कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
जलसाठा घटू लागला; ‘गिरणा’ ४७ टक्क्यांवर
खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी, उन्हाळी पिकांसाठी प्रकल्पांमधून सोडलेले आवर्तन, उष्णता आदी कारणांमुळे जलसाठा ५९ टक्के एवढा झाला आहे.
जळगाव : खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी, उन्हाळी पिकांसाठी प्रकल्पांमधून सोडलेले आवर्तन, उष्णता आदी कारणांमुळे जलसाठा ५९ टक्के एवढा झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील साठा ४७ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. या प्रकल्पाची क्षमता १८ टीएमसी एवढी आहे. वाघूर (ता. जामनेर) प्रकल्पाची क्षमता आठ टीएमसी असून, त्यातही ४८ टक्के जलसाठा राहिला आहे. हतनूर (ता. भुसावळ) या तापी नदीवरील मध्यम प्रकल्पातील जलसाठाही ३८ टक्के एवढाच राहिला आहे. गिरणा, वाघूर व हतनूर प्रकल्पांवर विविध शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. वाघूर प्रकल्पातून जळगाव व जामनेर शहर आणि औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जाते.
गिरणा धरणातून मनमाड (जि. नाशिक), जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव शहरांसाठी पाणी योजना राबविलेल्या आहेत. तसेच सुमारे १२० गावांमधील टंचाई निवारणासाठी या धरणातून पाणी सोडावे लागते. रब्बीसाठी देखील गिरणा धरणातून तीनदा आवर्तन सोडले आहे. चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, भडगाव तालुक्यातील २१ हजार हेक्टर क्षेत्राला या धरणातून पाणी सोडले आहे. हतनूर धरणातून भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहत, आयुध निर्माणी, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी पाणी द्यावे लागते. तीन आवर्तने रब्बीसाठी या धरणातून दिले आहेत. यातच प्रकल्पात सुमारे ३५ टक्के गाळ आहे. यामुळे जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे.
धुळ्यातील मालनगाव, सोनवद, बुराई, पांझरा, अनेर या प्रकल्पांमधील साठाही ४८ टक्क्यांपेक्षा कमी आहे. अनेर प्रकल्पातून रब्बीसह उन्हाळ पिकांसाठी पाणी दिले आहे. पांझरा प्रकल्पातून धुळे शहरासह इतर गावांना पिण्याचे पाणी दिले जाते. तसेच धुळे, साक्री व शिंदखेड्यात रब्बीसाठी पाणी दिले जाते.
- 1 of 1098
- ››