पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन

रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी पाण्याची उपलब्धता ही नेहमीच महत्त्वाची बाब ठरते. उपलब्ध पाण्याचा वापर पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत केल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते.
sprinkler irrigation is beneficial for gram crop.
sprinkler irrigation is beneficial for gram crop.

रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी पाण्याची उपलब्धता ही नेहमीच महत्त्वाची बाब ठरते. उपलब्ध पाण्याचा वापर पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत केल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते. ओलावा उपलब्ध झाल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो. तसेच ताण कमी राहिल्याने रोग व किडींचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते. गहू 

  • गहू पिकास हेक्‍टरी ४० सें. मी. (४० लाख लिटर) पाणी लागते. 
  • शेत ओलावून वाफसा आल्यावर गव्हाची पेरणी करावी. 
  • पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
  • मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते. 
  • पीक वाढीच्या काळात पुढील संवेदनशील अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते.

    पाणी     पाणी देण्याची वेळ पिकाची अवस्था
    पहिले पाणी पेरणीनंतर १८ ते २१ दिवस   मुकुटमुळे फुटण्याची अवस्था
    दुसरे पाणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस कांडी धरण्याची अवस्था
    तिसरे पाणी   पेरणीनंतर ६० ते ६५  दिवस फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था
    चौथे पाणी  पेरणीनंतर ८० ते ८५  दिवस दाणे भरण्याची अवस्था

    अपुरा पाणीपुरवठा असल्यास काही ठरावीक वेळेलाच पाणी देणे शक्य असल्यास, पाण्याच्या पाळ्या पुढीलप्रमाणे द्याव्यात.

  • गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
  • गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्‍य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी व दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
  • तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ व तिसरे पाणी ६५ दिवसांनी द्यावे.
  • रब्बी ज्वारी 

  • कोरडवाहू रब्बी ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पाणी  द्यावे. 
  • दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.
  • बागायती रब्बी ज्वारीस मध्यम    जमिनीत पाणी देण्याच्या अवस्था

  • पीक गर्भावस्थेत असताना (पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी)
  • पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी)
  • पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी)
  • कणसात दाणे भरताना पेरणीनंतर (९० ते ९५ दिवसांनी)
  • भारी जमिनीत बागायती ज्वारीस चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.
  • सूर्यफूल  सूर्यफूल पिकास संवेदनक्षम अवस्थेस पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. सूर्यफूल पिकाच्या संवेदनक्षम अवस्था

  • रोप अवस्था 
  • फुलकळी अवस्था
  • फुलोऱ्याची अवस्था
  • दाणे भरण्याची अवस्था
  • सूर्यफूल पिकास वरील संवेदनक्षम अवस्थेत पाण्याचा ताण पडू नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात. उत्पादनात घट येते. करडई

  • करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस कमी पाणी लागते. 
  • मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. 
  • कालांतराने ओलावा कमी झाला आणि पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले. 
  • दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. 
  • पिकास पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये. तसेच भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. जास्त पाण्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडते. म्हणून करडई पिकास हलके पाणी द्यावे.
  • तुषार सिंचनाचे अन्य फायदे

  • तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास आवश्‍यकतेनुसार योग्य प्रमाणात पाणी देता येते.
  • पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत तुषार सिंचनाने पाणी दिल्यास जमीन नेहमी भुसभुशीत राहते.
  • भुसभुशीतपणामुळे कोणतीही मशागत सुलभ होते. 
  • तुषार सिंचनाने पाणी दिल्यास शेतामध्ये साऱ्या, सरी - वरंबा पाडण्याची गरज भासत नाही. पर्यायाने यासाठीच्या मजुरी खर्चात बचत होते.
  • पारंपरिक सिंचन पद्धतीपेक्षा मूळकूज रोगाचे प्रमाण कमी होते.
  • पारंपरिक सिंचन पद्धतीच्या तुलनेत जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहते. परिणामी, पिकास दिलेली खतांची उपलब्धता वाढते. 
  • हरभरा

  • हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सेंटिमीटर पाणी लागते. 
  • प्रत्येक पाळी वेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ सेंटिमीटर) देणे गरजेचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. 
  •  स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे. 
  • पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. पाणी साचून राहिल्यास मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
  • जिरायत क्षेत्रासाठी  जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल. एखादे पाणी देणे शक्य असेल, तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायती क्षेत्रासाठी बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सरींतील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. लांबीसुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, त्यामुळे पिकाला प्रमाणशीर पाणी देणे सोयीचे होते.  

    पाणी पाळी मध्यम जमीन भारी जमीन 
    पहिले पाणी २० ते २५ दिवसांनी ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.
    दुसरे पाणी  ४५ ते ५० दिवसांनी ६५ ते ७० दिवसांनी द्यावे.
    तिसरे पाणी     ६५ ते ७० दिवसांनी द्यावे  ---

    * भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोन पाळ्या पुरेशा होतात. तुषार सिंचन हरभरा पिकासाठी फायद्याची  सुधारित हरभरा वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते. उत्पादनात मोठी घट येते. योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठीतुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत ठरते. संपर्क ः डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९० (कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com