देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका क्लिकवर 

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील पाण्याविषयी माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी इंडिया वॉटर रिसोर्सेस इन्फोर्मेशन सिस्टम (इंडिया डब्लुआरआयएस) ही प्रणाली विकसित केली आहे.
water
water

पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील पाण्याविषयी माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी इंडिया वॉटर रिसोर्सेस इन्फोर्मेशन सिस्टम (इंडिया डब्लुआरआयएस) ही प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना देशातील जलसंपत्तीची उपलब्ध माहिती एका क्लिकवर मिळण्यास मदत होणार आहे. 

देशात २००८ पासून जलसंपत्तीची माहिती उपलब्ध होण्यासाठी या प्रकल्पावर काम सुरु होते. नुकतेच या प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून यामध्ये नवीन मॉड्यूल्सचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही माहिती ‘जीआयएस’ प्लॅटफॉर्मवर असल्याने पाणलोट क्षेत्र, लाभक्षेत्र, धरण, कालवे, जलविद्युत प्रकल्पाची माहिती आपल्याला पाहता येणार आहे. सध्या ही माहिती केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. त्यासंबधीची माहिती https://indiawris.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळांवर ही माहिती मोफत उपलब्ध आहे. 

देशातील अनेक धरणांवर दैनंदिन पाणीसाठा, होणारा विसर्ग मोजण्यासाठी तसेच धरणक्षेत्रात पडणारा पाऊस आणि हवामानाचे इतर घटक मोजण्यासाठी स्वयंचलित उपकरणे बसविण्यात आली आहेत. याबाबतची वास्तवकालीन माहिती व्हिडिओ स्वरूपात उपग्रहांच्या माध्यमातून संगणक कक्षाला प्राप्त होत असते. ही माहिती देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये नदीतून सोडण्यात येणारा विसर्ग, देशातील जलाशयामधील असलेला पाणीसाठा, भूपृष्ठावरील पाण्याची गुणवत्ता, पडलेला पाऊस, बाष्पीभवन ही माहिती पाहता येईल. देशातील भूजल पातळी आणि त्यांची गुणवत्ता आणि जल लेखा याबाबत देखील माहिती उपलब्ध आहे. 

या संकेतस्थळावरील प्रकाशने अंतर्गत नदी खोरे अहवाल, देशातील सर्व नद्यांचे नकाशे, पाणलोट क्षेत्र नकाशे यासह इतर महत्त्वाचे अहवाल उपलब्ध आहेत. देशातील नदी खोरे, पाणलोट क्षेत्र, या नद्यांवरील धरणे, नद्यांच्या उपनद्या याबाबतची माहिती मिळवण्यासाठी रिव्हर बेसीन एटलास ऑफ इंडिया हे एक महत्त्वाचे पुस्तक उपलब्ध आहे. या माहितीचा उपयोग सर्वसामान्य जनतेला या विषयाची ओळख होण्यासाठी होईल. 

विभागनिहाय माहिती उपलब्ध  जलसिंचन प्रकल्पः प्रकल्पांची ठळक वैशिष्टे, लघू पाटबंधारे प्रकल्पांची माहिती, नदीजोड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या लिंक्स उपलब्ध आहेत. तसेच जलवाहतूक करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या लिंक्स ‘जीआयएस’ नकाशावर पाहता येतील. पाण्याच्या अतिवापरामुळे पाणथळ तसेच क्षारपड झालेल्या जमिनीची माहिती पाहता येईल. तसेच धरणात साठलेल्या गाळाची माहिती देखील उपलब्ध आहे. 

भूजल: याअंतर्गत भूजलासंबंधी सविस्तर माहिती जसे, भूजलसाठे, खडकरचना, भूजल पुर्नभरण, भूजलाची माहिती उपलब्ध आहे. 

जलसंपदा: या अंतर्गत देशातील नदी खोरे, उपखोरे, जलाशय, पाणथळ जमिनी, बर्फाचे तलाव, समुद्र किनारपट्टीबाबत माहिती आणि जल पर्यटन ही माहिती उपलब्ध आहे. पर्यटकांच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची आहे. 

जमीन: या अंतर्गत देशातील जमिनीचा प्रकार, त्याचा वापर, वापरायोग्य नसलेली जमीन, सामाजिक-आर्थिक माहिती, जमिनीचा ऱ्हास, माती प्रकार, कृषी, अर्थव्यवस्था, कृषी व हवामान याचे विभाग याबाबतची माहिती पाहता येईल. पाण्याशी निगडीत महत्त्वाच्या घटना जसे पूर, दुष्काळ, पाऊस यांची देखील माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  मोबाईल ॲपही आणणार  भविष्यात या संकेतस्थळावर पूर पूर्वानुमान प्रणाली, नदी-जोड प्रकल्प सद्यःस्थिती, नदी-परिवहन प्रकल्प सद्यःस्थिती यासह पाण्याची गुणवत्ता आणि पाण्याचा लेखाजोगा याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याचे मोबाइल अॅप देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com