नाशिक जिल्ह्यात १५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पाणीटंचाई
पाणीटंचाई
नाशिक  : सध्या नाशिकमधील तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर जाऊन पोचला असताना दुसरीकडे वाढत्या उन्हाबरोबर पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होऊ लागल्या आहेत. परिणामी जिल्हा प्रशासनाकडे पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरची मागणी वाढली असून, आजमितीस जिल्ह्यात १५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये अवघ्या ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता, यंदा मात्र टॅंकरसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.
 
यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा ३९ अंशांपर्यंत गेला. महिनाभरापासून दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे पाणीटंचाईचे संकट तीव्र होताना दिसत आहे. यंदा ११३ टक्के पाऊस पडूनही जानेवारी महिन्यापासूनच जिल्हा प्रशासनाकडे पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरची मागणी केली जाऊ लागली. मात्र प्रशासनाने तब्बल दीड महिना टॅंकर मंजुरीस टाळाटाळ करत फेब्रुवारीच्या अखेरीस टॅंकरला मंजुरी दिली.
 
आजमितीस जिल्ह्यातील २५ गावे, २ वाड्या अशा एकूण २७ गावांना १५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.यात येवला तालुक्‍यात ५, बागलाण तालुक्‍यात ७, मालेगाव तालुक्‍यात १, सिन्नर आणि देवळा तालुक्‍यात प्रत्येकी १ टॅंकर पाणीपुरवठ्यासाठी सुरू करण्यात आले आहेत. 
 
६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गतवर्षी म्हणजे ४ एप्रिलला जिल्ह्यातील ११ गावांना ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. अजूनही प्रशासनाकडे येवला तालुक्‍यातील १२ गावांसाठी टॅंकरचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, येत्या दोन दिवसांत टॅंकरसंख्येत आणखी वाढ होणार आहे.
 
यंदाचा उन्हाळा चांगलाच तापू लागल्याने विशेष करून धरणसाठा परिसरात याची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येते. तापमानाचा पारा वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढून धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील ७ मोठे आणि १७ मध्यम अशा एकूण २४ प्रकल्पांमध्ये २७ हजार ६६७ दलघफू म्हणजेच ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या धरण प्रकल्पांत २१ हजार ७८६ दलघफू म्हणजेच ३३ टक्के साठा शिल्लक होता. गतवेळच्या तुलनेत यंदा ९ टक्के अधिक जलसाठा असला तरी पुढील काही दिवसांत पारा वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून बाष्पीभवनाचा वेग वाढून पाणीसाठ्यात घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
 
गंगापूर धरण समूहातील काश्‍यपी, गौतमी गोदावरी, आळंदी धरणांत ५७ टक्के पाणीसाठा असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड धरण समूहात ३४ टक्के, तर दारणा समूहात ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गिरणा खोऱ्यात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. असे असले तरी पाण्याची फारशी टंचाई जाणवणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com