नेर धरणातील पाणी आवर्तन कालव्यात सोडले

The water in the Ner Dam was released into the canal
The water in the Ner Dam was released into the canal

सातारा : मागणी अर्ज व पाणीपट्टी भरल्याने अखेर खटाव तालुक्यातील नेर धरणातील पाणी रविवारी कालव्यात सोडण्यात आले. खातगुण येथील राम ओढा परिसरातील शेतकऱ्यांनी १९० हेक्टर क्षेत्रावरील पाणी मागणी अर्ज व पाणीपट्टी भरल्याने पाणी सोडण्यातील महत्त्वाचा अडथळा दूर झाल्याने पाणी सोडणे शक्य झाले.

रविवारी सकाळी उपअभियंता सुभाष खाडे, शाखाअधिकारी विजय फरांदे, कालवा निरीक्षक अमोल लेंभे, शकील पठाण, मधुकर शिंदे यांच्या उपस्थितीत धरणातून पाणी सोडण्यात आले. उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांनीही मागणी अर्ज भरावेत, असे आवाहन करतानाच पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. 

नेर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी खटावमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. पाटबंधारे विभागाने १० जानेवारीलाच पहिले आवर्तन सोडण्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र, शेतकऱ्यांनी मागणी अर्ज जमा न केल्याने पाणी सोडणे शक्य झाले नव्हते. फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी केवळ १० टक्के क्षेत्रावरील मागणी नोंद झाली होती. 

पाटबंधारे विभागाच्या अपेक्षेप्रमाणे ओलिताखाली येणाऱ्या ६०० हेक्टर क्षेत्रापैकी किमान ७० टक्के क्षेत्रावरील पाणी मागणी अर्ज जमा होणे गरजेचे होते. सध्या मागणी कमी असली, तरी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुभाष खाडे यांनी सांगितले.

धरणामुळे पुसेगाव, खातगुण, भांडेवाडी, खटाव, सि. कुरोली, दरूज, भुरकवडी, नायकाचीवाडी आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध होऊन सुमारे दीड हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येते. या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा व अन्य बागायती पिकांना होणार आहे.

कालव्याच्या परिसरातील विहिरी व बोरवेलच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे. धरणातून सोडलेले पाणी उद्यापर्यंत डाव्या व उजव्या कालव्यात पोहचेल. मात्र आणखी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करण्याचे आवाहन कालवा निरीक्षक अमोल लेंभे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com