मुळानगर, जि. नगर : मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडून गुरुवारी (ता.१) जायकवाडीला पाणी सोडले.
मुळानगर, जि. नगर : मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडून गुरुवारी (ता.१) जायकवाडीला पाणी सोडले.

जायकवाडीत उद्या दुपारपर्यंत पाणी पोचणार

नाशिक/नगर: नगर आणि नाशिक जिल्ह्यातून ८.९९ टीएमसी पाणी सोडल्यानंतर उद्या (ता.३) दुपारपर्यंत ते जायकवाडी धरणात पोचण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीनही धरण समूहांमधून, तर नगर जिल्ह्यातील मुळा, निळंवडे धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाचे नगर, नाशिक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र आहे. नगर, नाशिकमधून जाणाऱ्या‍ पाण्यावरच जायकवाडीचे भवितव्य अवलंबून आहे. यंदा जायकवाडी प्रकल्पात ३८ टक्के पाणी उपलब्ध आहे. मात्र जायकवाडीवर निम्म्या मराठवाड्याची तहान भागवली जाते. जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी वाटप कायद्यानुसार उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार पाणी सोडण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. गुरुवारी सकाळी नाशिकच्या दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकहून २४ तासांत पाणी जायकवाडी धरणात पोचणार आहे. पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २२ ऑक्टोबर रोजी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला दिले होते. समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नाशिकसह नगर जिल्ह्यातील धरणांमधून २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पाणी सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिले होते. गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी... (Video) नगर जिल्ह्यामधील मुळा, भंडारदरा धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार होते. न्यायालयात त्याबाबत याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानेही पाणी सोडण्याचे बुधवारी आदेश दिले. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही धरणांतून पाणी सोडले. धरणाचे सर्व अकरा दरवाजे एक फूट उंच उघडण्यात आले. सहा हजार क्‍युसेक प्रतिसेकंद वेगाने मुळा नदीपात्रात पाणी झेपावले. सायंकाळी चार वाजता आठ हजार क्‍युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. रात्री बारा वाजता बारा हजार क्‍युसेकने विसर्ग वाढविला जाईल. मुळा नदीचे पाणी चोवीस तासांत ४५ किलोमीटरचे अंतर पार करून, पाचेगाव येथे प्रवरा नदीला जाऊन मिळेल. कायगाव टोक येथे ८० किलो मीटरचा प्रवास करून मुळाचे पाणी प्रवरा नदीतून ३६ तासांत गोदावरी नदीला मिळेल. शनिवारी (ता. ३) सकाळी दहा वाजता धरणातून विसर्ग कमी करून, दोन हजार क्‍युसेक करण्यात येईल. शनिवारी दुपारी तीन वाजता पाणी सोडण्याची प्रक्रिया बंद होईल. जायकवाडीला सोडलेल्या पाण्यातील तीस टक्के पाणी नदीपात्रात वाया जाईल. एक हजार नऊशे पैकी एक हजार चारशे दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला पोचणे अपेक्षित आहे, असे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले. भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वी तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी प्रवरा नदीवरील अगस्ती सेतू पुलावर शेतकरी संघर्ष समितीतर्फे तीन दिवसांपासून सत्याग्रह आंदोलन सुरू होते. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मंत्रालयात १३ नोव्हेंबरला बैठक घेण्याचे ठरले आहे.  या धरणांतून पाणी सोडले पैठण धरणाच्या उर्ध्व भागातील धरण समूहातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. मुळा धरण समूहातून (मांडओहोळ, मुळा) १.९० टीएमसी, प्रवरा समूहातून (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजपूर) ३.८५ टीएमसी, गंगापूर समूहातून (गंगापूर, काश्यपी, गौतमी, गोदावरी) ०.६०, गोदावरी दारणा समूहातून (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) २.४ आणि पालखेड समूहातून (करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेड, पालखेड, तीसगाव) ०.६० असे एकूण ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. गंगापूर धरणावर पोलिस बंदोबस्त नगर आणि नाशिकमधून तब्बल ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीनही धरण समूहांमधून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. पाण्याच्या वहनमार्गासह धरण परिसरातही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com