेश आहे. उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात औरंगाबाद, बीड, नगर जिल्ह्यांतील एकूण ४१ हजार ६८२ हेक्टर सिंचन क्षेत्राचा समावेश आहे.

जिल्ह्यात डाव्या कालव्याची एकूण ८६ किलोमीटर लांबी आहे. वितरण प्रणालीतंर्गत ५ शाखा कालव्यांचा समावेश आहे. सेलू तालुक्यामध्ये ९६ हेक्टर, मानवत तालुक्यामध्ये १ हजार १०९ हेक्टर, पाथरी तालुक्यामध्ये २८ हजार ८३७ हेक्टर, परभणीत ३३ हजार ५२९ हेक्टर, गंगाखेडमध्ये ६ हजार ४७१ हेक्टर, पूर्णा तालुक्यातील १७ हजार ४२८ हेक्टर असे १७५ गावांच्या शिवारातील एकूण ९७ हजार ४०० हेक्टर सिंचन क्षेत्र आहे.

गतवर्षी (२०१८-१९) जायकवाडी धरणात पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे डाव्या कालव्याचे केवळ खरिपामध्ये एक संरक्षित, रब्बीमध्ये एक पाणी आवर्तन मिळाले होते. खरिपात १६ हजार ७४० हेक्टर, तर रब्बी हंगामामध्ये ४० हजारांवर हेक्टर क्षेत्र सिंचित झाले होते.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यातदेखील अपेक्षित पावसाच्या ३८ टक्केच पाऊस झाला. 

यंदा जिल्ह्यात मंगळवार (ता. १३) पर्यंत ४२२.७९ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात २७१.५३ मिलिमीटर पाऊस झाला. येलदरी, सिद्धेश्वर, निम्न दुधना हे मोठे प्रकल्प करपरा, मासोळी हे मध्यम प्रकल्प, २२ लघू प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा नाही. सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट राहिले. 

जायकवाडी धरणामध्ये मंगळवारी सकाळी आठपर्यंत ९० टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे खरीप हंगामातील संरक्षित पाणी आवर्तनाची खात्री झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com