रब्बीसाठी प्रकल्पांमधील पाण्याचे लवकरच आरक्षण

Soon reservation of water for projects for rabbis
Soon reservation of water for projects for rabbis

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी तयारी करीत असून, विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासंबंधी लवकरच पाणी आरक्षण केले जाणार आहे.  पाणी आरक्षणासंबंधी संबंधित प्रकल्पांच्या कालवा समित्या व प्रशासन यांची बैठक होईल. या वेळेस या प्रक्रियेमध्ये जलसंपदामंत्री, पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांचा सहभाग नसणार. कारण, सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणुकांची धामधूम २४ ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे पाणी आरक्षणासंबंधी उशीर होऊ नये यासाठी प्रशासन व कालवा समित्यांची बैठक लवकरच होऊ शकते. जळगाव जिल्ह्यात गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यात पांझरा, अनेर आणि नंदुरबारात दरा, सुसरी आदी प्रकल्पांमध्ये रब्बीसंबंधी सिंचनासाठी पाणी आरक्षित केले जाईल.  जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वादोन लाख हेक्‍टरवर, धुळ्यात एक लाख आणि नंदुरबारातही सुमारे ८० ते ८५ हजार हेक्‍टरवर रब्बी पिके असतील. यातील निम्मे क्षेत्राला सिंचनासंबंधी प्रकल्पांमधून पाण्याची व्यवस्था होईल. गिरणा धरणाच्या माध्यमातून पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव आदी भागांतील २५ हजार हेक्‍टर, वाघूरच्या माध्यमातून भुसावळ, जळगावमधील सुमारे सात हजार हेक्‍टर क्षेत्रास तर हतनूरच्या माध्यमातून भुसावळ, यावल, रावेर व चोपडामधील मिळून सुमारे १८ हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाची सोय करता येणार आहे.  धुळ्यात पांझरा प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे, शिंदखेडा, साक्री व अनेर प्रकल्पांमुळे शिरपूर व जळगावमधील चोपडा तालुक्‍यांतील अनेक गावांमध्ये सिंचनासंबंधी व्यवस्था होणार आहे. या भागातील कोरडवाहू कापूस पिकासही दोन वेळेस सिंचनासाठी या प्रकल्पांमधून पाणी मिळणार आहे.  यामुळे कोरडवाहू कापूस पिकाच्या उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. कालवा समित्यांच्या बैठकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी पुढील आठवड्यात किंवा दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया पार पडण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com