agriculture news in Marathi, water scarcity in farm, Maharashtra | Agrowon

जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा घायकुतीस
चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 24 मे 2019

जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने शिवार उजाड झाले आहे. काही पिकलेच नाही. दोन एकर शेत आहे. पण सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर करणे शक्‍य नाही. मी स्थलांतर करून आव्हाणे (ता. जि. जळगाव) येथे रसवंती चालवित आहे. माझी दोन मुले शेती, मजुरीची कामे घरी करतात. गावात १५-२० दिवस नळाला पाणी येत नाही. दुष्काळ भयाण आहे, अशी प्रतिक्रिया तरवाडे (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील जयसिंग पाटील यांनी दिली.

जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने शिवार उजाड झाले आहे. काही पिकलेच नाही. दोन एकर शेत आहे. पण सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर करणे शक्‍य नाही. मी स्थलांतर करून आव्हाणे (ता. जि. जळगाव) येथे रसवंती चालवित आहे. माझी दोन मुले शेती, मजुरीची कामे घरी करतात. गावात १५-२० दिवस नळाला पाणी येत नाही. दुष्काळ भयाण आहे, अशी प्रतिक्रिया तरवाडे (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील जयसिंग पाटील यांनी दिली.

 जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईमुळे शिवार उजाड झाल्याचे दिसले. प्रचंड उष्णता आहे. परंतु, तरीदेखील मोठ्या उमेदीने पुढील हंगामाची तयारी करण्यात शेतकरीराजा व्यस्त दिसला. सातपुडा पर्वतालगत यावल व चोपडा तालुक्‍यात केळीच्या पिकाला अनेक भागात फटका बसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येईल. 

‘‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील नुकतेच आमच्या गावी येऊन गेले. त्यांच्याकडे पाणी, चाराछावणीची मागणी केली. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही,’’ असे तरवाडे (ता. पारोळा) येथील मधुकर पाटील म्हणाले. ते म्हणाले, आमच्या तालुक्‍यातील तरडी, आडगाव, खेडिढोक, टेहू, मेहू, दगडीसबगव्हाण, माळपूर या भागात यंदा भीषण दुष्काळ आहे. तर शिवारात पिके सोडा, पाखरूदेखील नाही. आमच्या गावात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केल्याचे किशोर पाटील (जोगलखेडा, ता. पारोळा) म्हणाले.

खेडीढोकमधील टंचाई गंभीर बनल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर हंडामोर्चा काढला. पाणीटंचाई व प्रशासनाकडील दिरंगाईची समस्या सुटली नाही, तर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकू, असा इशारा खेडीढोक ग्रामस्थांनी प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात आले. बहादरपुरात स्थिती बरी दिसली. परंतु इंधवे, जिराळी व धुळ्यालगतच्या भागात मागील तीन वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेने विहिरी, कूपनलिका आटल्याचे सांगण्यात आले. कापसानंतर कुठलेही पीक या भागात नंतर झाले नाही, असे वसंत पाटील (पारोळा) म्हणाले.

अमळनेरातील डांगर, अंचळवाडी, मंगरूळ या भागात शिवार उजाड झाल्याची स्थिती आहे. अनेक युवक रोजगारासाठी गुजरातेत स्थलांततित झाल्याची माहिती मिळाली. यावलमधील सातपुडा पर्वतालगतच्या केळीबागांना फटका बसला आहे. सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले असून, तालुक्‍यातील नऊ हजार हेक्‍टरावरील केळी पीक धोक्‍यात सापडले आहे. केळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यात जवळपास  ५० टक्के केळीचे पीक शेतकऱ्यांना उष्णतेमुळे नुकसान झाल्याने फेकून द्यावे लागले. केळीचे आगार म्हणून ओळख असलेल्या न्हावी, भालोद, हंबर्डी, सांगवी बुद्रुक, डोंगरकठोरा, हिंगोणा, मारूळ, वड्री, कोरपावली, विरावली, चिखली, वढोदा, साकळीमधील उत्तर भागातील केळी होरपळली आहे, असे शेतकरी अनिल पाटील (विरावली, ता. यावल) म्हणाले. 

चोपडा, जळगाव तालुक्‍यातील तापीकाठावरील केळीचे मध्यंतरी वादळ व उष्ण वाऱ्यांनी नुकसान झाले. चोपडामधील पुनगाव, मितावली, गोरगावले, खेडीभोकरी, सनपुले, कठोरा, निमगव्हाण, जळगावमधील आमोदे खुर्द, करंज, धानोरा, सावखेडा खुर्द, कठोरा, किनोद, भादली खुर्द, भोकर, गिरणाकाठचे गाढोदा, फुपणी, नंदगाव, पिलखेडा, फेसर्डी, कुवारखेडा या गावांमधील केळीला उष्णतेची बाधा पोचली. उतिसंवर्धित केळी रोपे होरपळली. या नुकसानीसंबंधी भरपाई मिळावी. ज्यांनी विमा योजनेत सहभाग घेतलेला नाही, त्यांना राज्य शासनाने हेक्‍टरी किमान ८० हजार रुपये भरपाई द्यावी, असे शेतकरी संजय चौधरी (खेडी खुर्द, ता. जळगाव) म्हणाले. 

रावेर, यावल तालुक्‍यांतील भूजलपातळी खोल 
जिल्ह्यातील १५ पैकी ७ तालुक्‍यांचा पाण्याचा ‘अतिउपसा'' करणाऱ्या संवर्गात समावेश झाला आहे. रावेरमधील विहिरीची पाणी पातळी २०.६६ तर यावलमध्ये २६.३७ मीटरने खोल गेली आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार यावल तालुक्‍यातील भूजल पातळी सर्वाधिक खोल (२४.८८ मीटर) आढळून आली. त्याखालोखाल जळगाव तालुक्‍याची भूजल पातळी १९.०७ मीटर, रावेर तालुक्‍याची १७.९९ मीटर, चोपड्याची १४.२९, मुक्ताईनगरची १३.६२, बोदवडची ११.५८, अमळनेरची १०.२५, भुसावळची १०.९३ मीटर अशा नोंदी घेण्यात आल्या आहेत. 

कडबा दुरापस्त
ज्वारीचा कडबा दुरापास्त झाला आहे. बाजरीचा कडबा तीन हजार तर मक्‍याचा कडबा तीन हजार ३०० रुपये प्रतिशेकडा दरात मिळत असल्याचे शेतकरी रायभान पाटील (पाचोरा) म्हणाले. तर पाचोरामधील लोहारा, रोटवद, पिंपळगाव हरेश्‍वर भागात विहिरी कोरड्या झाल्या आहेत. लिंबू, संत्री बागा वाचविण्यासाठी शेतकरी ७०० रुपये प्रतिटॅंकर या दरात पाणी खरेदी करून ते विहिरीत टाकतात. मग ते कृषिपंपाद्वारे उपसून बागांना देतात, असे शेतकरी अतिष पाटील (गाळण, ता. पाचोरा) म्हणाले. 

धरणे कोरडीठाक
जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील पाचोरामधील बहुळा, चाळीसगावमधील मन्याड, एरंडोलातील अंजनी, पारोळानजीकचे भोकरबारी, बोरी हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. हिवरा, अग्नावतीमध्ये किरकोळ साठा आहे. तोंडापूर प्रकल्पही पाच टक्केच भरला होता. तोदेखील कोरडा झाला आहे. रावेरमधील सुकी, अभोरा व मंगरूळ या प्रकल्पांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी जलसाठा आहे. यावलमधील मोर प्रकल्पात सुमारे २१ टक्के, चोपडामधील गूळ प्रकल्पात २५ टक्के साठा आहे. तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातील जिवंतपाणीसाठा संपला आहे. वाघूरमध्ये १८ तर गिरणा नदीवरील नांदगावनजीकच्या गिरणा धरणातही फक्त १७ टक्के जलसाठा आहे.

फुलशेतीला फटका
जळगाव तालुक्‍यातील शिरसोलीचा परिसर गुलाब, झेंडू व इतर फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. जळकेरस्त्याकडील शिवारात फुलशेती जेमतेम अवस्थेत दिसली. गुलाबाच्या फुलांना बाजारात सध्या बऱ्यापैकी उठाव आहे. परंतु हंगाम हवा तसा नाही. उष्णता प्रचंड आहे. पाणीटंचाईचा फटका आमच्या भागाला बसल्याने २०-२२ एकरांतील फुलशेती संकटात आल्याचे पूना बारी म्हणाले. 

गिरणाकाठ बरा, इतरत्र संकट
जळगाव तालुक्‍यातील गिरणाकाठची पिलखेडा, कानळदा, खेडीखुर्द, सावखेडा बुद्रुक, धानोरा, दापोरा, बोरनार, म्हसावद आदी गावांमध्ये स्थिती बरी आहे. परंतु, आसोदा, नशिराबाद, भादली बुद्रुक, मन्यारखेडा, तरसोद, विटनेर, वावडदा, वडली, पाथरी या भागात जलसंकट मागील महिनाभरात गंभीर बनले आहे. आसोदा येथे तर १५-१५ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. मध्यंतरी पाणी आले, तेदेखील दूषित होते, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा केला, पण उपयोग झाला नाही. शेवटी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करावे लागल्याचे किशोर वसंत चौधरी (आसोदा, ता. जि. जळगाव) म्हणाले. 

स्थलांतरित आदिवासी बांधवांची वणवण
कानळदा (जि. जळगाव) शिवारात पाटी (जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथून स्थलांतरित झालेला अमलाल बारेला पाहणीदरम्यान भेटला. तो म्हणाला, आम्ही दोन वर्षांपूर्वीच इकडे आलो. पत्नी सया, मुलगा लक्ष्मण व संगीतासोबत एका झोपडीत राहतो. कापूस वेचणीनंतर शेतीकामे फारशी मिळत नव्हती. आता बाजरी, मका कापणी, मळणीची कामेही आटोपली आहेत. शिवारात टंचाई असल्याने बागायती कापूस लागवड फारशी होणार नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बोलकी प्रतिक्रिया त्याने दिली. 

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...