girana
girana

खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घट

गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार किंवा अतिजोरदार पाऊस झालेला नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस नसल्याने धरणांमधील पाण्याची आवक कमी झाली आहे.

जळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार किंवा अतिजोरदार पाऊस झालेला नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस नसल्याने धरणांमधील पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यातील अनेर, पांझरा, कनोली आदी प्रकल्पांमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.  तापी नदीवरील भुसावळ नजीकच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबला आहे. मध्य प्रदेशात तापी नदीचा उगम आहे. तसेच या नदीला पूर्णा, भोगावती, मोर, सूर, गिरणा, अंजनी आदी नद्या येऊन मिळतात. पाऊस थांबल्याने या सर्वच नद्यांमधील पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे तापी नदीचा पूर ओसरला आहे. हतनूर प्रकल्पाचे १२ दरवाजे सोमवारी उघडे होते. सध्या चार दरवाजांव्दारे विसर्ग सुरू आहे. जामनेरातील वाघूर नदीचे पाणलोट क्षेत्र औरंगाबाद-चाळीसगावनजीकच्या सातमाळा पर्वत, अजिंठा डोंगररांगांमध्ये आहे.  या भागातील पाऊसही बंद आहे. यामुळे वाघूर प्रकल्पातील आवक घटली आहे. वाघूर प्रकल्पातून सध्या कुठलाही विसर्ग सुरू नसल्याची माहिती मिळाली. चाळीसगाव व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील गिरणा धरणाचे पाणलोट क्षेत्र गुजरातमधील सापुतारा, मालेगाव आदी भागात आहे. या नदीवरील नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, ठेंगोडा, केळझर आदी लहान-मोठ्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. या प्रकल्पांमधून पाणी थेट पुढे गिरणा धरणात येते. गिरणा धरणातील आवकही कमी झाली असून, यामुळे धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

गिरणा नदीला प्रवाह गिरणा नदीला सध्या बऱ्यापैकी प्रवाही पाणी आहे. नदीत मन्याड लघू प्रकल्पातून पाणी येत आहे. तसेच पाचोरामधील लघू प्रकल्पांच्या सांडव्याचे पाणीदेखील गिरणा नदीत येत आहे. यामुळे गिरणा नदीत सध्या बऱ्यापैकी पाण्याचा प्रवाह आहे. धुळ्यातील पांझरा (ता.साक्री), अनेर (ता.शिरपूर), कनोली (ता.धुळे), मालनगाव या प्रकल्पांमधील विसर्गही कमी झाला आहे. अनेर धरणातून दोन दरवाज्यांव्दारे विसर्ग सुरू  असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com