निळवंडे धरणातूनही पाण्याचा विसर्ग 

निळवंडे धरणातूनही पाण्याचा विसर्ग 
निळवंडे धरणातूनही पाण्याचा विसर्ग 

नगर : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील पावसामुळे टीएमसी क्षमतेचे निळंवडे धरणात सोमवारी सकाळी ८४ टक्के पाणीसाठा झाला. मात्र, वरील भागातून पाण्याची जास्ती आवक होत असल्याने सकाळी ८ वाजता पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मुळा धरणात (कोतुळ जवळ) आवक कमी झाली आहे. आज सकाळी सहा वाजता मुळा धरणात १९ हजार ७३२ क्युसेकने आवक सुरू होती. मुळा धरणाचा पाणीसाठा ७१ टक्के झाला होता. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात घाटघर, रतनवाडीला जोरदार पाऊस सुरू आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये अजूनही अनेक भागांत जोरदार पाऊस नाही. मात्र, अकोले तालुक्यातील पश्चिम भागात पडणाऱ्या पावसावर साऱ्या जिल्ह्याचे लक्ष असते. या भागातील भंडारदरा निळवंडे यांसह या भागात पडणाऱ्या पावसावर मुळा धरणाचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या आठ दिवसांपासून अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्यामुळे यंदा भंडारदरा धरण हा दिवस अगोदरच भरले असून निळवंडे धरणाचा पाणीसाठा सोमवारी सकाळी ८४ टक्क्यांवर गेला होता. सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून १० हजार ०९९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे निळवंडे धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू असल्याने सकाळी आठ वाजता ५ हजार क्युसेकने दहा वाजता ७ हजार तर अकरा वाजता अकरा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला. हे पाणी प्रवरेतून जायकवाडीला जाणार आहे. 

हरिश्चंद्रगड परिसरातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्यामुळे मुळा धरणात जोरदार पाण्याची आवक होत असून आज सकाळी सहा वाजता कोतुळ येथून मुळा नदीतून १९ हजार ७३२ क्युसेकने वेगाने आवक होत होती. रविवारपेक्षा ही आवक कमी आहे. गेल्या चोवीस तासांतही रतनवाड, घाटघर परिसरात जोरदार पाऊस सुरू असून रतनवाडी येथे सव्वा बारा इंच तर घाटघरला नऊ इंच पावसाची नोंद झाली.

चोवीस तासात झालेला पाऊस असा ः घाटघर : ३१०, रतनवाडी: २२०, पांजरे : १३२, वाकी : १२५, भंडारदरा : १३५, निळवंडे: ७०, आढळा : ६०, अकोले : १०४, कोतुळ : ६३, ओझर ः ३०, संगमनेर ः ४३, श्रीरामपूर ः २०.

मुसळधार पावसाने मुळा नदीला पूर आला आहे. धरणसाठा झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत पावणेदोन टीएमसी नवीन पाणी मुळा धरणात जमा झाले. त्यामुळे साठा १७ हजार २९६ दशलक्ष घनफूट (६६. ५२ टक्के) झाला. धरणात दुपारी विक्रमी ५२ हजार ७२, तर सायंकाळी ४० हजार ८२० क्‍युसेकने आवक सुरू होती. ती टिकून राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसांत धरणाचे दरवाजे उघडावे लागतील, असे मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com