कृष्णा नदीवरील जलसिंचन योजनांच्या पाणीउपशावर निर्बंध

कृष्णा नदीवरील जलसिंचन योजनांच्या पाणीउपशावर निर्बंध
कृष्णा नदीवरील जलसिंचन योजनांच्या पाणीउपशावर निर्बंध

कऱ्हाड, जि. सातारा : पाणीटंचाईचे संकट आणखी गडद झाल्याने आणि कोयना धरणातील पाणीपातळी खालावल्याने सातारा, सांगली जिल्ह्यांतील कृष्णा नदीवर असलेल्या उपसा जलसिंचन योजनांना आणि औद्योगिक योजनांना जलसंपदा विभागाने उपसाबंदी आदेश लागू केला आहे. ४ ते २१ जूनदरम्यान टप्प्याटप्प्याने ही उपसाबंदी होणार आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतीसाठीच्या आणि औद्योगीकरणासाठी सुरू असणाऱ्या पाणी योजना बंद राहणार आहेत. शेतीला पाणी देता यावे यासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोयना आणि कृष्णा नदीकाठी अनेक उपास सिंचन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्याही योजनांचा समावेश आहे. त्याद्वारे संबंधित तिन्ही जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. त्याचबरोबर नदीकाठावरून काही उद्योगांनाही पाणी देण्यात आले आहे. अलीकडे पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच महाराष्ट्र वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणाचीही पाणीपातळी पहिल्यांदाच झपाट्याने खाली आली आहे. त्यामुळे कोयना धरणातून सुरू असणाऱ्या वीजनिर्मितीवरही मर्यादा आल्या आहेत. धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी धरण प्रशासनाला दिल्या आहेत. टंचाईचे गडद होत चाललेले सावट आणि भविष्यात भासणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई याचा विचार करून प्रशासनाने नदीपात्रातही उपलब्ध असणारे पाणी पिण्यासाठी वापरले जावे या हेतूने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत जलसंपदा विभागाने सातारा, सांगली जिल्ह्यातील नदीकाठावर असणाऱ्या पाणी उपसा योजनांना आणि औद्योगिक पाणीपुरवठा योजनांना उपसाबंदी लागू केली आहे. ४ ते ९ जून, १० ते १५ जून आणि १६ ते २१ जून दरम्यान ही उपसाबंदी लागू असणार आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे टप्प्याटप्प्याने ही बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे त्या काही दिवसांत पावसाने हजेरी न लावल्यास पिके वाळून हातची जाण्याची स्थिती निर्माण होईल.  उपसा झाल्यास कारवाई  पाणीटंचाईची तीव्रता विचारात घेऊन जलसपंदा विभागाने कृषी नदीतून उपसा सिंचन योजनांना पाणी उपसाबंदी केली आहे. ती उपसाबंदी असतानाही एखाद्याने पाणी उपसा केल्यास संबंधिताचा पाणी परवाना आणि वीज कनेक्शन एक वर्षासाठी रद्द करून संबंधित उपास संच जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही जलसंपदा विभागाने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com