नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा गेल्या वर्षीपेक्षा २७ टक्क्यांनी कमी

धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा २७ टक्क्यांनी कमी
धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा २७ टक्क्यांनी कमी

नाशिक : परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. धरणांमध्ये सद्यस्थितीत ६२ टक्के साठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल २७  टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी यंदा पाण्याचा वापर जरा जपूनच करावा लागण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील तब्बल ८ तालुके आणि १६ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या ठिकाणी दुष्काळी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. तब्बल ८७ गावे आणि २५४ वाड्या-वस्त्यांना ९८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ७५ ते ८० टक्के पाऊस झाला. यामुळे धरणांच्या साठ्यातही लक्षणीय घट झाली. सध्या जिल्ह्यातील प्रमूख धरणांमध्ये ४० हजार ६७१ दलघफू साठा आहे. त्याची टक्केवारी ही ६२ इतकी आहे. दरम्यान, २०१७ मध्ये या काळात धरणांमध्ये ५८ हजार ४६३ दलघफू म्हणजेच ८९ टक्के पाणी होते.

धरणांमधील उपलब्ध साठा आणि पुढील उन्हाळ्याचा हंगाम बघता जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. गंगापूर, दारणा, पालखेडसह इतर धरण समूहांमधून पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनचे सूक्ष्म नियोजन केले आहे. नागरिकांनी पाण्याची बचत करण्याची गरज आहे. कारण भु-गर्भातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट होत आहे. विहिरी, तलावांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे.

पाणी समस्या होणार तीव्र मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी दारणा धरणांमधून तब्बल ३२५० दलघफू पाणी जायकवाडीला सोडण्यात आले. प्रथमत: गंगापूर व पालखेडसह दारणा धरणातून हे आर्वतन दिले जाणार होते. परंतु, भविष्यातील टंचाईची दाहकता बघून केवळ दारणा समूहातून हे पाणी सोडण्यात आले. परिणामी दारणा धरणावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या व सिंचनासाठीच्या पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

टँकरच्या पाण्याचा पर्याय

धरणांमधील उपलब्ध पाणी बघता त्यात प्रथम पिण्याच्या पाण्याचे नंतर शेती आणि शेवटला औद्योगिक विचार केला जातो. पालखेड धरणातून पिण्यासह सिंचनासाठीचे यंदाचे प्रथम रोटेशन नोव्हेंबरमध्येच देण्यात आले. परिणामी पुढील काळात येथून सिंचनासाठी पाणी देण्याबाबत कोंडी निर्माण झाली आहे. थोड्याफार फरकाने अशीच स्थिती इतर धरण समूहांची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर येत्या काळात  फळबागा, शेती जगविण्यासाठी टँकरच्या पर्यायावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com