पाणी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा

पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. संबंधित गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी जवळपास असलेल्या जलस्त्रोतावरून पाणीपुरवठा करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाणी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा Water scarcity alleviation Complete tasks with priority
पाणी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा Water scarcity alleviation Complete tasks with priority

वाशीम : जिल्ह्यातील काही गावांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. संबंधित गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी जवळपास असलेल्या जलस्त्रोतावरून पाणीपुरवठा करण्यात यावा. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘पाणी टंचाई निवारणाची तातडीची उपाययोजना म्हणून गावाजवळ असलेल्या जलस्त्रोतावरून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात यावा. पाण्याचे स्रोत आटले तर ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची आहे. लोकप्रतिनिधींना व ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन पाणी टंचाईसाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येईल, यावर चर्चा करून निर्णय घ्यावा. ज्या नळयोजना नादुरुस्त आहे, त्या तातडीने दुरुस्त कराव्यात.

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची देखील तातडीने दुरुस्ती करून ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा त्वरित उपलब्ध करून देण्याचे काम संबंधित विभागाने करावे. ज्या उद्भव विहिरीमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे, तेथून टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळाले पाहिजे याचे नियोजन करावे.  १ मे ते १० जून या कालावधीत निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने करावी. पाणी पुरवठा योजनांच्या आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. ज्या ठिकाणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, त्या जलस्त्रोतात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. त्यानंतरच तेथून पाणीपुरवठा करावा, असेही देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ ३९२ गावांकरिता ४२२ विविध उपाययोजनांकरिता पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला होता. या वर्षी आजपर्यंत सात विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून, वाशीम तालुक्यातील पाच आणि मानोरा तालुक्यातील दोन विहिरींचा समावेश आहे, तर दोन टँकरचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

पाणी टंचाईग्रस्त तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा  बुलडाणा : जिल्ह्यात पाणीटंचाईचे तीव्रता वाढत चालली आहे. अति टंचाई तयार झालेल्या गावांसाठी जिल्हा प्रशासनाने टँकर मंजूर केले आहेत. यात मोताळा तालुक्यातील दोन आणि सिंदखेडराजा तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. तर तीन गावांसाठी विशेष नळ दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. 

तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मोताळा तालुक्यातील टेकडी तांडा, पोफळी व सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव या तीन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरीता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टेकडी तांडा येथील ३५० लोकसंख्येकरीता १ टँकर दररोज १२ हजार ५० लिटर पाणीपुरवठा करणार आहे. तसेच पोफळी येथील तीन हजार लोकसंख्येकरीता दोन टँकर मंजूर करण्यात आले आहे. तर दरेगाव येथील २ हजार ३२८ लोकसंख्येकरीता एक टॅंकर पाणीपुरवठा करणार आहे.  तीन गावांसाठी नळ योजना  पाणीटंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील रताळी, निमगाव वायाळ व राहेरी खुर्द या गावांसाठी नळ योजना विशेष दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील १५ गावांसाठी विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये शिरवा, काबरखेड, सहस्त्रमुळी, धोनखेड, चावर्दा, पिंपळगावनाथ, चिंचपूर, सांगळद, डिडोळा खुर्द, मोहेगाव, इसालवाडी, गिरोली, कोथळी, खडकी व चिंचखेडनाथ या गावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com