agriculture news in marathi, water management of dryland area | Agrowon

कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर, शर्मा, पाटील

सतीश कुलकर्णी
शनिवार, 20 एप्रिल 2019

पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी करायचे असते, असा समज पसरलेला आहे. खरे तर जल व्यवस्थापनाची सर्वाधिक गरज कोरडवाहू क्षेत्रामध्ये आहे. कारण येथे संरक्षित पाणी उपलब्ध असत नाही. त्या दृष्टीने आपल्याला जे काही पाणी साठवायचे आहे, ते मातीमध्ये ही भावना शेतकऱ्यांमध्ये रुजली पाहिजे. पाण्याचा पिकांसाठी कार्यक्षम वापर करण्याच्या बाबतीत प्रतापराव चिपळूणकर, विश्वासराव पाटील आणि सुभाष शर्मा यांसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव मोलाचे आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहेत. 

पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी करायचे असते, असा समज पसरलेला आहे. खरे तर जल व्यवस्थापनाची सर्वाधिक गरज कोरडवाहू क्षेत्रामध्ये आहे. कारण येथे संरक्षित पाणी उपलब्ध असत नाही. त्या दृष्टीने आपल्याला जे काही पाणी साठवायचे आहे, ते मातीमध्ये ही भावना शेतकऱ्यांमध्ये रुजली पाहिजे. पाण्याचा पिकांसाठी कार्यक्षम वापर करण्याच्या बाबतीत प्रतापराव चिपळूणकर, विश्वासराव पाटील आणि सुभाष शर्मा यांसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव मोलाचे आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहेत. 

महाराष्ट्रात एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी केवळ १७.५ टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. याचा अर्थ सुमारे ८२ टक्के शेती कोरडवाहू आहे. असे असूनही शेती सुधारणांचा विचार करताना केवळ बागायती क्षेत्राला प्राधान्य दिले जाते. कोरडवाहू शेतीची एकूण व्यावसायिक उलाढाल व मूल्य कमी असल्याने ती संशोधनाच्या पातळीवरही दुर्लक्षित राहते. कोणतीही शेती ही निसर्गावरच अवलंबून असली तरी कोरडवाहू शेतीचे मॉन्सून आणि पावसावरील अवलंबित्व अधिक धारदार ठरते. आकाशाकडे नजर लावून बसलेला शेतकरी हे केवळ प्रतीकात्मक राहत नाही. तो तुमच्या-माझ्या घरात, रानात, पारावर अवतरलेला असतो. ग्रामीण भागात कुठेही जा, गप्पांचा सूर पावसावर वळल्याशिवाय राहत नाही. आकाशाकडे बघत बघत उन्हाळ्यामध्ये मशागतीची कामे उरकून शेतकरी तयार असतो. पावसाचे चार महिने शेतकऱ्यांच्या जिवाची उलघाल सतत सुरू राहते. `आला नाही, तर कधी येणार`, `आता पडायला हवा होता` अशा वाक्यांपासून `का जिवावर उठलाय` इथपर्यंत! दुष्काळग्रस्त, कोरडवाहू गावांत ग्रामस्थांचा जीव शेतीत जितका अडकलेला असतो, तितकाच पावसात.  

पिकासाठी पाण्याचे नियोजन करायचे, हा विषय कोरडवाहू भागात फारसा बोलला जात नाही. जल व्यवस्थापनाचा विचार होतो तो प्रामुख्याने बागायती भागामध्ये. राज्याच्या बागायती पट्ट्यामध्ये ठिबक सिंचन चांगलेच रुजले आहे. अनेक बागायती गावांतही पावसाची वाट पाहिली जातेच. त्याशिवाय नद्या, नाले, विहिरी भरणार नाही, याची जाणीव त्यांनाही असतेच. 

उपलब्ध पाणी हंगामाच्या शेवटपर्यंत पुरवण्याची धडपड सुरू असते. शेततळ्यांखाली जमीन वाया जाते ही शेतकऱ्यांची सुरवातीची मानसिकता बदलून आता अनेक गावांमध्ये शेततळ्यांची स्पर्धा सुरू झाली आहे. पावसाळ्यात शेततळे भरून घेऊन फळबाग लावणारे आणि जगवणारे बहुतांश शेतकरी आपल्या आजूबाजूला दिसतात. ही शेततळ्यांची कल्पना कोरडवाहू गावांमध्ये का रुजली नाही, याचा विचार करायलाच हवा. त्यात मुळातच पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक वेळा शेततळे भरत नसल्याचा मुद्दा एका कोरडवाहू शेतकऱ्याने सांगितला. शेततळे भरून ठेवण्यासाठी नदी, नाला किंवा वाहता पाण्याचा स्रोत, एखादी विहीर किंवा बोअरवेल आवश्यक ठरतो. पावसाची अनियमितता हा विषय तर कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत अडचणीचा ठरतो. 
यासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी प्र. र. चिपळूणकर म्हणाले,

‘‘पावसाचे दिवस कमी असण्याबरोबरच थोड्याच काळात जास्त पाऊस पडून गेल्यामुळे पाणी झिरपण्याऐवजी वाहून जाते. वाहून जाताना मशागत करून तयार असलेल्या शेतातील सुपीक मातीची धूपही करते. इथे शून्य मशागत किंवा कमी मशागतीची शेती उपयुक्त ठरू शकते. यातून उत्पादन खर्चात बचतही साधेल. मोठ्या कोरडवाहू पट्ट्यामध्ये कापूस आणि तूर ही पिके प्रामुख्याने आहेत. यांचे लागवड अंतर अधिक असल्याने दरम्यान मूग, उडीद यासारखी आंतरपिके घेतली जातात. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो. एक तर अपूरा पाऊस, दोन पावसातील मोठा खंड यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्यांची वाढ खुंटते. वेळ उलटून गेल्यानंतर पडलेल्या पावसाने पीक वाढू लागेपर्यंत किंवा दाणे भरण्याच्या स्थितीमध्ये आल्यानंतर जमिनीतील ओलावा संपलेला असतो. या काळात पावसाची अपेक्षा असली तरी तो पडेलच याची खात्री नसते.``

कोरडवाहू शेतीतील या समस्या लक्षात घेता
खालील उपाययोजना फायद्याच्या ठरतील...

 • कापूस, तूर मिश्र पीक घेण्याऐवजी जमिनीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हलकी नांगरणी, वखराची पाळी अशा अल्प मशागतीसह स्वतंत्रपणे ही पिके घ्यावीत. 
 • कापूस, तूर यांची टोकण पद्धतीने पेरणी करावी. आवश्यकता वाटल्यास बैल किंवा ट्रॅक्टरने आवश्यक अंतरावर काकर पाडून घ्यावी. त्यामुळे वेगाने व कमी कष्टामध्ये टोकणीचे काम संपते. पेरणी यंत्राने पेरणी केल्यानंतर जास्त बी पडून, नंतर विरळणी करण्याचे काम वाढते. या शेतात पूर्वमशागतीचा ७५ ते ८० टक्के खर्च वाचतो. मिश्र पिकाच्या वेगळ्या शेतात हलक्या मशागतीचा खर्च २० ते २५ टक्के इतकाच होतो. 
 • कपाशीच्या ओळीतील प्रचलित अंतर ६० ते १२० सेंमी असते, ते वाढवून १५० ते १८० सेंमी ठेवावे. या पट्ट्यामध्ये तणांची वाढ होऊ द्यावी. आजवर आपण तणांकडे शत्रूत्वाच्या भावनेने पाहत असलो तरी तणांच्या मुळामध्ये चांगल्या प्रकारे पाणी साठून राहते. पाऊसमान आणि तणाच्या वाढीचा विचार करून उलट्या वखरीने किंवा एखाद्या अवजाराने ही तणे भुईसपाट करावीत. त्यामुळे जमिनीवर जाड आच्छादन होऊन जमिनीवर पडणारा सूर्यप्रकाश रोखला जाईल. बाष्पीभवन कमी होते. जमिनीखाली तणांच्या मुळाचे जाळे तयार झालेले असते. जिवंत मुळे, झाडांमध्ये ८० ते ८५ टक्के पाणी असते. तणे वाळताना हे पाणी जमिनीतील ओलाव्याच्या वाढीसाठी मदत करते. मुळे वाळल्यानंतर त्यांचे आकारमान कमी झाल्याने जमिनीत खोलपर्यंत हवा खेळती राहते. या वातावरणामध्ये जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवणाऱ्या व पिकाला अन्नपुरवठा करणाऱ्या जिवाणूंचे काम कार्यक्षम रीतीने सुरू होते. 
 • प्रत्येक झाडाला वाढीसाठी मोकळी जागा उपलब्ध होत असल्याने दीर्घ मुदतीच्या कपाशी किंवा तुरीची जात निवडावी. 
 • लांब अंतरावरील पिकांच्या ओळीच्या दोन्ही बाजूने फूटभर अंतर हे कोळपणी, भांगलणी अगर तणनाशकाच्या फवारणीने तणापासून मुक्त ठेवावे. यातून खर्चात बचत होते. जवळच्या अंतरावरील पिकांमध्ये मात्र १०० टक्के आंतरमशागत करावी. 
 • तणे आणि मागील पिकांच्या अवशेषातून सेंद्रिय खताचे व्यवस्थापन करावे. यातही जमिनीच्या खालील मुळांचे खत हे सर्वोत्तम दर्जाचे असते. सावकाश कुजणाऱ्या घटकापासून दीर्घकाळ अन्नद्रव्याची उपलब्धता होत राहते. मधल्या पट्ट्यात वाढवलेल्या तणांतून आपणास हलक्या ते मध्यम दर्जाचे खत मिळते. सध्या कोरडवाहू शेतामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. अशा वेळी वरील बिगर खर्चिक सेंद्रिय खते सुपीकता टिकवण्यासाठी फायद्याची ठरतील. 
 • आपण कितीही ठरवले तरी सर्व कोरडवाहू क्षेत्रामध्ये ओलिताची व्यवस्था करणे अशक्य आहे. अशा वेळी तणांच्या पट्ट्याद्वारे पावसाचे पाणी शोषून घेणे, मुळामध्ये साठवून ठेवणे व पुढे तेच पाणी दीर्घमुदतीच्या पिकांसाठी उपलब्ध करणे शक्य होते. मोकळ्या जमिनीपेक्षा तणांद्वारे अधिक पाणी धरून ठेवले जाते. पाऊस गेल्यानंतरही पुढे दोन-अडीच महिने ओलावा पुरवणे शक्य होते. 
 • तणांमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे व कर्बाचे प्रमाण वाढते. हेच सेंद्रिय कर्ब जमिनीची जलधारण क्षमताही वाढवते.
 • पुढील वर्षी तणाच्या पट्ट्यामध्ये पीक घ्यायचे आणि पिकाच्या पट्ट्यामध्ये तणांचा पट्टा.

तुरीसह कमी पाण्यातील फळबाग : सुभाष शर्मा 

यवतमाळ येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांचेही कोरडवाहू शेती शाश्वत करण्याच्या दृष्टीने अनेक प्रयोग सुरू आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे ः

 • कोरडवाहू शेतीमध्ये तूर पिकासह अत्यंत कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळ, करवंद अशा फळबागेची रचना उपयुक्त ठरू शकते. 
 • कोरडवाहू शेतीमध्ये जलधारणा आणि सुपीकता वाढवण्यासाठी शेणखताचा वापर वाढवला पाहिजे. पहिल्या वर्षी किमान एकरी चार ट्रॉली शेणखत आवश्यक आहे. त्यानंतर गुळाचे पाणी मारून शेणखताचे मूल्यवर्धन केलेले एक ट्रॉली शेणखत पुरेसे होईल. मात्र, त्यासाठी या रचनेमध्ये दुग्ध व्यवसाय आणि गोपालन जोडणे आवश्यक आहे. शेतीतून चाऱ्याची, तर जनावरांपासून शेणखताची उपलब्धता अशी जोड होईल. वर्षभर उत्पन्नासाठी फळबाग असे गणित बसवले आहे. मुक्त संचार पद्धतीमुळे कमी मनुष्यबळामध्ये अधिक जनावरे पाळता येतील. गायींसाठी शेतीतील सुमारे दोन टक्के क्षेत्र राखीव ठेवले आहे.
 • शेतीमध्ये ओलावा टिकविण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले. पडणारा पाऊस शेतात जिरवण्यासाठी, मातीची धूप रोखण्यासाठी बांधबंदिस्ती आवश्यक आहे. पिकांची लागवडही उतारानुसार समतल (कंटूर) पद्धतीने केली जाते. सोबत शेतात डवऱ्याच्या साह्याने ८० फुटी बाय १० फुटी लॉकिंग चर तयार केले. यामुळे संपूर्ण पाणी शेतात थांबले जाऊन आर्द्रता वाढते. 
 • फळबागेमध्ये करवंद, सीताफळ या झाडांची योजना केली आहे. त्यासाठी बाटल्यांच्या साह्याने स्वस्तातील ठिबक सिंचन उपयुक्त ठरते. 
 • पर्यावरणासाठी चिंच, आंबा, फणस, कडूनिंब जांभूळ अशा मोठ्या झाडांची लागवड शेताच्या बांधावर केली आहे. त्यात ५० फुटांवर एक या प्रमाणे लिंबाची झाडे असल्यामुळे वर्षभर उत्पन्नाचा स्रोत सुरू राहतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या झाडामुळे शेतातील मायक्रोक्लायमेट सुधारते. जिवाणूंची वाढ होऊन शेतीची सुपीकता वाढते. 
 • पावसाळ्यात करवंदे, दिवाळीत सीताफळे आणि बांधावर लावलेल्या लिंबाचे वर्षभर उत्पादन सुरू राहते. सोबत तुरीचे उत्पादन प्रक्रियेनंतर म्हणजेच डाळ करून विकणे, दुधाचे उत्पादन यातून एकरी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणे अवघड नाही. 
 • आमच्या भागामथ्ये वार्षिक ९०० ते १००० मि.मी. सरासरी पाऊस होतो. एका एकरावर एक सेंमी पाऊस पडल्यास त्यातून ४० हजार लिटर मिळते. या प्रमाणे १०० सेंमी पावसापासून साधारणपणे ४० लाख लिटर पाणी शेतात पडते. हे सर्व पाणी शेतातच मुरवण्यासाठी बांधबंदिस्तीसह लॉकिंग सऱ्या उपयुक्त ठरतात. यातील २० टक्के पाण्याचे बाष्पीभवन गृहित धरले तरी पिकासाठी ३२ लाख लिटर पाणी उपलब्ध होईल. 
 •  कोरडवाहू शेती करताना दर चार ते पाच वर्षानंतर येणाऱ्या दुष्काळी स्थितीसाठी सावध राहिले पाहिजे. त्याच प्रमाणे पावसामध्ये मोठा खंड पडल्यास उत्पादनामध्ये घट होते. आपण करत असलेली शेती कमीत कमी खर्चाची व बिगर कर्जाची असली पाहिजे. त्यामुळे दरवर्षी काही रक्कम बाजूला टाकत दुष्काळी स्थिती व नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची ऐपत तयार होते.

कमी पाण्यात उसाचे नियोजन : विश्वासराव पाटील
पाण्याचे व्यवस्थापन हा मुद्दा आला की ऊस हे सर्वाधिक पाणी फस्त करणारे पीक असल्याची टीका सुरू होते. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ऊस असतोच. मात्र, कोरडवाहू भागातही अनेक ठिकाणी विहिरीच्या पाण्यावर ऊस घेण्याची धडपड करणारे अनेक शेतकरी दिसतात. कमीत कमी पाण्यावर ऊस कसा घेता येईल, असा प्रश्न मी लोहारा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील प्रयोगशील शेतकरी विश्वासराव पाटलांना विचारला. त्यावर त्यांनी तुमची जमीन श्रीमंत आहे का, असा प्रश्न मला विचारला. 

पहिल्यांदा जमीन श्रीमंत केली पाहिजे अशी विश्वासरावांची आग्रही भूमिका आहे. ते म्हणाले, ‘‘मी ऊस लागवडीचे नियोजन एक वर्ष आधी करतो. ऊस घ्यावयाच्या जमिनीमध्ये मी खरिपात हिरवळीची किंवा बेवडाची पिके उदा. धैंचा, ताग, उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग घेतो. धैंचा, ताग फुलावर येण्याआधी सुमारे ४५ दिवसांनंतर जमिनीत नांगराने गाडतो. 

तिथे गुरे, ढोरे, शेळ्यामेंढ्या यांचे आखर बसवतो. आवश्यकता वाटल्यास नदीनाल्याचा पाझर तलावाचा गाळ टाकतो. रब्बीमध्ये कोणतेही पीक न घेता जमिनीला विश्रांती 
देतो. ओल टिकवण्यासाठी वखर पाळ्या करून मृद आच्छादन करतो. अशा प्रकारे जमीन 

श्रीमंत झाल्यानंतर मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण उत्तर दिशेने 
अडीच ते तीन फुटावर मृत सऱ्या पाडतो. मध्ये पाच फुटाचा पट्टा सोडतो. मॉन्सूनच्या पावसानंतर वाफसा आल्यानंतर तिथे जीवामृत, घनजीवामृत टाकतो. घरच्याच उसाच्या 
बेण्यावर संस्कार करून, ३ डोळ्यांच्या बेण्याची लागवड करतो. त्यावर माती लोटून देतो. 

पुढील ८ ते १० दिवसात पाऊस पडला की नैसर्गिक ओलीवर ऊस उगवायला सुरुवात होते. मधल्या पाच फुटाच्या पट्ट्यामध्ये धैंचा, ताग, मूग, उडीद किंवा भुईमूग असे आंतरपिक घेतो. जून ते सप्टेंबर या काळात यातून उत्पादन मिळून जाते. त्यातील बायोमास दोन उसाच्या ओळीमध्ये आच्छादन करतो. 
त्यामुळे जमिनीतील ओल व वाफसा टिकून राहतो. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाण्याचे नियोजन करावे लागते.`` 

पाण्याचे नियोजन
विश्वासरावांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमधील पाणी नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ पूर्वी पाणी होते त्या वेळी १५ दिवसांच्या अंतराने उसाच्या जोडओळीला थोडेसे पाणी देत असे. त्यातही मधला पाच फुटाचा पट्टा कोरडा. नंतर जोडओळी पाणी अशा प्रकारे तीन एकर ऊस लागवड असल्यास त्यातील अर्ध्या एकर क्षेत्रालाच पाणी देत होतो. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यामध्ये १५ दिवसांच्या अंतराचे वरील प्रकारे कमी पाण्याच्या पाळ्या व त्या सोबत जीवामृत देत असे. मात्र, गेल्या २० वर्षापासून पाणी कमी झाल्याने ठिबक सिंचनावरच ऊस घेतो. यातील फिल्टरमध्ये वस्त्रगाळ करून जीवामृत टाकतो. दरम्यानच्या काळात मातीखालची ओल टिकून राहण्यासाठी निंदणाच्या गवताचे दोन ओळीमध्ये आच्छादन करतो. मधील पाच फुटाच्या पट्ट्यात १ बेलाच्या औताने हलकी वखर पाळी करून मृदा आच्छादन करतो. मार्चपासून उसाची तोडणी सुरू होते. मार्च ते जून मध्यावधीपर्यंत रसवंतीगृहांना ऊस देतो. त्यामुळे पाच ते साडेपाच हजार रुपये प्रति टन असा दर पडतो.`` 

खोडव्याचे नियोजन 
उसाची पाने व काडी-कचरा न जाळता त्याचे आच्छादन करण्यावर विश्वासरावांचा कटाक्ष आहे. पूर्वी पाणी होते, त्यावेळी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते एक पाणी देत असत. नंतर येणाऱ्या पावसाच्या ओलीवर व आच्छादनामुळे जून ते ऑक्टोबर पाणी देण्याची गरज भासत नसे. तसेच तणे उगवत नसल्यामुळे आंतरमशागत करायची गरज पडत नव्हती. जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या प्रचंड वाढत असे. या उसाला दुसरे पाणी ऑक्टोबरमध्ये, तिसरं पाणी जानेवारीमध्ये, फेब्रुवारी-मार्चमध्ये उसाची तोडणी. अलीकडे ठिबक सिंचन केल्यामुळे मातीखालील ओल बघून त्यानुसार मधून अधून ठिबकचा वापर केला जातो.  

वनभिंतींचा फायदा 
सतत वाहत्या वाऱ्यामुळे ओल कमी होते. ती टाळण्यासाठी विश्वासरावांनी शेताच्या बांधावर पश्चिम व दक्षिणेकडे वनभिंती उभ्या केल्या आहेत. यात बांबू, लिंब, बेहडा, जांभूळ, उंबर, सीताफळ, बोर अशी झाडे जोपासलेली आहेत. त्यातून पालापाचोळ्याबरोबरच उत्पन्नही मिळते. शेतातील ओल टिकवण्यासाठी उताराला आडवी बांधबंदिस्ती, नांगरट, वखरणी, पेरणी यावर भर आहे. वरंबा-सरी पद्धतीने पिकाची लागवड केली जाते. 

- सतीश कुलकर्णी
 ९९२२४२१५४०


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...