agriculture news in marathi, water management a crucial issue : Prof. Singh | Agrowon

जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... : प्रा. नरेंद्र प्रताप सिंह
मनोज कापडे
शनिवार, 20 एप्रिल 2019

पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य या सर्वांचा ताण शेतीवर येतो आहे. त्यात पुन्हा जागतिक तापमान बदलामुळे शेतीमध्ये मोठे संकट उभे राहू पाहत आहे. या अजैविक ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे, त्यातून भविष्यातील शेतीला कशी दिशा द्यायची यावर संशोधन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था स्थापन केली आहे. बारामतीच्या माळेगाव परिसरात या संस्थेचे मुख्यालय आहे. संस्थेचे संचालक प्रा.

पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य या सर्वांचा ताण शेतीवर येतो आहे. त्यात पुन्हा जागतिक तापमान बदलामुळे शेतीमध्ये मोठे संकट उभे राहू पाहत आहे. या अजैविक ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे, त्यातून भविष्यातील शेतीला कशी दिशा द्यायची यावर संशोधन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था स्थापन केली आहे. बारामतीच्या माळेगाव परिसरात या संस्थेचे मुख्यालय आहे. संस्थेचे संचालक प्रा. नरेंद्र प्रताप सिंह यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी जल व्यवस्थापनावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका मांडली आहे. 
 

शेतीवरील जैविक ताण आणि अजैविक ताण यात काय फरक आहे? 

शेती म्हणजे वनस्पतीची वाढ. अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि आपण जगण्यासाठी वापरत असलेले इतर घटक यांचा मूलस्रोत वनस्पतीच आहेत. वनस्पतीच्या वाढीत ताण निर्माण करणारे मुख्य जैविक घटक कीड, बुरशी हे आहेत. त्यामुळे उत्पादन घटते. मात्र, काही अजैविक ताणामुळेदेखील वनस्पतीच्या वाढीला मर्यादा येतात. पर्यावरणातील बदल, तपमानवाढ, मातीचे अनारोग्य तसेच दुष्काळ या सर्व अजैविक घटकांमुळे पिकांवर ताण येतो. उत्पादन घटते. त्यामुळे अन्नसुरक्षा धोक्यात येते. या अजैविक ताणाच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन आणि संशोधन करण्याचे काम आमची संस्था करते. अजैविक ताणाचे कोणतेही कारण तुम्ही तपासले तर त्याचा परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होत असल्याचे आढळून येईल. अगदी तापमान वाढीमुळे मातीमधील ओलावा घटत जाणे म्हणजे पाण्याची अनुपस्थिती असणे असाच गृहित धरावा लागेल. पाऊस आता कमी होत जात आहे. पावसाचे दिवस कमी होत असून काही दिवसांत किंवा तासांत भरपूर पाऊस पडणे आणि त्यानंतर टंचाईची स्थिती येणे अशी विचित्र स्थिती बघण्यास मिळते आहे. त्यामुळे जल व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा बनला आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करण्यास शिकणे हेच मोठे आव्हान आणि उपायदेखील आता आपल्यासमोर आहे. 

जागतिक हवामान बदलाचे कोणते परिणाम जाणवत आहेत?

सध्या आपण अनुभवत असलेला मोठा दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळे, उष्णतेची लाट किंवा थंडीची लाट ही सर्व स्थिती ग्लोबल वॉर्मिंगमुळेच उद्भवत आहे. पर्यावरणातील बदलामुळे अन्नधान्ये, फळपिके, पशुधन अशी सगळी शेतीच अडचणीत येत आहे. मला सर्वात जास्त चिंता आहे ती उपलब्ध पाण्याची. मी तुम्हाला अगदी आमच्या मुख्यालयाच्या आसपासच्या भागापुरते म्हणजे बारामतीपुरते सांगतो. गेल्या हंगामात आम्हाला ७०० मिलिमीटर पाऊस मिळाला. यंदा तो अवघा ५०० मिलिमीटर मिळाल्यामुळे त्यातून तयार झालेला ताणतणाव मोठा आहे. त्याचे संपूर्ण परिणाम नजरेला लगेच दिसत नाहीत. विशेष म्हणजे एकाच दिवशी १०० मिलिमीटर पाऊस सर्वत्र झाला. आता हा पाऊस साठवायचा कसा? पावसाचे येणे असे अनिश्चित आणि असमान झालेले आहे. महाराष्ट्रात काही भागांत विहिरी आणि तळी कधी आटली नव्हती, अशा ठिकाणी यंदा प्रथमच जलाशये कोरडी झालेली आहेत. मी पाण्याच्या उपलब्धतेविषयी बोलत होतो. प्रति माणशी पाण्याची उपलब्धता ५० वर्षांपूर्वी पाच हजार मिलिमीटर होती. आता ती १७०० मिलिमीटरवर आली आहे. म्हणजे पाण्याची मानवासाठी किंवा शेतीसाठी उपलब्धता दरवर्षी घटते आहे. 

...म्हणजेच जल व्यवस्थापन हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अगदीच. ॲग्रोवनकडून हा विषय अजेंड्यावर आणला जातोय ही चांगली बाब आहे. पाण्याच्या वापराबाबत अतिशय दक्षता घ्यावी लागेल. शहरी भागातील पाण्याचे नुकसान टाळावे लागेल. तसेच, शेतीत पाण्याचा मोकाट वापर बंद करावा लागेल. प्रत्येक टप्प्यावर आता सूक्ष्म सिंचनाकडे जाण्याची वेळ आलेली आहे. पुण्याच्या आसपास अनेक धरण प्रकल्प आहेत. एकेकाळी भरपूर पाणी होते. आता तशी स्थिती नाही. शेतीमधील जल व्यवस्थापनातील बदलत्या तंत्राला डोळ्यासमोर ठेवून काही पिकांमधील विशिष्ट वाणांवर लक्ष केंद्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी विद्यापीठांशी करार केले जात आहेत. गहू, कांदा, कडधान्य पिकांचा समावेश पहिल्या टप्प्यात आम्ही केला आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांवर आम्ही लक्ष देत आहोत. त्यासाठी आम्ही भौगोलिक गरजदेखील लक्षात घेत आहोत. त्यामुळेच विद्यापीठांना या संशोधनात सहभागी करून घेतले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या विद्यापीठांना बरोबर घेत भौगोलिक गरजेनुसार संशोधन करण्याचे ठरवले आहे. उदाहरणार्थ, दापोली विद्यापीठाने धानावर तर परभणीत कडधान्यावर संशोधन व्हावे, असा प्रयत्न आहे. पश्चिम महाराष्ट्रात फळपिकांना संधी आहे. त्यामुळे कमी पाण्यात फळांचे जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर आमच्या संशोधनाचा भर राहील. या सर्व घडामोडींमध्ये आम्ही ठिबक संच तंत्रापेक्षाही सबसरफेस इरिगेशन तंत्राला महत्त्व देणार आहोत. या प्रयोगांमध्ये आम्ही राज्यातील महत्त्वाच्या संस्थांना उदाहरणार्थ भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, वाल्मी तसेच जल व्यवस्थापनाशी संबंधित इतर संस्थांना कसे सहभागी करून घेता येईल याची चाचपणी करीत आहोत. 

जल व्यवस्थापनात पूर्वीची काही तंत्रे चांगली होती?

अतिशय चांगली होती. मी स्वतः ग्रामीण भागातून शिक्षण घेत शास्त्रज्ञ झालो आहे. पूर्वी प्रत्येक गावाभोवती तीन-चार तळी असायची. त्यातील एक तळे पाण्यासाठी राखीव असायचे. इतर तळी शेतीसाठी, जनावरांसाठी, इतर वापरासाठी राखीव असायची. पाणी उपसा करणारी पिके नव्हतीच. आता तळी गेली. त्यामुळे होणारे पुनर्भरणदेखील थांबले. महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून प्रथमच पुनर्भरणाच्या तंत्राकडे लक्ष वेधले गेले. त्याचे दृष्य स्वरूपातील लाभदेखील अनेक भागांमध्ये दिसत आहेत. शेततळी, सामूहिक तळी, गावतळे या सर्व बाबींना जल व्यवस्थापनात महत्त्व आहे. 

तुमच्या संस्थेकडून महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या पिकांवर संशोधन केले जात आहे?

राज्यात आम्ही हरभरा, कांदा, तूर, चारा पिके, गहू तसेच काही फळपिकांना डोळ्यासमोर ठेवले आहे. करण्यासारख्या अनेक बाबी आहेत. मात्र, मनुष्यबळ कमी असल्यामुळे मर्यादा येतात. तरी देखील विद्यापीठांच्या बरोबरीने काही मुद्द्यांवर आमचे संशोधन सुरू आहे. उसाच्या अंगाने एक महत्त्वाची बाब सांगतो. उसाचे पाचट जाळण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. तसेच, मातीचेही नुकसान होते. पाचट जाळण्याऐवजी मल्चिंग स्वरूपात वापरले जावे, असा आमचा आग्रह आहे. बाकी आमच्या संशोधनात्मक कार्यक्रमात दीर्घकाळ चालणाऱ्या इतर बाबी बऱ्याच आहेत. प्रतिकूल हवामान घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणती प्रणाली विकसित करावी लागेल, वनस्पती व प्राणी यांच्यात हवामान किंवा पाण्याचा ताण सहन करण्यारे कोणते तत्त्व आहे हे शोधणे, त्याचा जनुकीय अभ्यास करणेदेखील महत्त्वाचे आहे. 

जनुकीय अभ्यासात कशावर भर दिला जात आहे?

निसर्गाने प्रत्येक वनस्पतीला प्रतिकूल स्थिती तगून राहण्यासाठी काही देणगी दिलेली आहे. ती जनुकीय स्वरूपाची आहे. भयाण दुष्काळातही बाभळी तगून राहतात. उंबर, चिंचेला पाला असतो, पळससारख्या झाडांना पालवी असते व फुले असतात. हे कशाने घडते, याचा शोध घेतला गेला पाहिजे. पिकांमधील अजैविक ताणांना प्रतिसाद देणाऱ्या या गुणधर्मांची पडताळणी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी संबंधित जनुकांची पडताळणी कशी करता येईल याचे तंत्र विकसित करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी जिनोमिक्स, प्रोटिओमिक्स अशा तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करणार आहोत. अजैविक ताणाला सहनशील बनविण्यासाठी या वनस्पती आणि सहजीवी जिवाणू यांच्यात एक परस्पर स्नेहबंध असतात. त्याचा अभ्यास आम्हाला करावा लागेल. 

ॲग्रोवनकडून गेल्या वर्षभरात जमीन सुपीकतेशी संबंधित अनेक उपक्रम राबविले गेले. माती हादेखील तुमच्या संस्थेचा एक अभ्यासाचा विषय आहे ना?

पुढचा सर्व काळ शेतकऱ्यांना चिमूटभर सुपीक मातीच्या आणि थेंबभर पाण्यासाठी झगडावे लागणार आहे. मातीच्या ताणामुळे जमिनी खारवट, क्षारवट होत आहेत. अन्नद्रव्याची कमतरता, अवजड धातूंचे त्यात होणारे मिश्रण यामुळे आपल्या शेतातील माती धोक्यात आली आहे. आपल्या पूर्वजांनी मातीला आईची उपमा दिली आहे. मृदा मेटाजिनोमिक्स हा एक वेगळा विषय आहे. त्यात सूक्ष्म जैवतंत्रज्ञान, जैविक प्रणाली, जनुकीय व रेण्विय संबंध या सर्व बाबींचा आम्ही अभ्यास करतो आहोत. कारण काटेकोर शेतीचा सर्व गाभा त्यातच लपलेला आहे. माती व पाण्याच्या अभ्यासाशिवाय काटेकोर शेती होऊ शकत नाही. 

तुमच्या संस्थेचे पुढचे उद्दिष्ट काय आहे?

मी आता तुम्हाला सांगितलेले हे सर्व संशोधन या प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांच्या बांधावर नेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था आता विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून संशोधनाचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न करते आहे. संस्थेला मनुष्यबळाच्या मर्यादा आहेत. मात्र, आमच्या क्षेत्रात आमची संस्था जागतिक पातळीवरचे एक उत्कृष्ट केंद्र म्हणून नावारूपाला यावी, अशी जिद्द ठेवून आम्ही काम करतो आहोत. 

- मनोज कापडे
 ९८८११३१०५९

इतर संपादकीय
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
साखरेचं वाढतं दुखणंतीन दिवसीय साखर परिषदेची सांगता नुकतीच पुण्यात...
धरणफुटीला जबाबदार ‘खेकडे’ पकडातिवरे धरणफुटीच्या निमित्ताने जलविकासाचे स्वरूप व...
संकटातील संत्राअ  त्याधुनिक तंत्रज्ञानातून उत्पादनवाढ आणि...
विरोधकांना सूर गवसेनाकाँग्रेस पक्षाची ‘निर्णायकी’ अवस्था अद्याप...
हमीभाव की कमी भावदेशभरातील शेतकरी पेरणीच्या कामांमध्ये मग्न असताना...
‘अर्थ’हीन संकल्पआर्थिक पाहणी अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे...
अडचणीतील साखर उद्योगाचा भविष्यवेधराज्य सहकारी बॅंकेने ‘साखर परिषद २०-२०’चे आयोजन...
सोन्याची सुरी उरी हाणून घेऊ नकाखड्ड्यावरून उडी मारताना पाऊल नक्की खड्ड्याच्या...
कोरडी धरणे जोडून पाणीबाणी हटणार?महाराष्ट्र सरकारच्या जनकळवळ्याबद्दल कौतुक करायला...
ढिसाळ व्यवस्थेचे बळीरा ज्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या...
‘गोड’तेलाचे कटू सत्यरोजच्या जेवणात खाद्य (गोड) तेलाचा जास्त उपयोग...
बदल स्वागतार्ह; पण...राज्यात कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचा घोळ मागील...
काळी दुनिया उजेडात आणापि कांची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न...
संकल्पासाठी तारेवरची कसरतपुढील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाच...
मॉन्सून आला; पण पुढे काय?ख रीप हंगामासाठी कोणते पीक निवडायचे आणि त्याची...
‘लष्करी अळी’चा विळखामेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मी वर्म) या किडीला...