राज्यातील २४ जिल्ह्यांत पाणीबाणी

टॅंकर
टॅंकर

पुणे: उन्हाचा ताप दिवसेंदिवस वाढतच असल्याने राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. राज्यातील टंचाईग्रस्त ३१११ गावे, ७१५९ वाड्यांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३९७० टॅंकर दिवसरात्र धावत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. राज्याच्या २४ जिल्ह्यांना पाणीटंचाईने ग्रासले असून, आतापर्यंत टंचाई नसलेल्या नागपूर विभागातही टॅंकर सुरू करावा लागला आहे. तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे सरकल्याने उन्हाचा चटक्याबरोबरच पाणीटंचाईचा आलेखही वाढताच आहे.  राज्यातील ३४ पैकी २४ जिल्ह्यांना पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावू लागला आहे. यात कोकण विभागातील सिंधुदुर्ग, नाशिक विभागातील नंदूरबार, पुणे विभागातील कोल्हापूर, अमरावती विभागातील अकोला, वाशीम, नागपूर विभागातील वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अद्यापही टंचाई भासलेली नाही. तर औरंगाबाद विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये टंचाईचा विळखा वाढला आहे. राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, तेथे ६२५ गावे, २४० वाड्यांसाठी ९१५ टॅंकर सुरू आहेत. त्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातील ४५७ गावे २५४२ वाड्यांना ६८८ टॅंकरने आणि बीड जिल्ह्यातील ४९८ गावे २३४ वाड्यांना ६५२ टॅंकरने पाणी पुरविण्यात येत आहे.  यापूर्वी २०१६ मध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. एप्रिलच्या सुरवातीस राज्यातील २ हजार ५९९ गावे ३ हजार ८९५ वाड्यांमधील ३ हजार ३८४ टॅंकर सुरू होते. यंदा पाणीटंचाईची तीव्रता त्यापेक्षा खूपच अधिक असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी ९ एप्रिल रोजी राज्यातील १९ जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त असलेल्या अवघ्या ६०१ गावे १५८ वाड्यांसाठीसाठी ६११ टॅंकरने पाणी द्यावे लागले होते. यंदा औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर , नाशिक विभागातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे विभागातील सातारा, पुणे, सांगली आणि सोलापूर, अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यातही टॅंकर सुरू करावा लागला आहे. भूजल पातळी खालावल्याने, पिण्याच्या पाण्याचे स्राेत आटून पाणीटंचाई आणखी वाढणार आहे. राज्यातील पाणीटंचाईची विभागनिहाय स्थिती

विभाग    गावे    वाड्या टॅंकर
कोकण  ६८   १८८ ५७
नाशिक   ७६३   ३०३९  ९९०
पुणे     ५०६  ३३६२  ५८४
औरंगाबाद    १६२७   ५७०  २१८५
अमरावती १४६     ०  १५३
नागपूर  ०    १
एकूण   ३१११   ७१५९     ३९७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com